घरक्राइमपरमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; पोलीस अधिकारी अनुप डांगेंनी केली होती तक्रार

परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; पोलीस अधिकारी अनुप डांगेंनी केली होती तक्रार

Subscribe

अंडरवर्ल्डशी थेट संबंध असलेले आरोपी जितेंद्र चंदेरलाल नवलानी, भरत शहा, सनी देवान यांच्याशी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे संबंध असल्याचा आरोप गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी लेखी तक्रारीत केला आहे. तब्बल तीन महिन्यांनी गृह खात्याने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याने परमबीर सिंग यांच्या अडचणीत भर पडली आहे. एकीकडे अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपानंतर एट्रोसिटी आणि बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने परमबीर सिंग यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी २०१७ मध्ये ब्रिच कँडीजवळील आकृती बिल्डिंगमध्ये असलेला ’डर्टी बर्न्स सोबो’ हा पब रात्री मुदत संपल्यानंतरही चालू असल्याने बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांचा वाद जितेंद्र नवलानीशी झाला. तेव्हा परमबीर सिंग हे अँटिकरप्शनचे महासंचालक होते. त्यांच्याशी ’घरचे संबंध’ असल्याचा दावा करीत जितेंद्र नवलानीने अनुप डांगे यांच्यावर दादागिरी केली. त्याच्या पबमध्ये आलेल्या काही लोकांमध्ये तेवढ्यात वाद झाला. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करताच त्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. अखेर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जितेंद्र नवलानीसह तीन आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणले. अटक झाल्याच्या दुसऱ्याच क्षणी विविध पोलीस अधिकार्‍यांकडून सुटकेसाठी फोन सुरू झाले.

- Advertisement -

अटक करण्यात आलेल्यांपैकी यश मेहता हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलशी संबंध ठेवण्यावरून अटक झालेला हिरे व्यापारी भरत शहा याचा नातू आहे. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता डांगे यांनी एफआयआर दाखल केला. त्यानंतर पहाटे स्वत: भरत शहा पोलीस ठाण्यात आले व नातू यशला सोडून देण्याची विनवणी करू लागले. डांगे यांनी नकार देताच भरत शहा, राजीव शहा आणि यश मेहता यांनी डांगे यांच्यावर हल्ला चढवला. गावदेवी पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. या प्रकरणात पोलीस डायरीत परमबीर सिंग यांचाही उल्लेख आहे.

हा सारा प्रकार घडल्यानंतर खासकरून जितेंद्र नवलानीचे नाव आरोपींच्या यादीतून काढण्यासाठी परमबीर यांनी प्रचंड दबाव आणला. २९ फेब्रुवारीला मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी अतिरिक्त पोलीस आयुक्त निशिथ मिश्रा आणि पोलीस उपायुक्त राजीव जैन यांना आपल्या कक्षात बोलावून माझे आदेश येईपर्यंत या प्रकरणात आरोपपत्र दाखल करू नका, असे आदेश परमबीर यांनी दिले. तसे इलेक्ट्रॉनिक पुरावे असल्याचे डांगे यांनी तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणातील जितेंद्र नवलानी हा अंडरवर्ल्डशी संबंध ठेवून आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मनी लाँडरिंगमध्ये सहभागी आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील आणि इक्बाल मिरची यांच्याशी थेट लिंक असलेले हिरे व्यापारी भरत शहा, सनी देवान आदींशी त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

जितेंद्र नवलानीला आरोपी केले या एका मुद्द्यावरून सूड उगवत परमबीर यांनी डांगे यांना निलंबित केले. या निलंबनाची निष्पक्ष चौकशी करावी आणि अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या आरोपींना ऑन रेकॉर्ड पाठीशी घालणार्‍या परमबीर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अनुप डांगे यांनी गृह खात्याकडे तक्रारीत केली होती. विशेष म्हणजे, अंबानी स्फोटक प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरण या दोन्ही प्रकरणांपूर्वी खूप आधी २ फेब्रुवारीला दाखल झालेली ही तक्रार आहे आणि आता कुठे गृह खात्याने या तक्रारीची दखल घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -