घरठाणेलसीकरण मोहिमेत दुजाभाव; भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांचा आरोप

लसीकरण मोहिमेत दुजाभाव; भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांचा आरोप

Subscribe

शिवसेनेचा एक पदाधिकारीच लसीकरणाचे टोकन वाटपात आघाडीवर आहे, असा आरोप भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे.

ठाणे शहरातील टेंभीनाका, काजूवाडी, शीळ येथील केंद्रांवर तब्बल २२० लसी देण्यात आल्या. तर आझादनगर, गांधीनगर, माजिवडा, मानपाडा, बाळकूम केंद्रावर प्रत्येकी ३० लस दिल्या गेल्या आहेत. या प्रकारावरून महापालिकेकडून लसीकरणात दुजाभाव केला जात आहे, असा आरोप भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. त्याचबरोबर वाढत्या उन्हामुळे सकाळी ९ वाजता लसीकरण सुरू करण्याची मागणीही डुंबरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. शहराच्या विविध भागातून कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची नागरिकांकडून मागणी केली जात आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने बुधवारी २५ केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध केली आहे. मात्र, त्यात केंद्रांनुसार दुजाभाव करण्यात आला आहे. ठाण्यातील काजूवाडी, टेंभीनाका आणि शीळ येथील केंद्रात प्रत्येकी २२०, वर्तकनगर, मुंब्रा, खारेगाव येथील केंद्रात १६०.

आनंदनगर, कोपरी, दादोजी कोंडदेव स्टेडियम, आझादनगर, बाळकूम, गांधीनगर, माजिवडा, मानपाडा आदी ठिकाणी केवळ ३० लस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्या आपत्तीच्या काळात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा लसपुरवठा करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्याऐवजी ठाण्यातील सर्व भागातील नागरिकांना समान न्याय द्यावा, अशी मागणी डुंबरे यांनी केली आहे. सध्या मे महिन्यामुळे कडक उन्हाचे चटके बसत आहेत. अशा परिस्थितीत सर्वच लसीकरण केंद्रांची वेळ दुपारी १२ ते दुपारी ४ पर्यंत ठेवली आहे. त्यातच ज्येष्ठ नागरिकांकडून पहाटे चारपासून रांग लावली जाते. बहुसंख्य वेळा उपलब्ध लसींपेक्षा नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे नागरिकांना दुपारी १२ नंतर लस न घेताच परतावे लागते. कोरोना आपत्तीच्या काळात लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्यामुळे संसर्गाचाही धोका उद्भवतो. या पार्श्वभूमीवर दुपारी बाराऐवजी सकाळी ९ वाजता लसीकरण सुरू करावे, अशी मागणी डुंबरे यांनी केली आहे.
शिवसेनेचा पदाधिकारीच टोकनवाटपात आघाडीवर महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी टोकन व व्हीआयपी पद्धत बंद केली असल्याचे जाहीर केले असले, तरी शिवसेनेचा एक पदाधिकारीच लसीकरणाचे टोकन वाटपात आघाडीवर आहे, असा आरोप भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. या पदाधिकाऱ्याने बिनधास्तपणे ऑफलाईन सेंटरवरील टोकनवाटप सुरू केले आहे. त्याला रोखण्यास शिवसेना हतबल आहे का, असा सवाल डुंबरे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -