घरफिचर्ससारांशतोरणा ते रायगड :अद्भुतानुभव

तोरणा ते रायगड :अद्भुतानुभव

Subscribe

रायगड पाहताना मनात प्रश्न पडतो, 28 वर्षे राजधानी असलेला राजगड सोडून महाराजांनी रायगडावर राजधानी आणण्यामागचे कारण काय असावे ? उत्तरही इथेच सभोवार असते. राजगड हा दुर्गम किल्ला, तरीही पठारी प्रदेशामुळे आक्रमणाचा धोका गडाला होता. शाईस्तेखान, मिर्झा जयसिंग या मोगली आक्रमणात फौजा थेट राजगड पायथ्याजवळ पोहोचल्या होत्या. मात्र रायगड एका बाजूस कोकणात, त्यामुळे गडाला वेढा घालायला कोकणात उतरताना सह्याद्रीतले अतिदुर्गम असे घाटमार्ग फौज फाट्यासह ओलांडणे अत्यंत जिकीरीचे होते. रायगडाला काळ व गांधारी ह्या नद्यांचे नैसर्गिक असे संरक्षण लाभले होते. आणि मुख्य म्हणजे, रायगडापासून समुद्र जवळ असल्याने पोर्तुगीज, इंग्रज व सिद्दी ह्या आरमारी शत्रूला काबूत ठेवणे रायगडावरूनच सोयीस्कर होते. असा हा शिवतीर्थ रायगड दुसर्‍या दिवशी हिरकणी बुरुजापासून ते भवानी कड्यापर्यंत आणि टकमक टोकापासून वाघ दरवाजापर्यंत मनसोक्त अनुभवला.

एकदा का राजगड सोडला की तोरण्याचे वेध लागतात आणि तोरणा पाठमोरा झाला की शिवतीर्थ रायगड सादावू लागतो. वळणा आडवळणावरच्या त्याच्या दर्शनाने पाऊलानाही उत्साही वेग येतो. राजगड-तोरणा हे घाटमाथ्यावरील किल्ले तर रायगड हा ऐन कोकणात सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला पूर्णतः स्वतंत्र, त्यामुळे राजगडावरून रायगडला जायचे झाल्यास सह्यधारेवरील घाटखिंडीमार्ग पार करावे लागतात. सह्यमाथ्यावरून रायगडाच्या बहुतांश पूर्व-उत्तरेस उतरणारे मढे घाट, उपांड्या घाट, सिंगापूर नाळ, बोराटा नाळ, कावल्या-बावल्या खिंड, वरंधा घाट, सुनेभाऊ, गायनाळ असे अनेक घाटखिंड-मार्ग आहेत.

ह्यातील कावल्या-बावल्या आणि देवघाट खिंडी वाटांनी तर शिवोत्तरकाळामध्ये मोगलांशी लढताना पावनखिंडीप्रमाणे अचाट पराक्रमही गाजवलाय. आजही या प्रत्येक घाटवाट खिंडीने स्वतःचे ऐतिहासिक वेगळेपण, सृष्टीचे राकट सौंदर्य, आणि थरारही जोपासलाय.

- Advertisement -

निसर्ग आणि मानव यांना जोडणारा स्वच्छंद सेतू म्हणजे भ्रमंती.आणि याचे एकदा का वेड लागले की मनुष्य वस्तीत मन रमत नाहीच. माझं काहीसं असंच झालंय. भ्रमंती हीच माझी साधना. साधनेचे निश्चित फलित असते. हे फलित पूर्वज्ञात असेल तर प्रयत्नांना दिशा आपसूकच गवसतेप्रयोजनाशिवाय साधना नाही आणि साधनेशिवाय प्रयोजनाची पूर्ती नाही. माझ्या साधनेचा आशय निसर्ग, गूढ इतिहास-विज्ञान आणि त्यातून आध्यात्मिक आनंद होय.

आज तोरणा पायथ्याचे भट्टी गाव सोडताना गावाच्या प्रवेशद्वार कमानीत असलेली वीरगळ पाहिली. तेथून समोरील डोंगरावर शेताच्या बांधावरुनच पायवाट चढते. माझा आजचा ट्रेक भट्टी गावातून पुढे-कानंद खिंड-गेळगाणी-(हरपूड) -मोहरी पठार-बोराट्याची नाळ उतरुन लिंगाणा पायथा-पानेगाव-वारंगी-रायगडवाडी-नाणे दरवाजामार्गे रायगड असा प्रदीर्घ चालीचाअसणार होता. उद्याची परीक्षा कशी असेल, हा दूरच्या ट्रेकसाठी मला आदल्या दिवशी पडणारा हमखास पहिला प्रश्न असतो. त्यानुसार पहाटे उठून प्रातर्विधी आवरून सूर्योदय होण्याअगोदरच ट्रेक सुरू केला. वीसेक मिनिटांतच गेळगाणी वस्तीत पोहोचलो. पुढच्या वाटेची खाणाखुणा खातरजमा करून घेतली. कारण हे गाव सोडलं की पुढे तब्बल तीन चार तासांच्या वाटचालीनंतर सिंगापूर गावी पोहोचणार होतो.

- Advertisement -

रात्रीस थेट रायगड किल्ल्यावरच पोहोचायचे असाच प्रयत्न करायचा मी ठरवले होते. नाहीच तर रायगडवाडीपर्यंत मजल मारायची होती. पल्ला फार दूरवर होता. त्यामुळे मी सिंगापूरपर्यंत पहिला, पुढे मोहरी गाव-बोराट्याच्या नाळेतून पाने गाव दुसरा आणि त्यापुढे रायगडपर्यंत तिसरा असे तीन टप्पे निश्चित करून झपझप पावलं टाकू लागलो.

पदभ्रमंतीत आपण ठरवणं आणि ते प्रत्यक्ष होणं हे आपल्या हाती नसतेच मुळी. मोहरी गावात पोहोचायला तब्बल साडेतीन तास लागलेत. या दरम्यान वाटेवर फक्त चिटपाखरं, खुरटलेली झुडपं आणि स्वतःचा स्वतःशीच संवाद. वाटा चुकण्याचा, धडपडण्याचा विनातक्रार अनुभव घेत मजल मारायची असते. मोहरी गावाच्या पुढे रायगडाकडे जाणार्‍या दोन वाटा अनुक्रमे सिंगापूर आणि बोराट्याच्या नाळीतून म्हणजे उभ्या चिंचोळ्या खिंडीतून खाली पायथ्याशी उतरतात. यापैकी बोराट्याची नाळ ही तशी अवघड तर सिंगापूर नाळ ही उतरायला आणि चढायला त्यामानाने सोप्पी. पूर्वीचे लोक या वाटेचाच दळणवळणासाठी उपयोग करत असत आणि इथूनच रायगड जिल्हा सुरू होतो आणि पुणे जिल्हा संपतो.

लिंगाण्याला पूर्ण वळसा घालून सिंगापूर नाळ दापोली गावी उतरते. अदमासे तीनेक तास लागतात. हा मागचा अनुभव होता. शंभरेक उंबरठ्याचे दापोली फार सुंदर गाव आहे. अंतर कमी पडावं म्हणून बोराट्याच्या नाळीतून उतरायचे मी ठरवले. हा खिंड मार्ग म्हणजे पूर्णतः शारीरिक-मानसिक क्षमतेची पुरेपूर कसोटी पाहणारा. पायथा गाठेस्तोवर कायम आव्हानात्मकअनुभवाचा कस जोखणारा. मोहरीतून मोरे भाऊंकडून मला अचूक मार्गदर्शन मिळालं होतं. कारण पठारावरून नेमकी वाट नक्की डाव्या बाजूस केव्हा वळते ते कळायला हवे.

अर्ध्या तासातच नाळेच्या तोंडाशी आलो. रायलिंग पठार उजवीकडे ठेऊन घळीत उतरलो. सॅकचा तळ शिळेस लागून बाऊन्स होऊन फॉल होऊ नये म्हणून शोल्डर स्ट्रीपवर घट्ट आवळल्यात. आणि शक्यतो रॉक फेस करूनच उतरत गेलो. असमान उंची आणि गतीत पावलं कशीही पडत असल्याने काही वेळानंतर उजव्या पायास cramp आलाच. त्यामुळे उड्या न मारता लहान पण तेज पावलं टाकायचं सूत्रं ठरवलं. काही अंतरावर एक वाट उजव्या बाजूस वळून लिंगाणाच्या पायथ्याला जेथून लिंगाणा शिखराची चढाई सुरुवात होते तेथेच उतरते. या टप्प्यापर्यंत कातळावरचा ट्रॅव्हर्स फारच जोखमीचा.अगोदर कुणी गेलेल्यांनी काही अवघड टप्प्यावर रोप सोडलेला असेल तर जोखीम कमी होते.अन्यथा अनुभवच कामी येतो. लिंगाणा शिखराच्या खिंडीत पोहोचल्यावर जिथून शिखर चढाई सुरू होते, त्या प्रस्तरावर नतमस्तक झालो.

रायगड हे स्वराज्याचे जेव्हा राजगृह होते तेव्हा लिंगाणा शिखर हे कारागृह होते. लिंगाण्याच्या शिवपिंडी आकारात मला सृष्टी देवत्वाचे दर्शन होते.अरुपाचे रूप टिपणार्‍या नेत्रांत सहज देवदर्शन घडते. देव दृष्टीत असेल तर सृष्टीत दिसेल. मला तो असा नित्य दिसतो. इथून पुढे उजवीकडे पाने गावाकडे उतरणार्‍या घळीतून उतारास लागलो. ही घळसुद्धा तेवढी सहज नसल्याचे जाणवले. पुरेपूर दम काढला. मोहरी गाव सोडल्यापासून इथवर पाने गाव गाठायला मला तीनेक तास लागलेत.
सकाळी भट्टी गावातून निघाल्यापासून पहिले दोन टप्पे पार करावयास अथक आठ तास लागले होते. आता काळ नदीखोर्‍या पलीकडे रायगड अगदी भवानी टोकापासून टकमकपर्यंत व्यवस्थित दिसू लागला.

आणि मागे लिंगाण्याची बुलंद शिखर पिंडी. गावाच्या अलीकडील नदी पात्रात यथेच्छ पोहलो. थकवा कुठच्या कुठे निघून गेला. पाने गावातच एका सद्गृहस्थांच्या घरी पिठलं भाकरीची सोय झाली. त्यावर एक वाटी दहीही मिळालं.अजून काय हवं? सूर्यास्तास वेळ तसा बराच होता. मनात उत्साहही होता, पण अवघे शरीर थकल्याचे जाणवू लागले होते. द्विधा मनस्थिती होती. थांबुया की निघुया. कारण, यापुढे रायगडावर पोहोचावयास किमान तीन तास अजून चालावे लागणार होते. थांबत थांबत गेलो तर अर्धा तास अधिक लागला असता. म्हणजे काही करून सूर्यास्तास गड माथ्यावर मी पोहोचू शकत होतो. वारंगी गाठेस्तोवर मुक्काम रायगडावरच करायचा मनात पक्के झाले.

पुढील तासाभरात रायगडवाडीमार्गे थेट नाणे दरवाजापर्यंत मजल मारली आणि थांबलो. सकाळी ठरवलेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यावर मी होतो. इथून एकदा का रायगड चढाईस सुरुवात केली तर मध्ये कुठेही थांबण्यासारखे काही नव्हते. नानेदरवाजापाशी नतमस्तक झालो. आपण पोहोचणारच ही आशेची थोडी चाहूल लागली आणि पावलं नेटाने आणि वेगाने पडू लागलीत.आरंभीचा संदेह, मनावरचे मळभ, डोळ्यांपुढचा काळोख हे सर्व सरते आणि उरते केवळ आत्मभान. मग, पुढच्या पावलावर पुरेसा प्रकाश आपोआपच पडतो.

आता रायगडाकडूनच मला ऊर्जा मिळत होती. वाटेवरून चालत असता मनात येत होते, शिवप्रभू, संभाजीराजे, जिजाऊ याच वाटेने गेले असतील ना. या डोंगर दर्‍या, पाषाण-शिळांनी राजांना मनसोक्त पाहिलेय. स्पर्श अनुभवलाय. याच आसमंतात राजांचा श्वास एकरूप झालाय. प्रत्येक वेळी, ‘आत्ता पोहोचलोच थोडंच राहिलं’ आपलं आपणच म्हणत गडाच्या महादरवाजा पाशी पोहोचलो. माथा टेकला. आज एवढा मोठा पल्ला मजल मारल्याची अनुभूती आपलं आपण कौतुक करून उत्साह वाढविणारी होती. महादरवाजापाशी थंडगार वार्‍याच्या झुळकीवर सुख लाभले.

समोर कोकणदिव्यापासून तो लिंगाण्यापर्यंतचा परिसर विलोभनीय वाटतो. लिंगाणा, लिंगाणा माची, रायलिंग पठार पाहताना मधला प्रवास आठवू लागला. वाटत होतं, इथून उठुच नये. राजांचं दर्शन इथेच घडावं. थोड्याच वेळात खालून गडावर एक दिंडी येत असल्याचे जाणवले. चारच इसम होते. हलगी, संबळ वाजवणारे बहाद्दर जोशात वाजवीत होते. एका विशिष्ट तालासुराची ती लय गडावर आपलीशी ओळखीची वाटत होती. तो नाद विलक्षण चैतन्य-स्फुरण देणारा होता. बरं झालं, आता त्यांच्या बरोबर त्या लयीत गड चढू लागलो. गंगा सागर अल्याड जिल्हा परिषदेच्या शेडपाशी त्यांच्या सोबतच मीही थांबलो. हे धारकरी उस्मानाबाद धाराशिव येथून आले होते. सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बारा तासाची माझी मजल दरमजल एकाच दिवशी झाली होती.

हरिश्चंद्र गडाच्या मावळतीस बेलपाड्याहून कोकणकड्याच्या उजवीकडील नाळेतून गडावरील केदारेश्वरपर्यंत पोहोचावयास असाच बारा तासांचा कालावधी लागतो. दोन्हीं खिंड वाटा भिन्न कसोटी पहाणार्‍या. वेगळ्या उंचीवर ऊर्जा देणार्‍या. घामाटलेल्या तोंडावर गंगासागर तलावाचे पाणी मारून देशमुख हॉटेलमध्ये चहा घेतला. आणि होळीच्या माळावर सूर्यास्त डोळ्यांत साठवावयास धावलो.

रायगड पाहताना मनात प्रश्न पडतो, 28 वर्षे राजधानी असलेला राजगड सोडून महाराजांनी रायगडावर राजधानी आणण्यामागचे कारण काय असावे ? उत्तरही इथेच सभोवार असते. राजगड हा दुर्गम किल्ला, तरीही पठारी प्रदेशामुळे आक्रमणाचा धोका गडाला होता. शाईस्तेखान, मिर्झा जयसिंग या मोगली आक्रमणात फौजा थेट राजगड पायथ्याजवळ पोहोचल्या होत्या. मात्र रायगड एका बाजूस कोकणात, त्यामुळे गडाला वेढा घालायला कोकणात उतरताना सह्याद्रीतले अतिदुर्गम असे घाटमार्ग फौज फाट्यासह ओलांडणे अत्यंत जिकीरीचे होते. रायगडाला काळ व गांधारी ह्या नद्यांचे नैसर्गिक असे संरक्षण लाभले होते. आणि मुख्य म्हणजे, रायगडापासून समुद्र जवळ असल्याने पोर्तुगीज, इंग्रज व सिद्दी ह्या आरमारी शत्रूला काबूत ठेवणे रायगडावरूनच सोयीस्कर होते. असा हा शिवतीर्थ रायगड दुसर्‍या दिवशी हिरकणी बुरुजापासून ते भवानी कड्यापर्यंत आणि टकमक टोकापासून वाघ दरवाजापर्यंत मनसोक्त अनुभवला.

शिवप्रभूंच्या समाधीपाशी अगदी समोरच दूरवर तोरणा अन त्यामागे राजगड स्पष्टपणे दिसतायत. ‘राजगड-तोरणा-रायगड’ या माझ्या सोलो-ट्रेकची सांगता झाली. डोळे मिटले गेलेत शिवस्मरण समाधीत मी बुडून गेलोय.

जगाच्या इतिहासात श्रीमंत अनेक झाले; पण त्यात कुणी योगी नव्हता. योगी अनेक झालेत; पण त्यात ऐहिक दृष्टीने कुणीही सधन नव्हता. माझे शिवप्रभू ‘श्रीमंत योगी’ होते.

शिवप्रभूंना रयतेच्या विझलेल्या चुली प्रज्वलित करायच्या होत्या, देव-देश-धर्म राखायचा होता म्हणून त्यांनी या राजगड रायगडावर राज्यसिंहासन व न्यायासन यांची निर्मिती केली. महाराजांचे योगसाधन पुढे युगानुयुगे व्यक्ती, समाज व राष्ट्र यांना संजीवक ठरेल. राजगड-तोरणा-रायगड ट्रेकमध्ये नुसती तंगडतोड नव्हे तर शिवप्रभूंची स्वराज्य योगसाधना कळते, तेच तर फलित होय !

मैं हूँ भी नहीं और कण कण रमता
जगत चेतना हूँ अनादि अनंता

–रामेश्वर सावंत 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -