घरमहाराष्ट्रनाशिकऑपरेशन हॉस्पिटल चळवळीनंतर आता ऑपरेशन स्कूल

ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीनंतर आता ऑपरेशन स्कूल

Subscribe

आम आदमीचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांची माहिती

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आता हॉस्पिटलच्या बिलांसंदर्भातील तक्रारी कमी झाल्या आहेत. मात्र यापुढेही आरोग्य क्षेत्रातील कट प्रॅक्टीस, लॅबशी संबंधित गैरव्यवहार, स्त्रीरोग तज्ज्ञांशी संबंधित तक्रारी यांचे निरसन करण्यासाठी ऑपरेशन हॉस्पिटल चळवळ ही पुढेही चालणार आहे. मात्र प्रारंभी ऑपरेशन स्कूलच्या माध्यमातून पालकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होईल, अशी माहिती आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी दिली.

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलनानंतर जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. वकिलांच्या सल्ल्यानंतर ते गेल्या १५ दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नव्हते. या काळात त्यांच्यावर काही प्रमाणात टीकाही झाली. सोमवारी (दि.१४) सायंकाळी त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून भूमिका मांडली. ते म्हणाले, माझ्याकडून काही वर्तनासंदर्भातील चुका झाल्या असतील. पण त्याला एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे स्वरुप देत कारवाई करण्यात आली. अर्थात आता सगळेच स्वीकारले आहे. व्यवस्था परिवर्तनाचा ध्यास घेतलेला मी परिवर्तन करुनच थांबेल. त्यातून व्यवस्थेला प्रश्न विचारेल. ऑपरेशन हॉस्पिटल ही चळवळ खरे तर इंडियन मेडिकल असोसिएशनने चालवायला हवी होती. दुर्दैवाने तसे न झाल्याने ती आम्ही हाती घेतली. यापुढे स्त्री रोग क्षेत्रात होणार्‍या गैरकारभारांवर आवाज उठवू. नॉर्मल आणि सिजेरीयन डिलिव्हरीवर मोठे काम उभे करू. मात्र त्यापूर्वी अनेक पालक अव्वाच्या सव्वा शुल्काने भरडले जात आहेत. कोविड काळातही अनावश्यक शुल्क आकारले जात असल्याने आता ऑपरेशन स्कूल तसेच ऑपरेशन महापालिकाही चळवळ करणार असल्याचे भावे म्हणाले.

- Advertisement -

होय मी आम आदमीचा प्रवक्ताच !

ऑपरेशन हॉस्पिटल चळवळ ही सर्वपक्षीय आणि सर्व विचारांच्या कार्यकर्त्यांनी सुरु केली असताना भावे यांनी आम आदमीची चळवळ असा वारंवार उल्लेख केल्याची टीका आता त्यांच्या काही सहकार्‍यांकडूनच केली जात आहे. त्यावर बोलताना भावे म्हणाले की, आम आदमी पक्षाचा मी प्रदेश प्रवक्ता असल्याने मी त्याचा उल्लेख करणारच. जितेंद्र भावेंना अटक झाली तेव्हा आम आदमीच्या प्रदेश प्रवक्त्यालाही अटक झाली हे स्पष्टच आहे. त्यामुळे ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे. राजकारणाची परिभाषाच बदलायची असेल तर राजकारणाबाहेर राहून चालणार नाही. आम आदमी पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यालाही अटक झाली. राजकारण लपवून करण्याची गोष्ट नाही. सामाजिक प्रश्न हे राजकारणाच्या माध्यमातूनच सोडवायला हवा, असे त्यांनी नमूद केले.

दुखावलेल्यांची माफी मागेल, कान पकडेल..

गेल्या पंधरा दिवसांत मी कोणाच्याही संपर्कात नसल्याने माझ्याविषयी अनेक गैरसमज निर्माण झाले. मी कुणी हिमालयात बसलेला बाबा नाही. काम, क्रोध, मोह, मत्सर या षडरिपूंनी ग्रासलेला एक सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे काही चुका झाल्याही असतील. दुखावलेल्या सर्व सहकार्‍यांची मी माफी मागणार आहे. त्यांच्यासमोर उठबशा काढणार आहे आणि कानही पकडणार आहे. आपापसांत वाद घालण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे महत्वाचे असल्याचे भावे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -