घरमहाराष्ट्रनाशिकबच्चू कडूंच्या पाठिंब्यानंतरही तो लग्न सोहळा अखेर रद्द

बच्चू कडूंच्या पाठिंब्यानंतरही तो लग्न सोहळा अखेर रद्द

Subscribe

वधू-वरांच्या कुटुंबियांनी घेतला लग्न सोहळा रद्द करण्याचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून एका आंतरधर्मीय विवाहाची मोठी चर्चा असून कट्टरवादी धार्मिक संघटनांनी याला लव्ह जिहाद असे संबोधत या लग्नाला प्रखर विरोध दर्शवला. दोन दिवसांपूर्वी नाशिक दौर्‍यावर आलेले शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या लग्नाला पाठिंबा दर्शवत आपण स्वतः या लग्नाला उपस्थित राहू असे सांगत विरोध करणार्‍यांना चांगलाच दम भरला होता. मात्र यामुळे निर्माण झालेला तेढ पाहता आता वधू-वरांच्या कुटुंबियांनी हा लग्न सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकमधील सराफ व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफ यांचा विवाह 21 मे रोजी नोंदणी पद्धतीने झाला. विशेष म्हणजे संबंधित तरुणी ही दिव्यांग असतांनाही मुलाने कुठल्याही अटीशिवाय स्व-इच्छेने हे लग्न करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे वधू कुटुंबीय देखील खूश होते. मुलीचे वडील एक नामांकित सराफ व्यावसायिक असल्याने हा सोहळा नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार हा सोहळा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत 18 जुलै रोजी शहरातील तिडके कॉलनी परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्याचे ठरले. मात्र समाजाने यास प्रखर विरोध दर्शवत हे लग्न म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला.

- Advertisement -

लव्ह जिहादच्या नावाने ही पत्रिका व्हॉट्सअ‍ॅप तसेच फेसबुकच्या माध्यमातून तुफान व्हायरल झाली. व्हॉट्सअ‍ॅपवर संबंधित पत्रिका आणि लव्ह जिहादचा मेसेज येताच अनेकांनी ते तसेच्या तसे पुढे फॉरवर्ड केले. मात्र यामुळे वधूकडील मंडळींना प्रचंड मनस्ताप झाला. बच्चू कडू यांनी या कुटुंबाला पाठिंबा दर्शवला. परंतु हा विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजाला दिलेले पत्र व शब्द आम्ही पाळला. त्यामुळेच हा विवाह सोहळा रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.

चर्चांना अखेर पूर्णविराम

बच्चू कडू यांनी या विवाह सोहळ्याला पाठिंबा दर्शवल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. सुवर्णकार समाजाने पत्रक काढत आपण उगाच या भानगडीत पडू नका असा इशाराच बच्चू कडू यांना दिला होता. बच्चू कडू यांनी लग्नास पाठिंबा दर्शवल्याने ठरलेल्या तारखेला विवाह होतो का? झाला तर काही वाद निर्माण होतो का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र आता या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -