घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रातून १२७ व्या घटनादुरूस्तीला विरोध, अन् सभागृहात हशा पिकला

महाराष्ट्रातून १२७ व्या घटनादुरूस्तीला विरोध, अन् सभागृहात हशा पिकला

Subscribe

महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना पक्षाकडून १२७ व्या घटना दुरूस्तीच्या विधेयकावर चर्चा करण्यासाठीची संधी दिली होती. पण आपले भाषण झाल्यानंतर त्यांच्या एका कृतीमुळे सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर सभागृहातील अध्यक्षांनी धानोरकर यांची चांगलीच फिरकी घेतली. त्यावर धानोरकर यांनाही आपली चूक लक्षात आली. आपली चूक सुधारत धानोरकर यांनी पुन्हा एकदा खुलासा केला. ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठीच्या १२७ व्या घटना दुरूस्तीच्या निमित्ताने धानोकर यांनी भाषण केले तर खरे, पण शेवटी विधेयकाला विरोध केल्याने सभागृहक अवाक झाले. त्यामुळेच अध्यक्षांच्या विचारणेनंतर मात्र त्यांनी आपले समर्थन असल्याचे जाहीर केले.

लोकसभेत सुरू असलेल्या १२७ व्या घटनादुरूस्तीच्या विधेयकावर आधारीत चर्चेदरम्यान कॉंग्रेसकडून सुरूवातीपासूनच विधेयकाला पाठिंबा देण्यात आला आहे. कॉंग्रेसकडून ५० टक्के सिलिंगची मर्यादा काढून टाकण्याचीही मागणी आज चर्चेच्या सुरूवातीलाच करण्यात आली. महाराष्ट्रातून या विधेयकावर चर्चा करण्याची संधी कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना मिळाली होती. पण या चर्चेच्या समारोपात धानोरकर थोडे गोंधळले. त्यामुळेच बाळू धानोरकर यांची तारांबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यांनी यावेळी केंद्रावर निशाणा साधताना सरकार धर्म धर्मात आणि जाती जातींमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या विधेयकाच्या माध्यमातून जातींमध्ये वाद निर्माण करायचा आहे. म्हणूनच मी या विधेयकाला विरोध करतो असेही ते समारोपात म्हणाले. पण त्याचवेळी लोकसभा अध्यक्षांनी त्यांना विचारले की, तुम्ही विधेयकाचा विरोध करता की समर्थन ? त्यानंतर बाळू धानोरकर थोड्या वेळासाठी गोंधळले. त्यांनी पुन्हा उभा राहून आपली चूक सुधारली. माझे विधेयकाला समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले. या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. भाजपकडूनही या समर्थनाची खिल्ली उडवली गेली. त्यावर सभागृहाच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा सर्वांना शांत केले. धानोरकरांनी आपली चूक सुधारली असल्याचे सभागृह अध्यक्षांनी स्पष्ट केले. त्यामुळेच पुढच्या कामकाजाला पुन्हा सुरूवात झाली.

- Advertisement -

कोण आहेत बाळू धानोरकर ?

भाजपने कॉंग्रेसमुक्त भारत असा नारा दिलेला असतानाच महाराष्ट्रातही कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र अशी स्थिती होते की काय ? अशी परिस्थिती २०१९ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये झाली होती. पण त्यावेळी जायंट किलर म्हणून कॉंग्रेसमधून एका उमेदवाराने विजयश्री खेचून आणली, तो उमेदवार म्हणजे बाळू धानोरकर. चंद्रपूरच्या मतदारसंघात बाळू धानोरकर यांनी तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेल्या हंसराज अहिर यांना पराभूत केले होते. महाराष्ट्रातून कॉंग्रेसचा एकमेव खासदार म्हणून धानोरकर यांची ओळख आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -