घरताज्या घडामोडीकर्जतमधील १४ पायविहिरींचे होणार संवर्धन

कर्जतमधील १४ पायविहिरींचे होणार संवर्धन

Subscribe

कर्जत तालुक्यातील दुर्गप्रेमी विकास झांजे या तरुणाने आतापर्यंत ११ पायविहिरी शोधल्या असून, त्यांचे राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धनकडून हे संवर्धन करण्यात येणार आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ ची जोरदार चर्चा सुरू असून, रोहन काळे आणि मनोज सिंकर या दोन ध्येयवेड्या तरुणांनी स्वयंम प्रेरणेने लोकसहभागातून ऑक्टोबर २०२० पासून सुरू केलेली ही मोहीम आता जोर धरू लागली आहे. या मोहिमेंतर्गत पुरातन पायविहिरी, बारव यांचा शोध घेऊन त्यांच्या संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. यात कर्जत तालुक्यातील दुर्गप्रेमी विकास झांजे या तरुणाने आतापर्यंत ११ पायविहिरी शोधल्या असून, त्यांचे राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धनकडून हे संवर्धन करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे ऐतिहासिक वास्तुंचे जतन आणि संवर्धन केले जाते तसे बारव, पायविहिरी यांच्याबाबतीत तसे होत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात भव्य आणि सुंदर बारव आहेत. त्यापैकी बर्‍याच बारव आज दुर्लक्षित अवस्थेत असल्याने जनजागृती करून स्थानिकांनी त्या बारवांचे जतन-संवर्धनासाठी आणि हा वारसा जपण्यासाठीच पुढाकार घ्यावा या दृष्टीने ही मोहीम राबविली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक इतिहासकार, दुर्गप्रेमी, वारसा प्रेमींच्या पाठिंब्याने आणि सक्रिय सहभागाने आतापर्यंत महाराष्ट्रभर सुमारे १ हजार ४७५ बारव, पायविहिरी, बावडी, घोडबाव, पोखरण, तळी, कुंड, पुष्कर्णी, पोखरण या अंतर्गत त्यांची अचूक स्थळे गूगल मॅप केली आहेत. ते www.indianstepwells.com या वेबसाईटवर पाहता येईल.
बारव म्हणजे काय, हा प्रश्न अनेकांना पडतो. बारव हा एक प्रकारचा जलसाठाच असतो. मात्र त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे गोल, चौरस किंवा किल्लीच्या आकारात बांधलेल्या या जलसाठ्यांना पायर्‍या असतात. म्हणूनच इंग्रजीत बारवांना ‘स्टेपवेल’ म्हणतात. एकात एक लहान होत जाणारे ३ ते ७ टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. पावसाचे पाणी अडविणे, ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत. पण पाऊसच पडला नाही तर तर त्या योजना कुचकामी ठरतात. मात्र पाऊस पडला नाही तरी अंतर्गत स्त्रोतातून भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारवांसारखे जलसाठे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे असून, काळाची गरज आहे.

- Advertisement -

कर्जत तालुक्यातील ११ पायविहिरी, २ कुंड आणि १ तलाव यांचे गुगल मॅपिंग झालेले आहे. यात कोठिंबे (२), अवसरे, दहिवली(नेरळ), डिकसळ, हालीवली, तळवली, टाकवे, तांबस, भालीवडी, कर्जत-चौक मार्गावरील खोपोली फाट्याजवळ कुंड- मानिवली आणि वैजनाथ, तसेच भिवपुरी येथील पुरातन तलावाचा समावेश आहे.

महाराष्ट्र बारव मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ७५ बारवांचे (पायविहिरी/बारव/कुंड/पुष्करणी) अंतर्गत गुगल मॅपिंग झाले आहे. यामध्ये अलिबाग (१५), कर्जत (१४), पनवेल (१२), माणगाव (७), सुधागड (५), रोहे (५), मुरुड (५), श्रीवर्धन (५), महाड (४), खालापूर (३) यांचा समावेश आहे. या कार्यात स्थानिक ऐतिहासिक वारसा प्रेमी मनोज तिथे, सौरभ घरत, रामजी कदम, सिद्देश सुर्वे, चेतन फावडे, मयूर कडू, सागर मुंढे, देवेंद्र मयेकर, ओंकार नाईक, रोहित देशमुख यांसह कर्जत तालुक्यातील दुर्गप्रेमी विकास झांजे यांनी पुढाकार घेऊन आपआपल्या भागातल्या बारव, पायविहीरींचा शोध घेऊन त्यांच्या माहितीच्या आधारे गुगल मॅपिंग केले आहे.

- Advertisement -

या मोहिमेचे ध्येय म्हणजे दुष्काळग्रस्त भागात पाणी टंचाईवर मात करणे, ऐतिहासिक वारसाचे जतन करून पर्यटन वाढवणे, प्राचीन व्यापारी मार्गांचा अभ्यास हे होय. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रभर गुगल मॅपिंग झालेल्या १ हजार ४७५ बारवांचे पुढील वर्षापासून टप्प्याटप्प्याने दस्तऐवजीकरण करण्यात येईल. तसेच येत्या महाशिवरात्रीला महाराष्ट्रभर १२५-१५० बारव, पायविहिरींवर बारव दीपोत्सव साजरा करण्याचे नियोजन आहे,असे दुर्गप्रेमी रोहन काळे याने सांगितले.

 


हेही वाचा – बीडीडी रहिवाशांना स्टॅम्प ड्यूटी फक्त १ हजार रुपये, कॅबिनेटचा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -