घरफिचर्ससारांश...प्रदर्शन!

…प्रदर्शन!

Subscribe

ठरलं….सगळ्यांचं ठरलं…एकमुखाने ठरलं.
…प्रदर्शन करायचं.
कार्यकर्त्यांमधून एका शहाण्याने खुसपटसुद्धा काढली…
प्रदर्शन हे करायचं असतं…की भरवायचं असतं?
दुसर्‍या महनीय शहाण्याने तिथल्या तिथे आपलं चतूर शहाणपण सुपरइम्पोज केलं.
भरवायचं असतं ते रांगोळी प्रदर्शन, पेन्टिंग्जचं प्रदर्शन, हॅन्डलूमचं प्रदर्शन…आणि करायचं असतं ते, आजवर आपण करत आलो ते प्रदर्शन.
कोणतं प्रदर्शन करत आलो आहोत आजवर आपण?…पक्षातल्या चतुर्थ शहाण्याने प्रश्न केला.
शक्ती प्रदर्शन की काय?…प्रश्न करत त्यानेच आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं.
सगळेच हसले. काही खरंखुरं हसले. काही ओशाळवाणं असले. काही दीनवाणं हसले.
शक्तीप्रदर्शन?…पण कुणाविरुद्ध?…पक्षांतर्गत विरोधकांविरुद्ध?…की पक्षाबाहेरच्या विरोधकांविरुद्ध?…की काहीतरी करून जनतेसमोर राहण्यासाठी?…की खुंटा हलवून घट्ट करण्यासाठी? की आखाड्यात नवा शक्तिमान आला आहे त्याला आपल्या दंडातल्या बेटकुळ्या दाखवण्यासाठी? की आपलेच सर्वशक्तिमान थोडे आऊट ऑफ फ्रेम होत चालले आहेत त्यांचा पुन्हा टाइट क्लोजअप घेण्यासाठी?…सर्वांनी आपापल्या प्रश्नांचे पत्ते पिसले.
नाय नाय नाय नाय, अस्मितेच्या प्रश्नासाठी काय तरी करायला पायजेल हाय, त्यासाठीच शक्तीप्रदर्शन करायचं हाय…वरच्या वर्तुळातल्या एका निकटवर्तियाने थेट हुकुमाच्या पानालाच हात घातला.
अस्मिता कशाची?…धर्माची?…जातीची?…परजातीची?…आरक्षणाची?…अभक्ष्यभक्षणाची?…की बैलगाडीच्या शर्यतीची?…चतुर्थ शहाण्याला प्रश्न पुन्हा पुढ्यात पडला.
त्याच्या प्रश्नांवर सगळे पुन्हा निरथर्र्क हसले. काही खुषमस्करे सोडावॉटरच्या बाटलीसारखे काठोकाठ लोटपोट फसफसले.
राजकारणात तिसर्‍या दर्जाच्या विनोदावरही पहिल्या दर्जाचं हसून दाखवावं लागतं ह्या नियमाला जागले.
हसणं थांबलं तसं कामाला लागले. शक्तिप्रदर्शनाच्या तयारीला बसले.
शक्तिप्रदर्शन करायचं तर त्यासाठी एनर्जायझर घेणारे जिममधले गुटगुटीत तरुण पाहिजे असं थोडंच आहे? च्यवनप्राश घेत घेत नुकतीच तीर्थक्षेत्रीची यात्रा करून आलेले थकलेभागलेले जीवही त्या प्रदर्शनात चालणार आहेत.
लठ्ठ वजनापेक्षा गलेलठ्ठ आकडा तिथे महत्वाचा. पटावरच्या सोंगट्या हलवण्याच्या खेळात आकडा मानाचा.
आकडा वाढवण्यासाठी हौशेनवशे पुढे आले. शक्तिप्रदर्शन करण्याचं कंकण बांधून घेतलेले तर सर्वशक्तिनिशी पुढे सरसावले.
परवा जे शांतीयात्रेत, सद्भावना यात्रेत सामील झाले होते तेसुद्धा शक्तिप्रदर्शनात कालच्या शांततेचा बुरखा उतरवून यायला राजी झाले.
अस्मितेसाठी काय पण म्हणणारे तर स्वत:च्या पायापंखांनी येऊन दखल झाले. शक्ती दाखवून छातीचा कोट करत अस्मितेचा स्फोट घडवण्यासाठी दबा धरून बसले.
कुंपणावरच्यांचेसु्द्धा होकार आले, असंतुष्टांचेसुद्धा होकार आले, खो देणारे बंडखोरसुद्धा हो म्हणाले.
आता शक्तिप्रदर्शनात शक्तिचा बांध फुटून धरणाची दारं उघडी ठेवावी लागणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली.
हे शक्तिप्रदर्शन होणार असलं तरी त्यात सहनशक्ती अभिप्रेत होती. त्यात सहनशक्तीचा अंत दिसणार नाही हे अभिप्रेत होतं.
राजकारणाच्या पटलावर आपल्याला अशक्त समजू नये इतकाच त्यामागचा सशक्त हेतू होता.
ठरल्या दिवशी हळुहळू ठरलेले, ठरवलेले शक्तीजीवी, शक्तीनिर्भर शक्तीस्थळावर जमा होऊ लागले.
घोषणांचं कंत्राट दिलेल्यांनी बेंबीच्या देठापासून वरचा सा लावला. त्याला बाकीच्यांनी कोरस देऊन थोडा घसा मोकळा केला. धूर्त डाव टाकणार्‍या काहींनी आपला मुका हात यंत्रवत वर केला आणि शक्तिप्रदर्शनात फक्त निरूपयोगी हजेरी लावण्याचा गनिमी कावा साधून घेतला.
काही खरंच कुणा पुढच्या जाकिटधार्‍याच्या मागे प्रामाणिकपणे चालले. काहींचं चालता चालता जॉगिंग झालं.
कसं का असेना, ह्या शक्तिप्रदर्शनात शक्तिपेक्षा शक्ती दाखवण्याच्या कलेचं प्रदर्शन झालं आणि ते पाहणार्‍यांचं निखळ मनोरंजन झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -