घरमुंबईस्विगी, फूडपांडा, झोमॅटो डिलीव्हर फ्रॉम मुंबईच्या झोपडपट्ट्या

स्विगी, फूडपांडा, झोमॅटो डिलीव्हर फ्रॉम मुंबईच्या झोपडपट्ट्या

Subscribe

झटपट, चमचमीत ऑनलाईन फुड ऑर्डर करताय? मग मुंबईकरांनो थोड जपूनच ऑर्डर करा. तुम्ही अॅपवरून मागवणारा आवडीचा पदार्थ किती घाणेरड्या ठिकाणी बनतोय, हे तुम्हाला कळलं तर किळस आल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत तब्बल ३४७ फुड आऊटलेट्सवर अन्न व औषध प्रशासनने (एफडीए) धाडी घातल्या आहेत. स्विगी, फूडपांडा, झोमॅटो यासारख्या फुड चैन कंपन्यांकडून पुरविण्यात येणारे अन्न अतिशय घाणेरड्या अवस्थेत तयार होत असल्याचे या धाडींच्या निमित्ताने समोर आले आहे. स्वस्त, झटपट आणि भरघोस डिस्काऊंटच्या नावाखाली ग्राहकांना अतिशय सुमार दर्जाचं अन्न पुरवत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचाच हा प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईच्या बहुतांश झोपडपट्ट्यांमधून अतिशय घाणेरड्या ठिकाणी तयार केलेले अन्न मुंबईभर पुरवठा होत असल्याचे या धाडींच्या निमित्ताने समोर आले आहे.

गेल्या महिन्याच्या अखेरीस २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत एफडीएच्या टीमने एकूण ३४७ धाडी घातल्या. या धाडींमध्ये ११३ दुकानांकडे अन्नपदार्थ तयार करण्याचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अन्न तयार करण्यासाठी कोणतीही परवाना नोंदणी केलेली नाही. गोरगाव, मालाड, अंधेरी, भांडुप, चेंबुर, प्रभादेवी आदी भागातून या कंपन्यांना अन्नाचे वितरण करण्यात येत होते. बहुतांश अन्न हे मुंबईतील झोपडपट्टीच्या परिसरातच तयार होत आहे. अन्न तयार करण्यात येणारे किचनचे ठिकाण हे अतिशय घाणेरडे असल्याचे धाडी घालणाऱ्या पथकाच्या निदर्शनास आले आहे.

- Advertisement -
Swiggy Foodpanda Zomato realty
खाद्यपदार्थ बनवण्याची जागा

फुड आऊटलेट्सची पोलखोल

अन्न एकाचवेळी मोठ्या प्रमाणात शिजवून ठेवणे, अन्नपदार्थांवर माशा बसलेल्या असणे, किचनमध्ये कचरा पडलेला असणे, कचरापेटी उघडी असणे, किचनमध्ये कपडे सुकायला घातलेले असणे तसेच अन्नपदार्थ तयार करणाऱ्या कामगारांचे कपडे स्वच्छ नसणे, किचनच्या जागेला वेंटीलेशन नसणे यासारख्या गोष्टी आढळून आल्या. फुड आऊटलेट्सना काम बंद नोटीस देण्यात आली आहे. तसेच स्विगी, फूडपांडा, झोमॅटो यासारख्या कंपन्यांनाही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. सर्वाधिक स्विगी कंपनीच्या ८५ फुड आऊटलेट्सचा यामध्ये समावेश आहे. झोमॅटोचे ५० फुड आऊटलेट्स, फूडपांडाचे ३ आऊटलेट आणि उबराइटचे २ फुड आऊटलेट्सचा समावेश आहे.

स्विगी, फूडपांडा, झोमॅटोला कारणे दाखवा नोटीस

एफडीएने या फुड आऊटलेट्सला अन्न सुरक्षा मानद कायद्याअंतर्गत नोटीस दिली आहे. तर अॅपद्वारे अन्न पुरवणाऱ्या स्विगी, फूडपांडा, झोमॅटो आणि उबराईट यासारख्या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याची माहिती एफडी आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली. मोठ्या ब्रॅण्डची भुरळ सर्वसामान्यांना पडत असते. आंधळा विश्वास ठेवत ग्राहक एपच्या माध्यमातून फुडची ऑर्डर करतात. पण एफडीएच्या टीमने घातलेल्या छाप्यांमध्ये अतिशय अस्वच्छ ठिकाणी हे अन्न तयार करण्याचे प्रकार आढळले आहे. संपुर्ण मुंबईभरात घातलेल्या छाप्यांमध्ये अनेक फुड चैनची पोलखोल झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार असल्याचे दराडे यांनी सांगितले.

- Advertisement -

तर परवाना रद्द होणार 

एफडीएच्या अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनिल भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १५ लोकांच्या टीमने मुंबईभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये दक्षता पथक तसेच बृहन्मुंबईच्या टीमच्या सदस्यांचाही समावेश होता. एफडीएच्या कारवाईनंतर विनापरवाना अन्न शिजवणाऱ्यांना ५ लाख रूपयांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तर फूडपांडा, स्विगी आणि झोमॅटोचा परवानाही रद्द होऊ शकतो. आता या फुडचैन कंपन्यानी कारणे दाखवा नोटीसीला उत्तर दिल्यानंतर पुढची कारवाई होणार असल्याचे कळते.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -