घरमहाराष्ट्रनाशिकआरोग्यविभागाची परिक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप

आरोग्यविभागाची परिक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप

Subscribe

उसनवारी पैसे घेउन परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थीनींनी फोडला टाहो

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ व गट ‘ड’ पदाची शनिवारी होणारी परिक्षा ऐनवेळी रदद करण्यात आली. मात्र परिक्षेसाठी आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी रात्रीच शहरात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.अनेक विद्यार्थी तर परिक्षा देण्यासाठी उसने पैसे घेऊन आले होते. परिक्षा रद्दचा मॅसेज पाहून काही विद्यार्थीनींनी तर अक्षरशः टाहो फोडला.

आरोग्य विभागात नोकरी मिळेल या अपेक्षाने राज्यातील लाखों तरुण मागील अनेक महिन्यांपासून जीवतोड मेहनत करत होते. पण परीक्षेच्या दोन दिवस आधी त्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटावर भलतेच पत्ते देण्यात आल्याने अनेकजण बुचकळ्यात पडले होते. तरीही सर्वांनी मिळालेल्या मोडक्या-तोडक्या माहितीच्या आधारावर त्या पत्त्यावर पोहचून परीक्षा द्यायची तयारी केली होती. अनेकांना नाशिक केंद्र मिळाल्याने कोणी नंदुरबारहून आले तर कोणी नगर जिल्हयातून. परिक्षा केंद्रावर सकाळी पोहचण्यास उशिरा होऊ नये याकरीता अनेकजण रातोरात प्रवास करून नाशिकमध्ये दाखल झाले. परंतू ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याची नामुष्की सरकारवर ओढवली. नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा तालुक्यातील सरी या गावात राहणार्‍या नजरा वळवी या आपल्या दोन तान्हुल्या बाळांसह परिक्षा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता निघाल्या.

- Advertisement -

अक्कलकुवा ते नाशिक असा तीन बस बदलत प्रवास करत त्या सायंकाळी नाशिकमध्ये पोहचल्या. मात्र परिक्षा रदद झाल्याचे समजताच त्यांना रडूच कोसळले. वळवी यांच्यासारखे अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी परिक्षेसाठी कित्येक मैलांचा प्रवास करत नाशिकमध्ये दाखल झाले. कोरोनामुळे रोजगार गमावलेल्यांना या परिक्षेमुळे रोजगाराची अपेक्षा लागून होती. अनेकांनी तर परिक्षा देण्यासाठी दुसर्‍यांकडून उसने पैसे घेत प्रवास केला. परिक्षाच रदद झाल्याने उलट डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने विद्यार्थ्यांना मनस्तापच सहन करावा लागला.

विद्यार्थ्यांकडून शासनाचा निषेध

काही विद्यार्थी सुमारे सहाशे ते सातशे किलोमीटरचा प्रवास करत परिक्षेसाठी रात्री उशिरा दाखल झाले. मात्र रात्री उशिरा परिक्षा रद्द झाल्याचे मॅसेज आल्याने विद्यार्थ्यांनी राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. परिक्षेचा अर्ज भरणे, प्रवास खर्च, जेवणाचा खर्च याकरीता ४ ते ५ हजार रूपये खर्च करूनही मनस्ताप सहन करावा लागल्याने परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी शासनाच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवला.

मला दोन लहान मुले आहेत. परिक्षे दरम्यान मुलांना सांभाळण्यासाठी पतीसह मी नाशकात दाखल झाले. पैसे नसल्याने मी उसने पैसे घेतले. नंदुरबार नाशिक प्रवासासाठी दोघांना ११५० रूपये तिकिटाचा खर्च आला शिवाय आता मुक्काम करावा लागल्याने हॉटेलचा खर्च आणि पुन्हा परतण्यासाठी लागणारा खर्च असा एकूण ३ ते ४ हजार रूपये खर्च आला. पण परिक्षा रदद झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला.
          नजरा वळवी, परिक्षार्थी

मी नगर जिल्हयातील लोणी येथून आले. मला रात्रीच कळाले की परिक्षा रदद झाली. परंतु अनेकदा व्हाटसअ‍ॅपवर बोगस मॅसेज व्हायरल होतात त्यामुळे मला वाटले की, हा कोणाचा खोडसाळपणा असू शकतो म्हणून मी खात्री करण्यासाठी नाशिकला आले होते.
             प्रतिक्षा पाटील, परिक्षार्थी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -