घरमुंबईनेतृत्व देवेंद्रजींचं, राजकीय पितृत्व पवार साहेबांचं - चित्रा वाघ

नेतृत्व देवेंद्रजींचं, राजकीय पितृत्व पवार साहेबांचं – चित्रा वाघ

Subscribe

माझ्या जन्मदात्यामुळे मला जन्म मिळाला असला, तरी माझा राजकीय बाप म्हणून मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार यांनाच मानणार आहे. कारण त्यांनी जे शिकवलं समजावलं ते जगात दुसरं कोणीही शिकवू आणि समजवू शकलं नसतं. आज मी जे जगातल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या भाजप या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान मिळू शकले त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांचं असलं तरी त्याची पायाभरणी ही शरद पवारांनी केलेली आहे. मी त्याबद्दल आयुष्यभर त्यांची ऋणी आहे, अशी कृतज्ञता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.

कोकण मर्कंटाइल बँक पुरस्कृत ‘आपलं महानगर आणि माय महानगर’ आयोजित कलामंदिर नवदुर्गोत्सवातली चौथी दुर्गा होण्याचा मान नुकत्याच भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांच्या यादीत स्थान मिळवणार्‍या चित्रा वाघ यांना मिळाला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे आघाडी सरकारच्या वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राठोड यांच्या समर्थकांनी चित्रा वाघ यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला; पण त्या टिकेचा वाघ यांनी निकराचा सामना केला.

- Advertisement -

गेली अनेक वर्षे महिलांसाठी काम करणार्‍या चित्रा वाघ यांनी आपला राजकीय प्रवास राष्ट्रवादीच्या वार्ड अध्यक्ष या तळाच्या पदापासून सुरू करून भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान मिळवलेलं आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यावर देखील चित्रा वाघ यांनी स्वतःची एक वेगळी छाप नव्या पक्षावर उमटवताना देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्याबद्दलच्या निवडीचा निर्णय किती योग्य होता हेच दाखवून दिले आहे. याबाबत बोलताना चित्रा वाघ सांगतात मला माझ्या जन्मदात्यामुळे हे जग दिसलं असलं तरी माझा राजकीय बाप शरद पवारच आहेत.

दोनशे पानांवर लिहिलेलं दोनशे शब्दांत कसं मांडायचं हे मी शरद पवारांकडूनच शिकली. जोडीला लालबाग परळसारख्या कामगार वस्तीतून लहानाची मोठी झाल्यामुळेच सामाजिक काम करताना कोणाचीच भीती वाटत नाही. त्यामुळेच महिलांसाठी थोडेफार काम करू शकली. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी राजकारणात बापमाणूस असलेल्या शरद पवारांप्रती कृतज्ञच आहे. पण त्याचबरोबरीने देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दाखवलेला विश्वास आणि भाजप नेतृत्वाचे आशीर्वाद नजरेआड करून चालणार नाहीत. या सगळ्यांच्याच आशीर्वाद आणि शुभेच्छांचा परिपाक म्हणजे माझं काम आहे, असं मला वाटतं.

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोअर टीममध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या चित्रा वाघ सांगतात, शरद पवार आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला कमालीचं आकर्षण होतं. मला अनेक वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायचं होतं. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा होता. ‘मातोश्री’ आतून पहायचे होते. यासाठी मी खूप प्रयत्न केला; पण मातोश्रीत जाण्याचा योग आला त्यावेळेला भेटीसाठी बाळासाहेब तिथे नव्हते याचं खूप वाईट वाटतं.

पण उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीने राजकारणातला एक सज्जन, समंजस आणि चांगला माणूस भेटल्याचं समाधानही मिळवून दिलं. तीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत लागू पडते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कोणत्या वेळेला कोणती गोष्ट नेमक्या पद्धतीत कशी करायची आणि त्याचा पक्षाला कसा फायदा मिळवून द्यायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आहे, असं मला वाटतं. त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय आणि भाजपसारख्या जगातील सगळ्यात मोठ्या पक्षात लोकांची कामं करता येतात याबद्दल मी आयुष्यभर कृतज्ञ असेल, असेही त्या विनम्रपणे सांगतात.

ही मुलाखत सविस्तरपणे पाहण्यासाठी आपण www.mymahanagar.com ला भेट द्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -