घरठाणेआधी बोटे छाटली, आता मानच उडवेन , ठाण्यात फेरीवाल्याकडून महापालिका कर्मचार्‍याला धमकी

आधी बोटे छाटली, आता मानच उडवेन , ठाण्यात फेरीवाल्याकडून महापालिका कर्मचार्‍याला धमकी

Subscribe

महापालिका आयुक्त बंगल्याच्या हाकेजवळील प्रकार, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही; मात्र त्या कर्मचार्‍याचा झाला बीपी शुटआऊट

महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला करत त्यांच्यासह त्यांच्या अंगरक्षकाची बोटे छाटल्याची घटना ताजी असताना, सोमवारी घोडबंदर रोड, पातळीपाडा येथील ठाणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या हाकेवर असलेल्या रस्त्यावर महापालिका कर्मचारी आलेल्या तक्रारीनुसार कारवाईला गेले होते. यावेळी एका नारळ विक्रेत्या फेरीवाल्याने चक्क हातात सुरा घेऊन महापालिका कर्मचार्‍यावर धाव घेतली. तसेच आधी बोटे छाटली आहेत, आता मानच उडवेल असा धमकीवजा इशारा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून ठाण्यात फेरीवाल्यांची दादागिरी वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. ज्या संबंधित कर्मचार्‍यासोबत हा प्रकार घडला त्याचे बीपी शुटआऊट झाल्याचे समजते. तर याबाबत अद्यापही कोणतीही अ‍ॅक्शन घेण्यात आलेली नसून लवकरच याबाबत कडक पाऊले उचलण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

ऑगस्ट महिन्यात माजीवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपल्या पथकासह कासारवडवली येथे फेरीवाल्यांवर कारवाईला गेल्या होत्या. यावेळी कारवाई सुरू असताना यादव नामक फेरीवाल्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवला. यामध्ये त्यांच्यासह त्यांचा अंगरक्षक पालवे हे दोघे जखमी झाले. दोघांच्या ही हाताची बोटे छाटली गेली. या घटनेची मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षानेही दखल घेतली. याचे पडसाद महासभेत उमटले. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू केली. त्यातच आयुक्तांनी अधिकारी- कर्मचार्‍यांच्या बदल्याही केल्या.

- Advertisement -

पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेला दीड महिना होत नाही तोच सोमवारी माजीवडा- मानपाडा प्रभाग समितीचे काही कर्मचारी हे आलेल्या तक्रारीनुसार कारवाईला गेले होते. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या बंगल्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू होती. त्यावेळी एका नारळ विक्रेत्या फेरीवाल्याने हाती सुरा घेऊन कारवाईला आलेल्या एका कर्मचार्‍यावर धाव घेतली. तसेच, त्यावेळी ‘पहले बोटे छाटी अभी गर्दन उडा दुंगा.’ अशी धमकी दिली. त्यावेळी अन्य तीन कर्मचारी त्या कर्मचार्‍याच्या मदतीला धावून गेल्याने त्या फेरीवाल्याचा राग शांत झाला आणि त्याने हातातील सुरा बाजूला ठेवला. मात्र, सुरा घेऊन फेरीवाला अंगावर धावून आल्याचे पाहून तो कर्मचारी खूपच घाबरला होता. तसेच त्यामुळे त्या कर्मचार्‍याचा बीपीही क्षणात वाढला होता. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.

* त्यावेळी पोलीस बंदोबस्त नव्हता
पिंपळे यांच्या हल्ल्यानंतर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. मात्र, दिलेल्या बंदोबस्तातील मनुष्यबळ आपल्या सोयीनुसार पोलीस दल परत बोलवून घेतात. त्यातच ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळीही पोलीस बंदोबस्तासाठी दिलेले पोलीस बोलवून घेतल्याने कारवाईच्या वेळी बंदोबस्त नव्हता, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

- Advertisement -

‘हा प्रकार खरोखर दुर्दैवी आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नये, याची काळजी महापालिका प्रशासनाने घ्यावी. तसेच कारवाईला जाताना पोलीस बंदोबस्त घेऊन जावे. याबाबत बुधवारी पार पडलेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही मी हे प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय जोपर्यंत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही.’ – मनोहर डुंबरे, गटनेते, भाजप

‘घडलेला हा प्रकार अतिशय गंभीर असून प्रशासनाच्या वतीने देखील या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित फेरीवाल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने या सर्व प्रकारावर कडक आणि तात्काळ कारवाई केली जाईल.’ – अश्विनी वाघमळे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठा.म.पा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -