घरमहाराष्ट्रप्रभाकर साईलची एनसीबीकडून जबाबाची नोंद

प्रभाकर साईलची एनसीबीकडून जबाबाची नोंद

Subscribe

क्रुझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या अटकेनंतर 25 कोटींची डील झाल्याचा आरोप करून सर्वत्र खळबळ उडवून देणार्‍या साक्षीदार प्रभाकर साईल याची मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जबानी नोंदवून घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे पंधरा तास प्रभाकरची जबानी नोंदविण्यात आली होती. दुसरीकडे एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर ज्ञानेश्वर सिंह यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली होती. क्रुझ ड्रग्स पार्टीत आर्यनवर कारवाई केल्यानंतर प्रभाकर साईलने आर्यनला अटक करू नये यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप करून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. त्याची दिल्लीतील एनसीबीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत त्याची चौकशी सुरु केली होती. ज्ञानेश्वर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे.

त्यासाठी एनसीबीची दक्षता पथकाची एक टीम मुंबईत दाखल झाली आहे. या टिमने अलीकडेच झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या काही अधिकार्‍यांची चौकशी केली होती. आतापर्यंत आठ जणांची जबानी नोंदविण्यात आली असून त्यात तीन खासगी व्यक्तींचा समावेश आहे. याबाबत आरोप करणार्‍या प्रभाकर साईलला एनसीबीने समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याची विनंती केली होती. त्याच्या चौकशीशिवाय ही चौकशी पूर्ण होत असल्याने त्याला त्याच्या वकील आणि नातेवाईकामार्फत समन्स बजाविण्यात आले होते. अखेर सोमवारी जगदीश हा एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. सोमवारी दहा तास चौकशी केल्यानंतर त्याला पुन्हा मंगळवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी जगदीश पुन्हा एनसीबी कार्यालयात आला होता.

- Advertisement -

यावेळी त्याची पाच तास कसून चौकशी करून जबानी नोंदविण्यात आली होती. आता आर्यनची संबंधित अधिकार्‍याकडून चौकशी होणार आहे. त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र, आर्यन आजारपणाचे कारण सांगून चौकशीसाठी हजर राहिला नव्हता. दुसरीकडे व्यावसायिक करण सजनानीला मंगळवारी समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याची विनंती केली आहे. सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात एनसीबीने खार येथून अनुज केसवाणीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून व्यावसायिक करण याचे नाव समोर आले होते. तो ब्रिटिश नागरिक असून त्याने विदेशातून एक पार्सल मागविले होते. त्यात ड्रग्ज सापडले होते. याच प्रकरणात त्याची नव्याने चौकशी होणार असून त्यासाठीच त्याला समन्स बजाविण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजनंतर गुन्हा दाखल होणार
25 कोटी रुपयांच्या डिलबाबत आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने तपासाला सुरुवात केली आहे. लोअर परेल ते क्रुझ टर्मिनसदरम्यान सर्व सीसीटीव्ही फुटेज लवकरच पोलीस ताब्यात घेणार आहेत. या फुटेजची तपासणी केल्यानंतर पोलिसांच्या तपासाला दिशा मिळणार आहे. आर्यनच्या सुटकेसाठी एनसीबीकडून 25 कोटींची मागणी झाली होती. त्यासाठी एनसीबीचे पंच किरण गोसावी, सॅम आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददनानी हे लोअर परेल परिसरात भेटले होते. याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर लवकरच पोलिसांकडून गुन्हा दाखल होईल असे सांगण्यात आले. त्यासाठी मुंबई पोलिसांनी एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -