घरमहाराष्ट्रकॉम्बिंग ऑपरेशनमध्ये २६ नक्षलींना कंठस्नान

कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये २६ नक्षलींना कंठस्नान

Subscribe

नक्षल कारवाईला मोठे यश

नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. पोलिसांची मागील तीन वर्षांतील ही सर्वात मोठी कामगिरी समजली जात आहे.

शनिवारी (13 नोव्हेंबर) सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. छत्तीसगडमधून हे नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

या कारवाईत नक्षलींनी केलेल्या गोळीबारात तीन पोलीस जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यात हे जवान जखमी झाले. जखमी पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अजूनही पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असून मोठ्या संख्येत पोलीस तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत.

किशोर कावडो ताब्यात
खून, चकमक तसेच जाळपोळीसारखे गंभीर आरोप असलेल्या तसेच 16 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या नक्षलवाद्याला पोलिसांनी पकडले. खोब्रामेंढा येथे झालेल्या सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता. याच चकमकीत हा नक्षलवादी जखमी झाला होता. किशोर कावडो असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव होते.

- Advertisement -

आमच्या पोलिसांचा मला अभिमान – गृहमंत्री
गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -