घरमहाराष्ट्रनाशिकविद्रोही साहित्य संमेलन;कार्यक्रम पत्रिकेआधीच झाले ३ ठराव

विद्रोही साहित्य संमेलन;कार्यक्रम पत्रिकेआधीच झाले ३ ठराव

Subscribe

कार्यक्रमपत्रिका आणि निमंत्रण पत्रिकेस विलंब होत असताना तीन ठराव मांडण्याचे आयोजकांकडून निश्चित करण्यात आले आहे

नाशिक :शहरात होणार्‍या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनास अवघे १७ दिवस शिल्लक राहिल्याने तयारीला वेग आला आहे. मात्र, अजूनही संमेलनाचे उद्घाटक, कार्यक्रमपत्रिका आणि निमंत्रण पत्रिकेस विलंब होत असताना तीन ठराव मांडण्याचे आयोजकांकडून निश्चित करण्यात आले आहे. तीन दिवसांत उद्घाटक निश्चित केले जाणार असून, कार्यक्रम पत्रिका व निमंत्रण पत्रिका तयार केली जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

नाशिक शहरात संविधानाच्या सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन ४ व ५ डिसेंबर रोजी केटीएचएम महाविद्यालय, गंगापूर रोड येथे होणार आहे. संमेलनाच्या तयारीसाठी डॉक्टर, वकील, विद्यार्थी संघटना, कामगार संघटना, महिला संघटना, मराठी वाचनालय, साहित्यिक संस्था, कवी मंडळे आदी संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता संमेलन उदघाटन रॅली लोकशाहिर वामनदादा कर्डक यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. अण्णाभाऊ साठे पुतळा, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून अशोक स्तंभमार्गे ही रॅली संमेलनस्थळी जाणार आहे. या रॅलीत महापुरुषांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, संविधान प्रस्ताविकाचे फलक, महापुरुषांचे विचार, साहित्यिकांचे विचार असलेले फलक घेऊन कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यावेळी कविता, गीत सादर करत कार्यकर्ते
सहभागी होणार आहे.

संमेलनस्थळी चित्रप्रदर्शन, वामनदादा कर्डक, जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्य प्रदर्शन, अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष सांगतानिमित्त साहित्य प्रदर्शन भरविले जाणार आहे. संमेलनात दोन काव्यसंमेलन, दोन शाहिरी जलसे यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, बालमंचाची उभारणी करण्यात येणार आहे. प्रगतीशील लेखक संघाचे राष्ट्रीय महासचिव व दिल्ली शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग असेल. साहित्यिक सुखदेव सिंग सिरसा यांची विशेष मुलाखतदेखील ऐकण्याची संधी यानिमित्ताने नाशिककर रसिकांना मिळेल.

- Advertisement -

शास्त्रज्ञ व लोकविज्ञान चळचळचे प्रमुख गोवरराजा, भारतीय भाषातज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात विचार व्यक्त करतील. संमेलनात भारतीय संविधान व कामगार कायदे, भारतीय संविधान आणि नागरिकत्व कायदा, भारतीय संविधान आणि आरक्षण, भारतीय संविधान आणि शेतकरी कायदे इ, विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.यावेळी स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, किशोर ढमाले, राजू देसले, गुलाम शेख, गणेश उन्हवणे, व्ही. टी. जाधव, अ‍ॅड. शरद कोकाटे, प्रा. नारायण पाटील, प्रभाकर धात्रक, चंद्रकांत भालेराव, साराभाई वेळूंजकर, डॉ. अनिल सोनवणे, शिवदास म्हसदे, जयंत खडताळे, अर्जुन बागूल, एल. जे. गावित, मन्साराम पवार, समाधान बागूल, यशवंत बागूल, अश्फाक कुरेशी, तुळशीराम जाधव, शाहीर प्रसाद अंतरवेली, शितल पाटील, जयंत पुष्प उपस्थित होते.

असे आहेत ठराव :                             

१.विद्रोही साहित्य संमेलनात निवडणुकीवेळी मतदान करताना ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा
२.शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे
३.नाशिक येथील विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे, असे तीन ठराव मांडले जाणार आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -