घरफिचर्ससारांशभाव अंतरीचे हळवे...

भाव अंतरीचे हळवे…

Subscribe

मुख्य म्हणजे खानोलकर आणि दळवी गाडीत असताना ही वसंत सावंतची भूमी म्हणताना ज्याप्रकारे म्हणाले त्याचा अर्थ वसंत सावंत हे जग सोडून गेले आहेत आणि सावंत सरांच्या आधी खानोलकर आणि दळवींनी ह्या जगाचा निरोप कितीतरी वर्षे आधी घेतला. स्वप्नच ते! वास्तवाशी त्याचा संबंध कसा असेल? तरी देखील वेगवेगळ्या पिढीतील लेखकांची मला स्वप्नातील भूमिका फार महत्वाची वाटते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे लेखन हा अंतरीचा उमाळा असतो.

रात्रीची तीन वाजायची वेळ. बिछान्यातून उठून बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतून पाणी प्यायलो,आणि पुन्हा बिछान्यावर आडवा झालो. एवढ्या रात्री कशाने बरं झोप उडाली?. रात्री एकदा झोप लागली की, सकाळी सहाचा अलार्म वाजल्याशिवाय जागच येत नाही, मग ह्यावेळेला का बरं अस्वस्थ वाटत असेल?. मघाशी पडलेल्या स्वप्नाने मी काहीसा अस्वस्थ झालो होतो. अस्वस्थ होण्यासारखेच स्वप्न होते. स्वप्नात मी, जयवंत दळवी, आरती प्रभू माझ्या गाडीतून सावंतवाडीत आलो. मध्येच मोतीतलावाच्या बाजूने गाडी घेत असताना खुद्द आरती प्रभू म्हणाले, ही वसंत सावंतची भूमी. मोठा मनस्वी कवी.

एका मोठ्या कवीने दुसर्‍या मोठ्या कवीला दिलेली ती दाद होती. तिथूनच आम्ही गाडी वळवली आणि सबनीस वाड्याकडे निघालो. इथे बांदेकर रहातो, गेले कित्येक दिवस त्याला भेटायचे आहे असं दळवी म्हणाले आणि आम्ही प्रवीण बांदेकरांच्या घरी गेलो. गप्पा चालल्या होत्या. काय गप्पा झाल्या हे आता नेमके आठवत नाही, पण बांदेकर लेखकाच्या भूमिकेवर बोलत होते आणि आरती प्रभू म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर त्यांच्या कादंबरीतील पात्रे मांडताना आपली भूमिका काय होती हे बोलत राहिले आणि दळवी त्यांच्या नाटकात, कादंबरीत आलेली पात्रे नुसती रोमांटिक नसून कशी ठोस भूमिका घेतात याविषयी सांगत होते.

- Advertisement -

स्वप्नातला असा मोघम तपशील आठवतो. ह्या स्वप्नानंतर झोप येणं शक्यच नव्हतं. त्या स्वप्नाचा अर्थ लावत बसलो. कशाचा संबंध लौकिकदृष्ठ्या लागत नव्हता. आज बांदेकरांचे वय पहाता आरती प्रभू त्यांना भेटले असतील याची शक्यता नव्हती. दळवी त्यांना भेटले असतील तेव्हा बांदेकरांच्या लेखक म्हणून जाणिवा किती विस्तारल्या असतील? मुख्य म्हणजे खानोलकर आणि दळवी गाडीत असताना ही वसंत सावंतची भूमी म्हणताना ज्याप्रकारे म्हणाले त्याचा अर्थ वसंत सावंत हे जग सोडून गेले आहेत आणि सावंत सरांच्या आधी खानोलकर आणि दळवींनी ह्या जगाचा निरोप कितीतरी वर्षे आधी घेतला. स्वप्नच ते! वास्तवाशी त्याचा संबंध कसा असेल? तरी देखील वेगवेगळ्या पिढीतील लेखकांची मला स्वप्नातील भूमिका फार महत्वाची वाटते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे लेखन हा अंतरीचा उमाळा असतो. आपल्या लेखनात येणार्‍या गोष्टींमध्ये आपण व्यक्ती म्हणून कुठेतरी दिसलो पाहिजे. मला लेखक म्हणून असलेली ही ओळख फार महत्वाची वाटते.

आपल्या अंतरात जे विचार येतात, त्यांना कागदावर कथा किंवा कवितेच्या माध्यमातून मांडले जाते, त्यातून लेखक म्हणून आपण आपली भूमिका ठरवत असतो. ह्या विचारांचा गळा जेव्हा आपला आपणच दाबून ठेवतो तेव्हा त्या विचारांशी आपली भूमिका पक्की नसते का? याबाबतीत मला हारूकी मुराकामी या लेखकाचे एक वाक्य सहज आठवते if you only read the books that everyone else is reading you can only think what everyone else is thinking
असं म्हणताना तो पुढे काय म्हणतो ते यापेक्षा फार महत्वाचे आहे. ‘Exerting yourself to the fullest within your individual limits: that’s the essence of running, and metaphor of life and for me, for writing as well’

- Advertisement -

याचा अर्थ लेखकाला केवळ भवतालाचा विचार करायचा नसतो, तो मांडत असताना आजूबाजूला घडणारी विसंगती सगळ्या बाजूने विचार करून मांडून त्यातून स्वतःचे असे काही निष्कर्ष काढायचे असतात, त्यातून वाचकाला विचार करायला लावता आला पाहिजे.

खानोलकर मला ग्रेटच वाटतात आणि ते होतेच. ‘कोंडुरा’मध्ये त्यांनी जी पात्रे रंगवली तशी पात्रे आपल्याला का दिसत नाहीत. ही माणसे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण वाचण्याच्या आणि अनुभवण्याच्या पलीकडे ही माणसे ह्या खानोलकरांना कशी दिसली याचा विचार करताना मती कुंठीत होते. विद्यापीठातल्या अनुभवावर त्यांनी रंगवलेले हेड क्लर्क मला तसा कधीच दिसला नाही. ही विटकी, कळकट माणसे कुठेनाकुठे असतील ना? ही माणसे कथेत आणण्यासाठी खानोलकरांनी प्रतिभेची केवढी पराकाष्ठा केली असेल. लेखकाला ह्या सगळ्या घटनांना न्याय देण्यासाठी कधीतरी कल्पनेच्या पलीकडे जावे लागत असेल ना? केवळ घटना अशा शब्दात मांडून थेट सांगणे हे लेखकाचे काम नक्कीच नाही. अगदी चित्रपटासारख्या घटना लिहून लेखकाचे लेखकत्व कसं प्रकट होईल.

दळवींनी ‘महानंदा’ किंवा ‘चक्र’मध्ये जी माणसे किंवा पात्रे निवडली ती देखील आपल्या लेखक म्हणून संपूर्ण ताकद वापरून निर्माण केली असतीलच की. ही पात्रे घडवताना लेखक म्हणून जास्तीचे काय असेल असते ते खर्ची करावे लागतेच. भावना, संवेदना ह्यांचा ओलावा लेखनात मुळचा असावा लागतोच. तो ओलावा नसेल तर ते लेखन म्हणजे केवळ शब्दांचा निर्माण केलेला बुडबुडा नाही का? ‘चक्र’मधली उघडीनागडी लैंगिकता मांडताना दळवींना पुढील परिणामाची कल्पना असेलच ना? तरीही पुन्हा अंतरीचे धावे ते लेखनातून प्रकट झालेच पाहिजे.

दळवींनी निर्माण केलेले वेडे हे प्रत्यक्षात तसेच असतील का? ते कागदावर मांडताना त्यांनी केवळ आपली शाब्दिक प्रतिभा नाही तर कल्पनेच्या पलीकडे जाऊन त्या पात्राची अनुभूती घेतली असेल ना! साहित्य काळानुसार बदलत असते ही गोष्ट जरी खरी असली तरी काही गोष्टी ह्या कालातीत असतात. मानवी जीवन, त्यातील नैतिक-अनैतिक संबंध हे कालातीत आहेत. त्यांची वेगवेगळ्या पातळीवर मांडलेली उकल हीदेखील तेवढीच खरी आहे म्हणून ‘पाषाणपालवी’ ही खानोलकर यांची कादंबरी आजच्या घडीलादेखील तेवढीच अस्सल वाटते. त्यातील नायिका जरी बंडखोर असली तरी काळाच्या पुढे आहेच. ‘अधांतरी’मधली सावू आताही तेवढीच प्रिय आहे. तिची अम्मादेखील मला तेवढीच बंडखोर वाटते. स्त्रीवाद ह्या पात्रांच्या पुढे अंगुलीभर जाईल असं नाही वाटणार.

लेखकाला हे सर्व मांडताना ती मांडणी स्वतःला व्यक्ती म्हणून पटवून घ्यावी लागते. त्यातील सत्य हे स्वतःला लावून घ्यावे लागते. मला आठवते, मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो तेव्हा, गावच्या चुलत्यांनी माळ्यावरची ट्रंक खाली काढली. त्यात अनेक कागदपत्रे होती. अनेक कागद मोडी लिपीत लिहिलेले होते. मला मोडी लिपी वाचता येते. मी एक एक कागद वाचून बाजूला ठेवत होतो. अचानक एका कागदाची पुडकी सापडली. त्यात आठ दहा कागद होते. कागद वाचायला लागलो आणि एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हा सगळा आमच्या घराचा इतिहास. मोडी लिपीत लिहिलेला.

तो इतिहास दुसर्‍या तिसर्‍या कोणी लिहिला नसून खुद्द माझ्या आजोबांनी लिहिलेला. घरातल्या कुठल्या ना कुठल्या प्रसंगाची त्रोटक माहिती. समारंभात झालेले हिशोब, त्याची माहिती. अनेक जागांची माहिती. घरातल्या पूर्वजांची माहिती असे अनेक काही. मला विचार पडला की ही सर्व माहिती आजोबांनी मोडीत का लिहून ठेवली? हे सर्व जर त्यांनी देवनागरीतून लिहिले असते तर आजोबा गेल्यानंतर कोणीतरी वाचले असते की कोणी वाचू नये म्हणून त्यांनी मोडीत लिहून ठेवले होते. आजोबा भिडस्त स्वभावाचे होते. स्वतःबद्दल त्यांच्या मनात एक न्यूनगंड होता. त्यामुळे आपले लेखन किंवा काही टिपणे त्यांनी तशीच ठेऊन दिली होती असे वाटते.

मनासारखे लिहिले किंवा वाचले की हळूहळू आपण रिते होत असतो. रितेपणा कसला तर तो मनात साचलेल्या विचारांचा. आजोबा त्याकाळात कोणाशी यासंबंधी बोलू शकत नव्हते, मग अंतरी जे होते ते बाहेर काढण्यासाठी तर त्यांनी लिहिण्याचा मार्ग अवलंबला नसेल का? त्यादिवशी पडलेल्या त्या स्वप्नाने ह्या सगळ्या विचाराला पुष्टी दिली. खानोलकर जे बांदेकरांना सांगत होते ते कदाचित आम्हा सगळ्यांना सांगत असावेत किंवा माझ्याच मनात चाललेली विचारांची घालमेल खानोलकरांच्या रूपाने शब्दात प्रकट झाली असेल. शेवटी तुकोबा म्हणतात तेच खरे ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -