घरठाणेडोंबिवलीत मोरारजी देसाईंच्या चित्राला काळे फासले

डोंबिवलीत मोरारजी देसाईंच्या चित्राला काळे फासले

Subscribe

मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवली पूर्वेतील 90 फूट रोडवरील भिंतीवर थोरपुरुषांची भित्तीचित्र काढण्यात आली आहेत. यामध्ये मोरारजी देसाई यांचेही चित्र असून यावर मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला. शनिवारी सायंकाळी समितीच्या डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी देसाई यांच्या चित्राला काळे फासून निषेध नोंदवला.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेचा स्वीकार करत लोकशाही गणराज्य निर्माण केले. भारतात इतर राज्यांना त्यांच्या भाषिक अस्तित्वाप्रमाणे राज्य मिळाली. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला उपेक्षा येत द्विभाषिक संकल्पना माथी मारण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारकडून करण्यात आला. याला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समिती निर्माण झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषवाक्याखाली महाराष्ट्रातील मराठी समाज अन्यायाच्या विरोधात पेटून उठला. संवैधानिक पद्धतीने लढा देणार्‍या शांतीप्रिय मराठी माणसांवर तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबारचा आदेश दिला. त्यामध्ये 107 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली. अखेर मराठी माणसांच्या मागणीसमोर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना त्यांचा हट्ट सोडून मुंबईसह महाराष्ट्र द्यावाच लागला.

- Advertisement -

मराठी समाजाच्या रक्ताने ज्या राजकीय व्यक्तीचे हात रंगलेले आहेत. त्या व्यक्तीचे मराठी माणसाचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात उद्दातीकरण होणे ही खेदाची गोष्ट आहे. मराठी एकीकरण समिती डोंबिवली शहरच्यावतीने या गोष्टीचा निषेध करण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या चित्राला काळे फासून आंदोलन केल्याचे सागर घाणे यांनी सांगितले. त्यानंतर काही वेळाने टिळकनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. समितीच्या पदाधिकार्‍यांनी आम्हीच हा प्रकार केल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष दिनेश सावंत, सचिव संदीप माने, कृष्णा जाधव, कलाकार पार्थ शिंगाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -