घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआखिर तुम्हे आना हैं...

आखिर तुम्हे आना हैं…

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करताना शिवसैनिकांना उद्देशून केलेल्या भाषणात पुढील दिशा स्पष्ट केली. भाजप हा नंबर वन शत्रू असल्याप्रमाणे विविध टीकास्त्र सोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर भापजने शिवसेनेवर जी काही ‘जनाबी’ टीका केली त्याचा उद्धव ठाकरे यांनी ठाकरी भाषेत ‘खान’ समाचार घेतला. सुरुवातीला युती करताना त्यांचे हिंदुत्व हे एकच होते. आता त्या हिंदुत्वाचीही फाळणी झालेली आहे. हिंदूंसाठी हिंदुस्तान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान, या जिनांच्या सूत्रानुसार भारताची फाळणी झाली आणि हिंदुस्तान आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. पण पुढे कधी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकत्र आलेले दोन पक्ष हिंदुत्वाचीही फाळणी करतील, अशी कुणी कल्पनाही केली नसेल. पण राजकारणात काहीही होऊ शकते. त्याचे खास उदाहरण म्हणजे सध्या राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे आहे.

नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर येऊन भाजपला केंद्रात बहुमत मिळवून देईपर्यंत महाराष्ट्रातील भाजप नेते आतून अस्वस्थ असले तरी बाहेरून शांत असल्याचे दाखवत होते. पण जेव्हा देशात मोदी लाट आली आणि भाजपला केंद्रात बहुमत मिळाले तेव्हा मात्र आपण पुढाकार घ्यायला हवा. आता आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, असे भाजप नेत्यांना वाटू लागले. कारण शिवसेनेशी युती ठेवली तर त्याचा फुकटचा फायदा त्यांना होणार आणि पुन्हा त्यांचाच मुख्यमंत्री बनणार, असे त्यांना वाटू लागले. शिवसेनेच्याही भाजपची ही हालचाल लक्षात आली होती. या ओढाताणीतच मग हिंदुत्वाच्या रक्षणासाठी स्थापन झालेली युती २०१४ च्या राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी तुटली. त्यानंतर निवडणूक प्रचारात भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले. शिवसेनेवर टीका न करण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या राज्यातील नेत्यांनी घेतले होेते.

- Advertisement -

पण शिवसेनेने मात्र भाजपला आणि त्यांच्या केंद्रातील प्रमुख नेत्यांना विविध मुस्लीम शासकांच्या उपमा देऊन अक्षरश: सोलून काढले होेते. शिवसेनेकडून होणार्‍या टीकेने जहालतेचे इतके टोक गाठले होते की, यापुढे भाजपशी आम्हाला काही देणे घेणे नाही, असेच त्यांना दाखवून जनतेला सांगायचे होते की, तुम्ही आम्हाला बहुमत द्या. शिवसेनेने आपले सगळी आक्रमकता पणाला लावली होती. पुढे भाजप आणि शिवसेनेची अटीतटीची झुंज झाली, पण त्यात कुणालाच बहुमत मिळाले नाही. भाजपचे १२२ आमदार निवडून आले. भाजपने सत्तास्थापनेचा दावा तर केला होता, पण बाकीचे आमदार कुठून आणणार हा प्रश्न पडला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे सरकार विधानसभेत तांत्रिकदृष्ठ्या वाचवले होते.

पण भाजप आणि राष्ट्रवादी हे काही नेैसर्गिक मित्र नाहीत. त्यामुळे काही काळ हे सरकार चालले तरी पुढे अडचणी येणार हे भाजपमधील थिंक टँकला वाटत होते. त्यामुळे शिवसेनेला सहभागी करून सत्ता स्थापन करावी, असे त्यांना वाटत होते. त्यानंतर सगळ्यांच्या प्रयत्नातून शिवसेना भाजपसोबतच्या सत्तेत सहभागी झाली आणि पुढे मंत्र्यांचे राजीनामे खिशात ठेवून पाच वर्षे सत्तेत राहिली. मध्यंतरीच्या काळात काही महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यावेळीही भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर टीका करताना हातचे काही राखून ठेवले नाही. पण पुन्हा जागा कमी पडल्या की, पुन्हा एकत्र आल्याचे दिसले. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदारांना आश्चर्याने तोंडात बोटे घालण्यावाचून अन्य पर्याय उरलेला नव्हता.

- Advertisement -

भाजप आणि शिवसेना यांचे मिलना बिछडना और फिर मिलना, हे लोकांनी पुन्हा पुन्हा पाहिलेले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर केंद्राची पुनरावृत्ती राज्यात होईल, असे देवेंद्र फडणवीस यांना वाटत होते. मराठी माणूस दूर जाऊ नये, म्हणून शिवसेनेशी युती असावी, असे त्यांना वाटत होते. पण भाजपला बहुमत मिळाले नाही. त्यात पुन्हा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर शिवसेना काहीही करायला तयार होती. तीच संधी हेरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकल्पित असा फॉर्म्युला तयार करून महाविकास आघाडीचे सरकार आणले. या तीन पक्षांचे सरकार गेली अडीच वर्षे चालले आहे खरे, पण ती एक राजकीय गरज म्हणून. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारसरणी जुळणारी आहे, पण शिवसेनेची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे दीर्घकाळ एकत्र वाटचाल करणे अवघड दिसते.

कारण काळ जसा पुढे सरकतो, तशी एकमेकांच्या विचारसरणींच्या गोष्टी एकमेकांना खटकू लागतात. दोनच दिवसांपूर्वी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आपल्या पक्षाला महाविकास आघाडीत सहभागी करण्याची ऑफर दिली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे त्याचे स्वागतही करून मोकळ्या झाल्या. पण ही ऑफर शिवसेनेच्या विचारसरणीला परवडणारी नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याला सडकून विरोध केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकवेळ एमआयएमवाल्यांना शुद्ध करून घेतील, शिवसेनेला ते जमणार नाही. सत्तेत असलेल्या शिवसेनेने शिवजयंती तिथीनुसार साजरी केली, तर सत्तेतील सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शासकीय तारखेनुसार शिवजयंती साजरी करतात, असे अनेक फरक पुढे येतील. शिवसैनिकांना या दोन पक्षांच्या कार्यर्त्यांसोबत काम करताना वेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसेनेसारखे ज्वलंत हिंदुत्व अंगीकारू शकत नाहीत.

पण शिवसेना ते सोडू शकत नाही. त्यामुळे पुढील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अडचण होणार आहे. त्यामुळे आज जरी सत्तेसाठी हे दोन पक्ष सोबत असले तरी पुढील काळात राज्यात दोघांचे मिळून बहुमत कसे येईल आणि शिवसेनेला बाजूला कसे ठेवता येईल, असाच त्यांचा प्रयत्न असेल. राज्यात झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ वाढले आणि शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, यातून पुढील संकेत मिळत आहेत. तसेच भाजपने राज्यात कितीही स्वबळाची भाषा केली तरी त्यांना काही जागा कमी पडतात, हे दिसून आलेले आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेची मदत घ्यावीच लागते. त्याचबरोबर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेला घरोबा हा काही काळ सोयीचा असला तरी विचारसरणीच्या फरकामुळे तो दीर्घ काळ टिकणे अवघड दिसते. त्यामुळे भाजपसोबत त्यांना जुळवून घ्यावे लागेल, यापूर्वीही त्यांनी बरेचदा तसे केलेले आहे. थोडक्यात काय तर आखिर तुम्हे आना हैं…जरा देर लगेगी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -