घरमहाराष्ट्रअभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांची सुट्टी कायम

अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांची सुट्टी कायम

Subscribe

शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण

विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीवर कोणत्याही प्रकारची गदा येणार नसून, ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसेल, त्याच शाळा एप्रिलअखेरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. ज्या शाळांमधील अभ्यासक्रम व परीक्षा पूर्ण झाल्या असतील त्या विनाकारण सुरू ठेवण्याचे काहीही कारण नसल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांंढरे यांनी सांगितले. एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यामुळे शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.

पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत सुरू ठेवण्याच्या आणि एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यामध्ये परीक्षा घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना दिल्या होत्या. मात्र अनेक शाळांमध्ये सध्या नववीची परीक्षा सुरू असून, शाळांकडून अन्य वर्गांच्या परीक्षांचे नियोजन करून प्रश्नपत्रिकाही तयार केल्या आहेत. तसेच अनेक पालकांनी गावाला जाण्याचे तिकिटाचे आरक्षण केले आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.

- Advertisement -

मात्र यावर आता शिक्षण आयुक्तांनीच स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना काळात काही कारणास्तव अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या शाळांसाठी हे निर्देश दिले आहेत. तसेच मे महिन्यांमध्ये शाळा सुरू ठेवाव्यात, असे या परिपत्रकामध्ये कोठेही म्हटलेले नाही. त्यामुळे मुलांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -