घरदेश-विदेशलग्नाला नकार दिल्याने त्याने केली स्वत:च्या आई-वडिलांची हत्या

लग्नाला नकार दिल्याने त्याने केली स्वत:च्या आई-वडिलांची हत्या

Subscribe

मैत्रिणीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने एका तरुणाने स्वत:च्या आई-वडीलांची हत्या केलीय. दिल्लीतील जामिया नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. आरोपी अब्दुल रहमानने आई-वडीलांच्या हत्येसाठी दोन गुंडांना सुपारी दिली होती. या दोघांच्या मदतीने अब्दुलने ही हत्या केली. दिल्ली पोलिसांनी आरोपी मुलासह दोघांना अटक केली आहे

फेसबुकवरुन झाली मैत्री –
दिल्लीच्या जामिया नगरमध्ये आरोपी अब्दुल रहमान आई-वडीलांसोबत राहत होता. २६ वर्षीय अब्दुल हा पालकांचा एकुलता एक मुलगा होता. अब्दुलची फेसबुकवरुन कानपूरमधील एका महिलेशी मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन वर्षांपासून अब्दुल आणि या महिलेमध्ये मैत्री होती. अब्दुल कॉल सेंटरमध्ये कामाला होता. मात्र नशेच्या आहारी गेल्याने त्याची नोकरी गेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

दुसरं लग्नानंतरही होते विवाहबाह्य संबंध –
अब्दुलचे लग्न झाले असताना देखील त्याचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. अब्दुलचा पहिला घटस्फोट झाला होता. आई-वडिलांच्या म्हणण्यावरुन त्याने २०१७ मध्ये दुसरे लग्नही केले होते. दरम्यान अब्दुलची फेसबुकवरुन कानपूरच्या एका महिलेशी मैत्री झाली होती. तो नेहमी या मैत्रिणीशी फोनवरुन गप्पा मारायचा तसंच अधून-मधून त्यांची भेट देखील होत होती. त्याने या मैत्रिणीला लग्नाचे आश्वासन दिले होते, असं पोलीस आयुक्त चिन्मॉय बिस्वाल यांनी सांगितले.

आई-वडीलांच्या हत्येची दिली सुपारी –
फेसबुक मैत्रिणीसोबत लग्न करायचं असल्याचा प्रस्ताव अब्दुलने त्याच्या आई-वडीलांसमोर मांडला. मात्र त्याच्या आई-वडीलांनी या लग्नाला नकार दिला. याचा राग मनात धरुन अब्दुलने दोन गुंडांना आई-वडीलांच्या हत्येची सुपारी दिली. अब्दुलने नदीम खान आणि गुड्डू यांना अडीच लाख रुपये देण्याचे आश्वासन देत हत्या करण्यास सांगितले.

- Advertisement -

अशी केली हत्या –
२८ एप्रिल रोजी अब्दुलने सुपारी दिलेल्या दोघांना रात्री घरी बोलावले. आई-वडील झोपेत असताना या तिघांनी त्यांची हत्या केली. या हत्येनंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अब्दुलच्या घराच्या पहिल्या मजल्यावर तस्लीम बानो (५०) आणि शामीम अहमद (५५) हे मृतावस्थेत आढळले. या दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एम्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टम अहवालानुसार त्यांचा मृत्यू गुदमरुन झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन तपास सुरु केला. २१ मे रोजी पोलिसांनी अब्दुल यांची कसुन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जवळपास एका महिन्यानंतर या हत्याप्रकरणाचा उलघडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -