घरताज्या घडामोडीMumbai Loadshading: ऐन विजेच्या भारनियमनातच वीज कंपन्यांच्या दाव्यांनी वाढवला उकाडा

Mumbai Loadshading: ऐन विजेच्या भारनियमनातच वीज कंपन्यांच्या दाव्यांनी वाढवला उकाडा

Subscribe

मुंबईसह महानगर क्षेत्रात आज तांत्रिक बिघाडामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला खरा, पण मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दाव्यामुळे उकाड्यात आणखीच भर पडली. महापारेषणच्या पडघ्यातील तांत्रिक बिघाडाचा फटका म्हणजे मुंबईसह महानगर क्षेत्रात भारनियमन करण्याची वेळ आली. पण वीज कंपन्यांनी बिघाडाचे कारण सांगतानाच एकमेकांवर टिप्पणी करण्याची संधी सोडली नाही. टाटा पॉवर आणि अदाणी मुंबई इलेक्ट्रिसिटी लिमिटेडने केलेल्या दाव्यामुळे कंपन्यांच्या वक्तव्याची चांगलाच उकाडा निर्माण झाला.

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने विजेचे आऊटेज हे टाटा पॉवरच्या धारावी रिसिव्हिंग स्टेशनच्या ठिकाणाहून झाल्याचा दावा केला. महापारेषणच्या ४०० केव्ही लाईनच्या ट्रिपिंगमुळे चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, सांताक्रूझ आणि वांद्रे या भागातील वीज ग्राहकांना भारनियमनाचा फटका बसल्याचे एईएमएलच्या प्रवक्याने स्पष्ट केले. पण एईएमएलने दाखवलेल्या तत्परतेमुळे ४० मिनिटांतच वीज ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचा दावा एईएमएलने केला आहे.

- Advertisement -

तर टाटा पॉवरने एईएमएलचा दावा खोडून काढला आहे. टाटा पॉवरच्या धारावी रिसिव्हिंग स्टेशनमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचा एईएमएलचा दावा हा चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण टाटा पॉवरने दिले आहे. आजचा तांत्रिक बिघाड हा महापारेषणच्या ४०० केव्ही पडघा पारेषण वाहिनीच्या ट्रिपिंगमुळे झाल्याचा दावा टाटा पॉवरने दिलेल्या स्पष्टीकरणात करण्यात आला आहे. टाटा पॉवरच्या खुलाशावर एईएमएलनेही प्रतिसाद नोंदवत प्रत्यूत्तर दिले आहे. टाटा पॉवरने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातच टाटा पॉवरचे धारावी सबस्टेशन ट्रिप झाल्याचे म्हटले आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटीने फक्त सत्य परिस्थिती मांडली आहे. तसेच टाटा पॉवरचे धारावी उपस्टेशन हे महापारेषणच्या आऊटेजमुळे ट्रिप झाल्याचे म्हटले आहे. परिणामी मुंबई उपनगरात वीज पुरवठा खंडीत होण्यावर परिणाम झाल्याचे एईएमएलने आपल्या खुलाशात म्हटले आहे. या घटनेनंतर तत्काळ कारवाई करत अवघ्या ४० मिनिटात वीज पुरवठा पूर्ववत केल्याचेही एईएमएलने म्हटले आहे.

राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोणतेही भारनियमन झाले नसले तरीही तांत्रिक बिघाडामुळे महावितरणसह मुंबई क्षेत्रातही भारनियमन करण्याची वेळ आली. महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील बिघाडाचा फटका हा मुंबई शहर, उपनगरासह मुंबई महानगर क्षेत्रातील वीज ग्राहकांना बसला. त्यामुळे मुंबईसह महानगर क्षेत्रामध्ये भारनियमन करण्याची वेळ वीज वितरण कंपन्यांवर आली. या तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. या प्रकरणी महापारेषणने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सकाळच्या एन वीज मागणीच्या वेळेत वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई शहरातही भारनियमन करण्याची वेळ ओढावली. मुंबईत टाटा पॉवर, बेस्ट उपक्रम तसेच अदाणीच्या वीज ग्राहकांनाही या भारनियमनाचा फटका बसला. तर महानगर क्षेत्रात महावितरणच्या भागातही भारनियमन झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

- Advertisement -

नेमक काय घडलं ?

महापारेषणच्या ४०० के. व्ही. अति उच्च दाब पडघा उपकेंद्रात सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी ४०० के. व्ही. एचव्हीडीसी-२ बे आयसोलेटरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पडघा उपकेंद्रातील सर्व ४०० के. व्ही. व २२० के. व्ही. वाहिन्या बंद पडल्या. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर कामे करून वीजपुरवठा तात्काळ सुरळीत केला.

कुठे किती भारनियमन ?

महापारेषणच्या पडघा येथील उपकेंद्रात तांत्रिक बिघाडामुळे २२० के. व्ही. टेमघर, पाल, वाडा, वसई, कोलशेत, कलरकेम, आनंदनगर, जांभूळ, पलावा तसेच १०० के. व्ही. भिवंडी, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, मोहणे, पीसे, पंजरपूर, डोंबिवली या उपकेंद्रातील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे समांतर वाहिन्यांवर भार येऊन बोईसर, बेलापूर, खारघर, वाशी या ठिकाणी लोड ट्रिमिंग स्कीम (LTS) कार्यान्वित झाल्या. एकूण ५१८ मेगावॅटचे स्वचलित भारनियमन झाले. तसेच ४०० के. व्ही. तळेगाव, ४०० के. व्ही. खारघर या वाहिन्यांवरील भार कमी करण्यासाठी मुंबई व उपनगरात (चेंबूर, धारावी, गोवंडी, चुनाभट्टी, मानखुर्द आणि वांद्रे) या भागात ४९८ मेगावॅट एवढे भारनियमन करण्यात आले.

60 मिनिटांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत

सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत भिवंडी, टेमघर, वसई, डोंबिवली, मुलुंड, बेलापूर, ठाणे, वाशी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड व शहापूर येथील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. मुंबई शहर व उपनगर परिसरात सुमारे २२५० मेगावॅट ते २३५० मेगावॅट इतके भारनियमन करण्यात आले. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे वीजपुरवठा ३० ते ६० मिनिटांत पूर्ववत सुरळीत करण्यात आला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -