घरअर्थजगतप्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी हे तपासा अन्यथा गंडवले जाल

प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी हे तपासा अन्यथा गंडवले जाल

Subscribe

सामान्य माणूस पै-पै जमवून घर, प्लॉट, फ्लॅट किंवा शेतजमीन खरेदी करतो. आयुष्यभराची पुंजी त्यात खर्ची होते. मात्र, अनेकदा ही मालमत्ता खरेदी करताना विविध प्रकारे फसवणूक होते.

नाशिक : शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या एका भूखंडावरील ३० पैकी २९ प्लॉट्सची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यात नाशिकच्या मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांच्याच परिवारातील सदस्यांचा सहभाग असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात बोगस व्यक्ती उभे करून बनावट स्वाक्षरी व दस्तावेज करून प्लॉट्सची विक्री केली गेल्याचे समोर आले आहे. काही फसवणुकीच्या प्रकरणांमुळे सर्वच प्रकरणांकडे संशयाने बघितले जाऊ लागले आहे.

  • त्यामुळे प्लॉट खरेदी करताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती.

सामान्य माणूस पै-पै जमवून घर, प्लॉट, फ्लॅट किंवा शेतजमीन खरेदी करतो. आयुष्यभराची पुंजी त्यात खर्ची होते. मात्र, अनेकदा ही मालमत्ता खरेदी करताना विविध प्रकारे फसवणूक होते. कधी विक्री करणारा फसवतो तर कधी यंत्रणा गफलत करते. नाशिक जिल्ह्याचा विचार करता प्लॉट खरेदीत फसवणूक झाल्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. सर्वसामान्यांनाच नव्हे तर गायक सुरेश वाडकर यांनाही असाच अनुभव आला. याप्रकरणाची दखल घेत तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी जमीन व्यवहारातील फसवणुकीवर आधारित भूमाफीया ही लघुचित्रफित प्रकाशित केली होती. त्यावरून महसूल अन् पोलीस यांच्यात चांगलेच वाक्युध्द रंगले होते. परंतू, गंगापूर येथील एक प्रकरण समोर आल्याने फसवणुकीचे प्रकार सुरूच असल्याचे यानिमित्ताने चव्हाट्यावर आले. विशेष या अशा फसवणुकीत मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांच्याच पत्नीसह सासर्‍यांचा समावेश स्पष्ट झाल्याने, खरेदी-विक्री व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.
यासंदर्भात नाशिक बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अ‍ॅड. वैभव शेटे यांनी प्लॉटस खरेदी करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे प्लॉट, जमीन खरेदी करताना जर काळजी घेतली तर नागरिकांची फसवणूक टाळणे शक्य होईल, असेही अ‍ॅड. शेटे यांनी सांगितले.

- Advertisement -

प्लॉट खरेदी करताना ही खबरदारी

  • मिळकतीचे ५० वर्षांचे रेकॉर्ड तपासावे
  • ६ ‘ड’ ८ अ फेरफार नोंदी तपासाव्यात
  •  कोर्टाच्या इनपूट रजिस्टरद्वारे काही दावे प्रलंबित आहेत का, हे बघावे
  • मिळकत निर्वेध असलेबाबत वर्तमानपत्रांमध्ये जाहीर नोटीस देणे गरजेचे
  • मूळ दस्त आहे का ते तपासावे
  • सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील इंडेक्स २ रेकॉर्ड तपासावे
  • मिळकतीसंदर्भात टायटल व्हेरिफिकेशन बंधनकारक
  • वकिलामार्फत सर्च रिपोर्ट काढावा
  • खरेदी देणार्‍याची वैधता तपासणे गरजेचे

प्रॉपर्टीचे डिटेल्स घेणे आवश्यक

कुठल्याही प्रॉपर्टीची रजिस्ट्री ऑनलाईन होते. जेव्हा एखादी प्रॉपर्टी विकत घेण्याचा निर्णय तुम्ही घेता, तेव्हा सर्वप्रथम ती प्रॉपर्टी आपल्या अगोदर अन्य व्यक्तीला विकलेली नाही ना किंवा या मिळकतीवर ताबेगहाण तर नाही ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी त्या भागातील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन त्या प्रॉपर्टीचे सर्व डिटेल्स घ्यावेत. त्या प्रॉपर्टीचा काही व्यवहार झालाय की नाही हे त्यावरुन समजते. यात खरेदीखत, इसारपावती झालेली असेल तर तीसुद्धा लगेच निदर्शनास येईल. तसेच काही बँका नोंदणीकृत गहाणखत करून कर्ज देतात. या गहाणखताची नोंददेखील या कार्यालयात होते. याबद्दलही पडताळणी करता येऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -