घरमुंबईशिवसेना देणार सहावा उमेदवार, संभाजीराजेंचा मार्ग खडतर

शिवसेना देणार सहावा उमेदवार, संभाजीराजेंचा मार्ग खडतर

Subscribe

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सहावा उमेदवार देण्याचे शिवसेनेने जाहीर केल्याने संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग अवघड बनला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होत आहे.

राज्यातील ६ जागांसह देशात राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातून भाजपचे पियुष गोयल,विकास महात्मे,विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह काँग्रेसचे पी. चिदंबरम, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आल्याने ही निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर उमेदवार देण्यात येणार असल्याचे आज जाहीर केले. हा निर्णय कायम राहिला तर संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना उमेदवाराचा सामना करावा लागेल.

- Advertisement -

विधानसभेतील पक्षीय बलानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रत्येकी एक तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून जाणार आहेत. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे अतिरिक्त मते नाहीत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र शिवसेनेने सहावा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची घोषणा केल्याने संभाजीराजे छत्रपती यांच्या अडचणी वाढणार आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांचे सर्वपक्षीय आमदारांना आवाहन –

- Advertisement -

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी विधानसभेतील सर्व पक्षीय आमदारांना पत्र पाठवून राज्यसभा निवडणुकीत पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. मी २००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या सहाव्या जागेवर मी दावा करीत असून यासाठी मला आपल्या सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रात नमूद केले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -