घरक्राइमत्रिमूर्ती चौकातील मृत्यूप्रकरणी पत्नीसह तिघे मित्र ताब्यात

त्रिमूर्ती चौकातील मृत्यूप्रकरणी पत्नीसह तिघे मित्र ताब्यात

Subscribe

नवीन नाशिक : येथील डॉ. हेडगेवार नगर येथे झालेल्या लघू व्यावसायिकाच्या मृत्यूचे कारण शोधण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक भांडणातून त्याचा बळी गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी हरसिंग पावरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास बाबूराव साबळे (वय ४१, रा. हेडगेवारनगर, त्रिमूर्ती चौक, नवीन नाशिक) याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून, साक्षीदारांचे जबाब, शवविच्छेदन अहवाल आणि घटनेनंतर आरोपींचे कृत्य या सगळ्या गोष्टींचा सूत्रबद्ध तपास केला असता मयत कैलास बाबूराव साबळे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नी निशा साबळेबरोबर १२ जूनच्या रात्री भांडण झाले होते. त्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. दरम्यान पत्नी निशा हिने झालेल्या भांडणाबद्दल त्याच्या मित्रांना सांगितले व त्याची समजूत काढण्यास सांगितले.

- Advertisement -

हा वाद मिटविण्यासाठी संशयित ज्ञानेश्वर ऊर्फ पिंटू नागू गायकवाड (रा. नाशिक), बाबू प्यारेलाल कनौजिया, रोहित नंदकुमार पवार व मयताची पत्नी निशा साबळे (वय ३५) यांनी कैलास यास दत्तमंदिराजवळील स्मशानभूमीजवळ बोलावले. यावेळी त्यांनी अनैतिक संबंधाबाबत त्याला समजावून सांगितले; मात्र तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यावेळी संतापलेल्या ज्ञानेश्वर ऊर्फ नागू गायकवाड, बाबू कनौजिया व रोहित पवार यांनी जवळच्याच लाकडी दांडक्याने कैलास साबळेला मारहाण केली. यात त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर, पायावर, मांडीवर मारहाण केली गेली. तसेच त्याची पत्नी निशा हिनेही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात नीशाची लाथ कैलासच्या गुप्तांगावर लागली. त्यानंतरही निशा हिने कैलासला ढकलून दिले. यात त्याच्या डोक्याला मार लागून तो जखमी झाला. त्यानंतर त्यास संशयित गायकवाड याने घरी आणून सोडले. जखमी अवस्थेतच तो झोपल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. संशयितांचा कैलास याला मारहाण करून त्याचा जीव घेण्याचा कोणताही इरादा नव्हता, असा खुलासा पोलिसांनी केला असून कैलासला झालेल्या शारीरिक जखमांमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हरसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून निशा साबळेसह ज्ञानेश्वर गायकवाड, बाबू कनौजिया व रोहित पवार यांच्याविरुद्ध भा. दं.वि. कलम ३०४, ३४ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -