घरमहाराष्ट्रपक्षादेश झुगारल्याने परस्परांच्या विरोधात तक्रारी; शिवसेना - शिंदे गटात पक्षादेशावरून जुंपली

पक्षादेश झुगारल्याने परस्परांच्या विरोधात तक्रारी; शिवसेना – शिंदे गटात पक्षादेशावरून जुंपली

Subscribe

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या पाठोपाठ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी बजावण्यात आलेल्या पक्षादेशाचे (व्हीप) उल्लंघन झाल्याप्रकरणी शिवसेना आणि शिंदे गटाने परस्परांच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे.शिवसेनेने १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका दाखल केली असताना शिंदे गटाच्यावतीने सोमवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यसह १५ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी दिली.

शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव येण्याआधी काल, रविवारी रात्री उशीरा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे गटनेतेपद तसेच सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करून शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची तर मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती जाहीर केली होती. त्यानुसार गोगावले यांनी आज विश्वासदर्शक ठरावासाठी शिवसेना आमदारांसाठी पक्षादेश बजावला होता. मात्र, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या १५ आमदारांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे गोगावले यांनी या १५ आमदारांच्या विरोधात अध्यक्षांकडे अपात्रतेच्या कारवाईसाठी तक्रार केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना पक्षादेशाचे उल्लघंन करणाऱ्या त्या १५ आमदारांवर नियमानुसार कारवाई होणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

व्हीप मोडणाऱ्यांविरोधात करणार कारवाई : आदित्य ठाकरे

दरम्यान, शिवसेनेचा व्हीप मोडणाऱ्या आमदारांविरोधात कारवाई अटळ असल्याचा इशारा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेनेचे चाळीस आमदार शिंदे गटात गेल्यामुळे हा पक्ष संपल्याच्या निव्वळ वल्गना आहेत. शिवसेना कधीच संपणार नाही. बंडखोरी करणाऱ्यांपैकी १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून आम्ही तेथे दाद मागणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

हा लोकशाहीचा खून : प्रभू

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे आणि मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांच्या निवडीला दिलेली मान्यता हा लोकशाहीचा खून आहे. विधिमंडळाच्या कामकाजाला छेद देऊन सध्या काम सुरू झाले आहे. ४० आमदारांनी पक्षांतर केले आहे. गट म्हणून त्यांना बसता येणार नाही. कोणत्याही एका राजकीय पक्षात त्यांचे विलीन होणे आवश्यक होते. मात्र, लोकशाहीची पायमल्ली करून विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे, असा आरोप सुनील प्रभू यांनी केला.


पुढील निवडणुकीत २०० आमदार निवडून आणणार, एकनाथ शिंदेंचा निर्धार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -