‘पीओपी’च्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक; मुंबई महापालिकेचा फतवा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्ती वापरास / विक्रीस बंदी आहे. मात्र यंदाच्या वर्षी सरकार व मुंबई महापालिकेने या नियमाची सक्ती न करता काही प्रमाणात मुभा दिली आहे.

Ganeshotsav 2022

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्ती वापरास / विक्रीस बंदी आहे. मात्र यंदाच्या वर्षी सरकार व मुंबई महापालिकेने या नियमाची सक्ती न करता काही प्रमाणात मुभा दिली आहे. मात्र यंदा गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे आणि ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीवर ती मूर्ती ‘पीओपी’ची असल्याचे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Immersion of POP idols in artificial ponds is mandatory Mumbai Municipal Corporation order)

दरवर्षी गणेशोत्सवात वापरण्यात येणाऱ्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्तींमुळे समुद्रातील पाण्यात प्रदूषण होते. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन केंद्रीय प्रदूषण मंडळाने पर्यावरणाला घातक अशा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवर बंदी घालणारा कायदा केला आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२३ च्या गणेशोत्सवापासून मुंबईत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्त्यांवर पूर्णतः प्रतिबंध असणार आहे.

पीओपीच्या मोठ्या मूर्तींचे आकर्षण

शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचीच खरेदी – विक्री करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पीओपीच्या मोठ्या मूर्तींचे आकर्षण असलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या उत्साहावर पाणी फिरणार आहे. त्याचप्रमाणे पीओपी मूर्तीं बनविणाऱ्या मूर्तीकारांच्या व्यावसायाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

गणेशोत्सव तोंडावर आल्याने हा उत्सव जल्लोषात साजरा करतांना त्यात कोणतीही त्रुटी राहू नये व उत्सवाला गालबोट लागू नये, सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी व पूर्व तयारीसाठी परिमंडळ – २ चे उप आयुक्त हर्षद काळे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या एफ/ दक्षिण कार्यालयात गणेशोत्सवात मंडळे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी आदींची बैठक पार पडली. या बैठकीत पालिकेने वरीलप्रमाणे फर्मान काढले.

या बैठकीत, ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी, ‘पी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह मुंबई पोलीस दलाचे अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि महापालिकेच्या सर्व २४ विभागांचे आणि संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

२०२३ च्या गणेशोत्सवापासून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींना बंदी

परिमंडळ – २ चे उप आयुक्त हर्षद काळे यांनी, पर्यावरण संरक्षणासाठी पुढील वर्षाच्या श्री गणेशोत्सवापासून म्हणजेच सन २०२३ च्या श्री गणेशोत्सवापासून मुंबई महापालिका क्षेत्रात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेश मूर्त्यांवर पूर्णतः प्रतिबंध लागू करण्यात येणार आहे, असे सांगितले. तसेच, शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्या श्री गणेश मूर्तींचीच खरेदी – विक्री करणेही बंधनकारक असणार आहे.

यंदा कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात दणक्यात साजरा करता येणार आहे. मात्र कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच, गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचा वापर न करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. मात्र तरीही यंदाच्या वर्षी घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपर्यंत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचा वापर केल्यास त्यांचे कृत्रिम तलावांत विसर्जन करणे , त्यापूर्वी बंधनकारक करण्यात आले आहे.

गणरायाचे स्वागत करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या स्तरावर विविध स्तरिय कामे योग्यप्रकारे सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करणे, झाडांची सुयोग्यप्रकारे छाटणी करणे आणि रस्त्यांच्या परिरक्षणाची कामे करणे; यासारखी विविध स्तरिय कामे महापालिकेद्वारे चांगल्याप्रकारे करण्यात येत आहेत. गणेशोत्सवअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर साधण्यात येणारा सुसमन्वय हा निश्चितच कौतुकास्पद आहे”, असे गौरवोद्गार मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती तथा मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव विनोद घोसाळकर यांनी काढले.

घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असणे बंधनकारक

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान घरगुती श्री गणेश मूर्तींची उंची ही २ फुटांपेक्षा अधिक नसावी, तर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांसाठीच्या श्री गणेश मूर्तींची उंची ही शक्य तेवढी कमी असावी, असेही आवाहन हर्षद काळे यांनी आजच्या बैठकी दरम्यान केले. त्याचबरोबर मंडप परवानग्या व महानगरपालिकेच्या स्तरावर दिल्या जाणा-या अन्य परवानग्या या गेल्यावर्षी प्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी योजना राबविण्यात येत असून त्या द्वारे परवानग्या देण्यात येत आहे.

या अनुषंगाने देखील उप आयुक्त श्री. काळे यांनी आजच्या बैठकी दरम्यान माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. तसेच अनुज्ञापन खात्याद्वारे आणि मुंबई अग्निशमन दलाद्वारे देण्यात येणा-या परवानगी प्रक्रियेचाही त्यांनी आढावा घेतला.


हेही वाचा – प्रवाशांना मोबाईल अॅपद्वारे करता येणार रिक्षा, टॅक्सी चालकांची तक्रार; मनमानी कारभाराला बसणार चाप