घरसंपादकीयओपेडशिवसेनेचे मासे पवारांच्या जाळ्यात का अडकत गेले?

शिवसेनेचे मासे पवारांच्या जाळ्यात का अडकत गेले?

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शरद पवार यांनी शिवसेना वेळोवेळी फोडल्याचा आरोप करून एकच हलकल्लोळ उडवून दिला. त्यावर राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आले, पण शिवसेनेचा राज्यात वाढणारा प्रभाव रोखण्यासाठी राजकारणाचा भाग म्हणून त्यावेळी राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेल्या शरद पवार यांनी काही युक्त्या करणे ही त्यांची राजकीय गरज होती, पण अनेक वेळा असे दिसून येईल की शिवसेनेतील अस्वस्थता पवारांनी अचूक हेरली आणि तिला मार्ग मिळेल असे वातावरण निर्माण केले. पवार आणि ठाकरे यांचे घरोब्याचे संबंध असले आणि या दोन घराण्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव असला तरी पवारांच्या जाळ्यात शिवसेनेचे मासे अडकत गेले. त्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सुटले नाहीत हे मान्य करावे लागेल.

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता. नारायण राणे, राज ठाकरे हे शिवसेनेतून फुटून निघाले तेव्हा त्यांना पवारांना पाठिंबा होता, असा मर्मभेदी आरोप शिवसेनेतून फुटून निघालेल्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला. त्यावरून एकच गहजब उडाला. स्वत: शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी ते फारच मनाला लावून घेतले. राष्ट्रवादीचे काही नेते तर केसरकरांवर वैयक्तिक पातळीवर उतरले. केसरकर हे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते. त्यानंतर ते शिवसेनेत आलेले असल्यामुळे त्यांच्या विधानाला विशेष महत्त्व आहे. आपल्याला काही गोष्टी खुद्द शरद पवार यांनीच सांगितल्या आहेत, असेही केसरकर म्हणाले. त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले. कितीही टीका झाली तरी सुरुवातीला आपल्या वक्तव्यावर ठाम असलेल्या केसरकर यांनी दोन दिवसांतच यू टर्न घेतला.

पवारांविषयी मी असे काही बोललोच नाही, काही गैरसमज झाला असेल तर मी पवारांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असे केसरकर म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात हेच पवारांचे सामर्थ्य आहे. सुरुवातीला पवारांवर सडकून टीका करणारे राजकीय नेते, लेखक, अगदी पत्रकारही नंतर पवारांच्या भजनी लागतात हे पवारांचे विशेष आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांचा कसा दबदबा आहे याचे एक उदाहरण दिले होते. मुंबईतून प्रसिद्ध होणार्‍या एका आघाडीच्या मराठी दैनिकात शरद पवारांची खिल्ली उडवणारी राज ठाकरे यांची दोन व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली होती, पण त्यानंतर राज यांनी दिलेली व्यंगचित्रे प्रसिद्ध करण्यात आली नाहीत. तेव्हा आपल्याला पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणात काय ताकद आहे ते कळले, असे राज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनीही शिंदे गटात सहभागी झाल्यावर शिवसेना फोडल्याचा आरोप पवारांवर केला. त्याला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडून प्रत्त्युत्तर देऊन ते आरोप फेटाळण्यात आले.

- Advertisement -

ठाकरे आणि पवार घराण्यांचे घरगुती पातळीवर अगदी जवळचे संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही ठाकरे आणि पवार घराण्याच्या जवळीकतेविषयी सांगताना आपल्या विवाहाच्या वेळी बाळासाहेबांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती याची आठवण करून दिली. घरगुती पातळीवर जवळीक असली तरी राजकारणात मात्र ठाकरे आणि पवार हे एकमेकांचे कडवे विरोधक राहिलेले आहेत. शिवसेना ही हिंदुत्ववादी तर शरद पवार हे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे आहेत. त्यामुळे दोघांमध्ये विचारसरणीचा भेद होता. शरद पवारांना बाळासाहेब बरेचदा शरदबाबू अशीही हाक मरत, पण जाहीर भाषणांमध्ये पवारांसाठी त्यांनी कुठली बोचरी विशेषणे वापरली ते उभा महाराष्ट्र जाणतो. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर राज्यातील राजकारणावर काँग्रेसचा पगडा होता. यशवंतराव चव्हाण हे राज्यातील त्यावेळचे दिग्गज नेते होते. शरद पवारांच्या तरुणपणी त्यांचे गुण हेरून यशवंतरावांनी पवारांना आपल्यासोबत घेतले. पवारांच्या घरातील वातावरण हे बिगरकाँग्रेसी होते. पवारांनी यशवंतरावांकडे आकर्षित होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करून आयुष्यातले पहिले बंड केले. त्यानंतर पवारांची राजकीय वाटचाल सुरू झाली.

हेही वाचा – तेरे मेरे बीच में, कैसा है यह बंधन अंजाना…संजय राऊत तुम्हे क्या करना?

- Advertisement -

सत्ता हाती असल्याशिवाय लोकांची कामे प्रभावीपणे करता येत नाहीत, असे पवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सत्ता हाती हवी, अशीच पवारांची भूमिका राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार हे नेहमीच इतरांपेक्षा पॉवरफुल राहिलेले आहेत. आजवर झालेल्या कुठल्याच निवडणुकीत ते पराभूत झालेले नाहीत ही त्यांची खासियत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात कमी वयाचे मुख्यमंत्री होण्याचा मान पवारांनी मिळवलेला आहे. कमी वयात ते आमदार झाले. महाराष्ट्रात पवार विरोधी बाकांवर बसलेत असा फारच कमी कालावधी असेल. महाराष्ट्रात आपण कायम सत्तेत राहण्यासाठीच आहोत, असे पवारांना वाटत असावे. त्यामुळे काहीही करून सत्ता मिळवण्याकडे त्यांचा रोख असे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयोग करायला ते सज्ज असत. त्यामुळे एकेकाळी त्यांनी जनसंघाच्या चार आमदारांना सत्ता स्थापनेसाठी सोबत घेतले होते. अलीकडेच त्यांनी महाविकास आघाडीचा अकल्पित प्रयोग केला. त्यात त्यांच्या राजकीय विचारांशी न जुळणार्‍या शिवसेनेला त्यांनी सोबत घेतले आणि सत्ता मिळवली. मार्ग कुठलाही असो, पण आपण सत्ता मिळवली पाहिजे. कारण एकदा सत्ता तुमच्या हाती आली की मग सगळे तुम्हाला सलाम करतात.

सत्ता मिळवल्यावर ती कशी मिळवली असे तुम्हाला कुणी विचारत नाही. पवारांच्या महाराष्ट्रातील राजकीय वाटचालीचे असेच तत्त्व राहिलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांनी जितके अकल्पित प्रयोग केले आणि सत्ता मिळवली तितके अन्य कुठल्याच नेत्याला जमले नाही. कुठलीही निवडणूक असो, त्यात विजयी होण्यासाठी पवार काय करतील याचा अंदाज कुणाला बांधता येत नाही. त्यामुळे पवारांविषयी नेहमीच एक गूढ वातावरण राहिलेले आहे. अगदी त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे या २० वर्षांच्या असताना त्यांची पत्रकार मधुकर भावे यांनी मुलाखत घेतली होती. त्यात त्यांना तुला तुझ्या वडिलांविषयी काय वाटते, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा सुप्रियाताई म्हणाल्या होत्या की, माय डॅड इज मोस्ट अनप्रेडिक्टेड पर्सन, म्हणजे माझे वडील काय निर्णय घेतील याच्याविषयी काही अंदाज बांधता येत नाही. पवारांनी राजकारणात नेहमीच आपली अनप्रेडिक्टिबिलीटी म्हणजे अनिश्चितता टिकवून ठेवली आहे. त्यामुळे बरेच राजकीय नेते पवारांना गुरू मानतात आणि त्याचसोबत त्यांना वचकूनही असतात.

हेही वाचा – हे राज्य जावे ही तर शिवसैनिकांचीच इच्छा!

काँग्रेसचा महाराष्ट्रात दबदबा होता, पण तो राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे भूमिपुत्रांच्या प्रश्नाकडे त्यांना फारसे लक्ष द्यायला वेळ मिळत नसे. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली होती, पण भूमिपुत्रांना न्याय हक्क मिळत नव्हते. त्यातूनच शिवसेनेची निर्मिती झाली. पुढे शिवसेनेला बिनधास्त तरुण रक्ताची साथ मिळाल्यामुळे महाराष्ट्रात पक्षाची वाढ होऊ लागली. मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी बंद करून शिवसेनेने राज्यातील काँग्रेसच्या सत्ताधार्‍यांना आपली ताकद दाखवून द्यायला सुरुवात केली. राज्यात कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार युनियन्सचा मोठा प्रभाव होता. काँग्रेसने त्यांना आवर घालण्यासाठी शिवसेनेचा वापर केला असे मानले जाते.

त्यामुळे वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवसेनेला वसंतसेना असेही म्हटले जात असे, पण पुढे शिवसेनेचा विस्तार आणि प्रभाव वाढू लागला. अनेक मराठी तरुणांना विशेषत: मुंबईत विविध क्षेत्रांमध्ये नोकर्‍या मिळवून देण्यात शिवसेनेला यश येऊ लागले. शिवसेनेची स्थानिय लोकाधिकार समिती त्यासाठी झपाट्याने काम करू लागली. शिवसेनेने काही महापालिकांमध्ये आपला महापौर बसवला. शिवसेनेचा जसा राज्यात आणि मुंबईत प्रभाव वाढू लागला तशी ती राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांसाठी डोकेदुखी होऊन बसली. त्यांना केंद्रातील काँग्रेसच्या श्रेष्ठींकडून सूचना येऊ लागल्या. हे काय होत आहे, अशी विचारणा होऊ लागली. त्यावेळी शरद पवार हे राज्यातील काँग्रेसचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री होते. त्यामुळे शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाला आवर घालणे ही त्यांची राजकीय गरज होती.

शरद पवारांवर दीपक केसरकर आणि रामदास कदम यांनी शिवसेना फोडल्याचा ठपका ठेवला असला तरी पवारांनी थेट शिवसेना फोडली नाही. त्यांनी शिवसेनेत जे अस्वस्थ आहेत, ज्यांची कोंडी झालेली आहे, त्यांना वाट करून दिली. पवारांकडे राज्याची सत्ता असताना पवारांना अशी अस्वस्थता शिवसेनेतील छगन भुजबळ यांच्यामध्ये दिसली. भुजबळ हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय लाडके होेते. कारण भुजबळ यांनी तळागाळात जाऊन शिवसेना रुजवली होती, पण पुढे जेव्हा पक्षातील मुख्य पद देण्याची वेळ आली तेव्हा मनोहर जोशी यांना पुढे आणण्यात आले. आपण इतकी मेहनत घेतली आणि बाळासाहेबांच्या आपण इतके जवळचे असूनही आपल्याला डावलले गेले, ही भावना भुजबळांना फार दुखावून गेली. भुजबळ यांची ही नाराजी पवारांनी हेरली. त्यातूनच मग भुजबळ पवारांच्या छत्रछायेखाली आले. शिवसेनेला भुजबळांच्या निमित्ताने पडलेेले ते मोठे भगदाड होते. त्यानंतर पवारांच्या जवळीकीच्या आधारे गणेश नाईक शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपली कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यावर नारायण राणे बाहेर पडले.

तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राज्यात सत्ता होती. त्यावेळी राणे काँग्रेसमध्ये आले, पण त्यांच्या फुटण्यामुळे शिवसेनेची ताकद कमी झाली. त्यानंतर पाच महिन्यांनी आपली शिवसेनेत घुसमट होत असल्याचे कारण देऊन राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यामुळे तर शिवसेनेत उभी फूट पडली आणि अख्खी संघटनाच दुभंगली. कालपर्यंत जे सगळे शिवसैनिक होते, त्यांच्यातले अनेक मनसैनिक झाले. मूळचे शिवसैनिक असलेले कार्यकर्ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तर शिवसेनेचा प्रभाव कमी होणार आणि त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार, शिवसेनेची भाजपशी युती होती, यामुळे युतीचे नुकसान होऊन त्यांच्या जागा कमी होणार अशी स्थिती होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्या बंडाला शरद पवारांनी उत्तेजन दिले. किंबहुना आर्थिक सहाय्य केले, अशा बातम्या त्यावेळी पसरल्या होत्या. अर्थात अशा बातम्यांमध्ये किती तथ्य असते हादेखील संशोधनाचा विषय असतो. इतकेच नव्हे तर भाजपमध्ये आपल्याच घरात सापत्न वागणूक मिळत असल्याच्या कारणामुळे धनंजय मुंडे बाहेर पडले. त्यांना राष्ट्रवादीने आपल्यात सामावून घेतले.

शरद पवारांनी शिवसेना थेट फोडली असे म्हणता येणार नाही, पण शिवसेनेतील अनेक अस्वस्थ मंडळींनी पवारांच्या छत्रछायेखाली जाणेे पसंत केले. कारण पवारांचा राजकीय आवाका मोठा आहे. त्याचाच उपयोग पवारांना नेहमीच होत आलेला आहे. पवार हे सुरुवातीपासून बंडखोर होते. त्यांनी त्यांच्या पक्षातील बंडही मोठ्या कुशलतेने मोडून काढले. त्यांचे स्वत:चे पुतणे अजित पवार यांनी बंड करून ते देवेंद्र फडणवीसांच्या वळचणीला गेले होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती, पण त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना शरद पवारांनी परत आणले. इतकेच नव्हे तर अजित पवारांनाही परत आणले. त्यात सुप्रियाताई सुळे यांचा वाटा मोठा आहे. कारण ताईच्या भावनिक आवाहनानंतर अजितदादा परत आले. पवार आणि ठाकरे ही राज्यातील प्रमुख राजकीय घराणी आहेत, पण त्यांच्यात एक फरक आहे. पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक नाते घट्ट आहे. आजही शरद पवारांचे संयुक्त कुटुंब आहे. त्यामुळे पवारांचा पक्ष फुटला तरी पुन्हा सांधता आला.

ठाकरे यांच्याबाबत तसे नाही. राज ठाकरे पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांना भावनिक आवाहन करून परत आणणारे कुणीच नव्हते. हा भावनिक कोरडेपणा शिवसेनेच्या फुटीला कारणीभूत ठरला आहे. भाजपने मुख्यमंत्रीपद नाकारल्यावर उद्धव ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपद हवे होते. उद्धव ठाकरे यांची गरज आणि भाजपची सत्ता घालवण्याची आलेली संधी शरद पवारांनी हेरली. ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देऊन आपल्या पक्षाला सत्तेत आणले. पुढील काळात त्यामुळे शिवसेनेचे नुकसान होणार हे स्पष्टच होते. ते आता दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या बड्या पक्षांमध्ये घुसमट झालेल्या शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करून भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनेत जी फूट पडली आहे, त्यातून पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेनेतील फूट आणि पवारांची भूमिका याचा विचार केला तर एक म्हणता येईल, शिवसेनेतील कच्चे दुवे पवारांनी हेरले आणि त्याचा राजकीय फायदा उचलला. इथेच पवार ठाकरेंपेक्षा वरचढ ठरले.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -