घरठाणेअंबरनाथ-बदलापूर पालिकेसाठी २८ जुलैला पुन्हा आरक्षण सोडत

अंबरनाथ-बदलापूर पालिकेसाठी २८ जुलैला पुन्हा आरक्षण सोडत

Subscribe

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुन्हा आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता आगामी निवडणुकांत ‘ओबीसीं’साठी राजकीय आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे येत्या २८ जुलै रोजी ओबीसी आरक्षणासहित सोडत होणार आहे.

यापूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेसाठी १४ जून रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती मात्र यावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होता आता ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याने पुन्हा आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी यापूर्वी सोडण्यात आलेले प्रभाग तसेच राहण्याची शक्यता आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या प्रभागात ओबीसी आरक्षण लागू होऊ शकते.

- Advertisement -

आता पुन्हा आरक्षण सोडत जाहीर होत असल्याने आगामी पालिका निवडणुकीचे चित्र बदलणार आहे. नव्याने आरक्षण सोडत घेण्यात येणार असल्याने ओबीसी उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच यंदा द्विसदस्य प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार असल्याने आगामी पालिका निवडणुकीत उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आगामी पालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता होती. मात्र आता ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर आणि २८ जुलै रोजी सोडत पार पडल्यानंतर, लवकरच निवडणुका देखील घोषित होऊ शकतात.

मुंबईतही २९ जुलैला सोडत
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ३१ मे रोजी काढलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमधील फक्त अनुसुचित जाती – १५ प्रभाग (त्यापैकी ८ प्रभाग महिला), अनुसूचित जमाती – २ प्रभाग (त्यापैकी १ महिला) हे आरक्षण कायम ठेवत उर्वरित सर्वसाधारण प्रभाग, सर्वसाधारण महिला प्रभागासाठीचे (एकूण २१९ प्रभाग) आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे २९ जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदामध्ये पुन्हा नव्याने सर्वसाधारण प्रभाग, सर्वसाधारण महिला प्रभागसाठीचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -