घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआदिवासी समाज भाजप विचारधारेच्या केंद्रस्थानी : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार

आदिवासी समाज भाजप विचारधारेच्या केंद्रस्थानी : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार

Subscribe

नाशिक भेटीसाठी राष्ट्रपतींना देणार निमंत्रण

किरण कवडे । नाशिक 

भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या सोमवारी (दि.25) शपथ घेत असताना देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होण्यासाठी आदिवासी समाजाला 75 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. पारंपरिक विचारांनी ग्रासलेल्या आणि घराणेशाहीच्या राजकीय विचारधारेला छेद देण्याचे महत्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने केले. केंद्रिय मंत्रीमंडळात आठ आदिवासी मंत्र्यांचा समावेश असेल किंवा आता राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा केंद्रबिंदू ठरला आहे. याच आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या केंद्रिय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी ‘आपलं महानगर’ने साधलेला हा संवाद…

  • समाजाचा प्रतिनिधी निवडला म्हणजे त्या समाजाचे प्रश्न सुटतात का?

    -मूळात हा प्रश्नच मला अयोग्य वाटतोे. एखादी व्यक्ती सर्वोच्चपदी विराजमान होते तेव्हा ती सर्व समाजाची असते.विशिष्ट समाजाचा विचार त्या व्यक्तीला करता येत नाही. त्यामुळे द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या म्हणजे केवळ आदिवासी समाजाचे प्रश्न सुटतील असे म्हणणे अयोग्य वाटते. सर्व समाजाचा म्हणजेच राष्ट्राचा विचार त्या करत असतात.

  • आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणार असल्याचे समजल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती ?

    -निश्चितच आनंद झाला. आदिवासी समाजाच्या नावाने ज्यांनी आजवर राजकारण केले. त्यांनी कधीही पारंपारिक विचारांच्या पलिकडील व्यक्तींना स्थान दिले नाही. आदिवासी समाजाला देशाचे सर्वोच्चपद मिळवण्यासाठी 75 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. परंतु, घराणेशाहीच्या विचारधारेला बाजूला ठेवून सर्वसमाज घटकांना प्रतिनिधीत्व करु देण्याची विचारधारा भाजपकडे हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

  • आदिवासी समाजाचे मुलभूत प्रश्न आजही कायम आहेत. त्यांची सोडवणूक कशी होणार ?

    -आदिवासी समाजबांधव हा व्यवस्थेला कधी प्रतिप्रश्न विचारत नाही. आपल्या गरजांसाठी भांडत नाही. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही आदिवासी समाजाचे प्रश्न आपल्याला कायम दिसतात. यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हायला हवी. केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार यामध्ये आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून आदिवासी समाजाला स्थान मिळत आहे. या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटतील.

  • आदिवासी बांधवांसाठी केंद्र सरकारच्या कुठल्या योजना प्रभावी ठरल्या आहेत ?

    -आयुष्यमान भारत या आरोग्य योजनेच्या माध्यमातून देशातील 10 कोटी कुटुंबांना आपण हेल्थ कार्डचे वाटप केले. त्याचा 50 कोटी जनतेला फायदा होणार आहे. याविषयी समाजामध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावात पाण्याची योजना राबवता येते. ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून पूल उभारता येतात. रस्त्यांची कामे असतील किंवा गावातील स्मशानभूमीचे काम हे ग्राम पंचायतीला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करता येतात. याची जाणीव गावातील नागरिकांना होणार तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत राहील. परिणामी, समाजाचे प्रश्न ‘जैसे थे’ राहिलेले दिसतील.

  • द्रौपदी मुर्मू यांच्याशी तुमची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती ?

    -पहिल्या भेटीत मी, माझा परिचय करुन दिल्यानंतर त्या खूप आनंदी झाल्या. मंत्रीपदाच्या रुपाने आपल्याला मिळालेली संधीचे सोने करण्यासाठी खूप मेहनतीने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. केवळ आदिवासी समाजच नव्हे तर संपूर्ण समाजाचा उत्कर्ष आपल्या हातून कसे घडेल यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचा मुलमंत्र त्यांनी दिला. राष्ट्रपतीपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर त्यांना नाशिक जिल्ह्यात येण्याचा आग्रह मी करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -