घरसंपादकीयओपेड..आणि बुद्ध हसला !

..आणि बुद्ध हसला !

Subscribe

बुद्ध हसतो त्या वेळी ज्यावेळी संपन्नता दाखल होते. बुद्ध हसतो ज्यावेळी नैतिक मूल्य आणि जीवनाचा विजय होतो. बुद्ध ताकदीचा, सत्तेचा, अहंकाराचा व्यक्तीगत इच्छेचा विजय झाल्यावर हसत नाही. बुद्ध हसतो म्हणजे हलकंसं स्मित करतो. बुद्ध कायम स्मित करतच असतो, कारण मुळात बुद्धाकडे दुःख करण्यासारखं काहीही नसतं. दक्षिणेकडील चित्रपट दिग्दर्शक रंजिथ पा याने नुकताच ‘धम्मम’ नावाचा लघु चित्रपट दिग्दर्शनातून साकारला. या चित्रपटातील दृश्यावरून समाजमाध्यमांवर जी खडाजंगी सुरू आहे, ती पाहून बुद्ध पुन्हा हसत आहे.

तर काय आहे या दृश्यात एक लहान मुलगी बुद्धाच्या पुतळ्यावर चढली आहे. ती बुद्धाच्या खांद्यावर उभी राहते. तिचे हात फैलावून आभाळ बनतात. तिला बुद्धाच्या खांद्यावर उभं राहून संतुलन राखताना भरारीचे पंख फुटतात आणि ती भविष्याच्या कल्पनेच्या अवकाशात झेप घेते. हा प्रकार सुरू असताना शेतात काम करणारा तिचा मजूर बाप तिला दरडावतो आणि म्हणतो, देवाच्या खांद्यावर का चढली आहेस, खाली उतर, त्यावेळी ती पित्याला उत्तर देते, बाबा, बुद्धाने सांगितलं देव नसतो, मग तुम्ही बुद्धालाच का देव म्हणता…? तिचा प्रश्नासोबत या लघुचित्रपटाचा टिझर संपतो. आता फेसबुकवर या चित्रपटाच्या या टिझरवर टीका, टिप्पणी, समर्थन, विरोध सुरू झालेले असते. चक्क बुद्धाच्या खांद्यावर उभी राहिलेली मुलगी लहान जरी असली तरी बुद्धाचा ‘वंदनीय मोठेपणा’ पाहता हे समर्थनीय नाही, बुद्धाच्या जागी दुसर्‍या एखाद्या देवता, प्रेषिताची मूर्ती असती तर…असा प्रश्न विरोधी गट विचारतो, तर तो बुद्धच असल्यानं कोपण्याचा आणि त्या मुलीला वाईट शाप देण्याच्या प्रश्नच नसल्याने हे शक्य असल्याचं या प्रसंगाचे समर्थन करणारा गट म्हणत असतो. बुद्धासमोर नतमस्तक व्हावं, त्याच्या खांद्यावर चढण्याचं प्रयत्न करणे काही गटांना विकृत चित्रण वाटते.

- Advertisement -

ही विकृती बुद्धमूर्तीत, बुद्धामध्ये असते की बुद्ध आणि हा प्रसंग पाहणार्‍याच्या मनांत असते, हा प्रश्न असतो, बुद्ध मूर्तीत आहे की धम्मात असतो की, निसर्गात आहे की माणसाच्या मनात? असे अनेक प्रश्न इथं फेसबुकवर या निमित्तानं चर्चिले जातात, बुद्ध असतो का मूळ प्रश्नही इथं निर्माण होतो. बुद्ध आणि बुद्धत्वही या संकल्पनाही या चर्चेतून समोर येतात. विविध देवस्थानाच्या पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननातून जमिनीखाली दडलेला, दडवलेला बुद्ध अचानक बाहेर येतो. इथं हजारो वर्षापासून मीच होतो, मीच आहे, त्यामुळे माझं इथं विहार असायला हवं, असं म्हणून बुद्ध भांडत नसतो, मोर्चे, घोषणा देत नसतो, जागेवर मालकी हक्क सांगून रक्तपात करत नसतो. इथंही तो मंद स्मित करत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो कोट्यवधी, अब्जावधीची किंमत असलेला सुवर्णमूर्तीतला तस्करीतून ताब्यात घेतलेला बुद्धही शांतच असतो. आपली किंमत अब्ज, कोट्यवधींच्या घरात असल्याच्या अहंकाराची कुठलीही छटा या रत्नजडीत सोन्याच्या बुद्धाच्या चेहर्‍यावर नसते…इथंही शांत मंद स्मित. बुद्ध लेण्यांमध्ये विहारात पाषाणातल्या कोरीव कामात बरेचदा आढळतो. या बुद्धाकडे पुरातत्व खाते आणि बुद्ध धम्माचे अनुयायी म्हणवून घेणार्‍यांचेही हजारो वर्षापासून दुर्लक्ष झालेले असते. त्यामुळे या बुद्धाचे देह अवयव ध्वंस होत असतानाही हा बुद्ध सस्मित शांत असतो. तालिबान्यांसारखे स्वतःला माणूस म्हणवून घेणारे आणि याच भ्रमात जगणारे काही मोजके पृथ्वीतलावरील जीव अफगाणिस्तान बामियानमध्ये हजारो वर्षे शांतता संदेश देत उभ्या असलेल्या बुद्धाला तोफगोळे डागून त्याचा ध्वंस करतात…पण बुद्ध तरीही शांत स्मित करत गालातल्या गालात हसत असतो. बुद्धाला शेंदूर फासून त्याचा तेलातुपाने अभिषेक होत असतानाही बुद्ध शांत स्मित असतो.

हजारो वर्षांच्या पाशवी गुलामगिरीतून जीवांची सुटका होत असताना नागपूरच्या दीक्षाभूवरही बुद्ध शांत सस्मित असतो. बुद्ध पुस्तकात असतो, तो त्रिपिटकात असतो, तो दगडात असतो, मातीत, सोन्यात, लाकडात, पाण्यात कुठेही असतो जिथं असतो तिथं तो सस्मित असतो. मग बुद्ध असा का एकटाच गालातल्या गालात हळुवार मंद हसत असतो, बुद्ध माणसांच्या मर्यादा, त्यांचा आसक्ती, तृष्णा, हव्यास, अहंकारावर हसत असावा, यातून या जीवांच्या अनंत दुःखाच्या साखळीची सुरुवात होणार हे बुद्धाला समजलेलं असावं, म्हणून तो माणसांच्या मुर्खपणावर हसत असावा. बुद्ध इथल्या सत्तेचा मद चढलेल्या सत्ताधार्‍यांना पाहूनही हसत असावा. बुद्ध धर्मांध झुंडीना पाहूनही हसत असावा..बुद्ध सगळ्याच जागतिक चळवळी, युद्ध आणि युद्धखोर शक्ती, माणसांना माणसांच्या कब्जात ठेवण्याची लालसा धरणार्‍यांना पाहून हसत असावा. बुद्धाच्या हसण्याचे असे अनेक अर्थ आहेत, यातून कुणी कसा बोध घ्यावे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. बुद्धांच्या जीवनातील अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातून माणसाच्या जीवनाला आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि ज्ञान मिळत असते. बुद्धांचे जीवनविषयक तत्वज्ञान अतिशय साधे आणि सोपे आहे. कर्मकांडात गुंतलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी मळलेली वाट झुगारून वेगळा मार्ग पत्करला. समाजाला कर्मकांडात गुंतवून शतकानुशतके आपले मानसिक आणि शारीरिक गुलाम करून ठेवणार्‍या वर्गाविरुद्ध त्यांनी उघड उघड बंड पुकारले. त्या प्रस्थापित रुढीवाद्यांकडून त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. पण ते मागे हटले नाही. समाजातील बहुसंख्य लोक कर्मकांड आणि रुढींखाली भरडला जात असताना बुद्धांनी समाजाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला.

- Advertisement -

साधी राहणी आणि उच्च विचार हा विचार भारतीय समाजात रुढ झाला, त्याचा उगम बुद्धांच्या विचारसरणीमध्ये आहे. बुद्धांचे तत्वज्ञान हे सर्वसामान्य माणसांच्या समस्यांशी निगडित आहेत. एकदा बुद्धांचे शिष्य एका व्यक्तीला पकडून घेऊन येतात आणि बुद्धांना सांगतात हा माणूस आम्ही त्याला सांगत असलेले तत्वज्ञान ऐकत नाही. त्यावर बुद्ध त्या माणसाजवळ जातात. त्याला आस्थेवाईकपणे विचारतात, तुझे काय झाले, त्यावर तो म्हणतो, महाराज, मला खूप भूक लागली आहे. त्यावर बुद्ध आपल्या शिष्यांना सांगतात, त्याला अगोदर जेवायला वाढा. ते त्याला जेवायला वाढतात. त्यानंतर पोट भरल्यावर तो माणूस म्हणतो, आता मला तत्वज्ञान सांगा. मी आनंदाने ऐकेन. त्या बोधकथेतून बुद्धांना हेच सांगायचे आहे की, सर्वसामान्य माणसाची समस्या काय आहे ते प्रथम जाणून घ्या, त्यानंतर त्याला तुमचे तत्वज्ञान सांगा. त्याच्या पोटात भूक असेल तर त्याला तत्वज्ञान सांगून काहीही उपयोग नाही. बुद्ध आणि त्यांचे तत्वज्ञान सर्वसामान्य माणसांना आपलेसे का वाटते, या मागे हेच कारण आहे की, त्यांचा साधेपणा. त्यांच्या विचारांमध्ये कुठलीही गुंतागुंत आणि अवघडपणा नसतो.

आज आपण पाहतो की, जगात वेगाने आधुनिकीकरण होत आहे. नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध माणूस लावत आहे. त्याचसोबत माणसाच्या मनातील हिंसाचाराला अधिक चेव चढत आहे. अमेरिका हा अतिशय आधुनिक देश आहे. पण त्या देशात बंदुक संस्कृती जीवनाचा भाग होऊन गेली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर शस्त्रास्त्र बनवणार्‍या कारखानदारांचा मोठा प्रभाव आहे, हे लोक जगभरातील देशांना शस्त्रे विकत असतात. इतकेच काय पण तिथे शाळेतील विद्यार्थ्यांकडेही अगदी सहज पिस्तुले उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून अनेक शाळांमध्ये हत्याकांड घडताना दिसतात. अमेरिका हा जगाला तत्वज्ञान शिकवण्याचा आव आणतो, पण बुद्धांचे तत्वज्ञान स्वीकारायला त्यांची तयारी नाही. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांचा सुळसुळाट झालेला आहे, असेच म्हणावे लागेल. हातात असलेल्या मोबाईलवर हे सगळे सहज उपलब्ध आहे. त्यामुळे समजापेक्षा गैरसमज पसरवून समाजमन भडकवण्यात आणि लोकप्रियता मिळवण्यात काही महाभागांची स्पर्धा लागलेली दिसते. त्यात पुन्हा ती व्यक्ती जर आदराचे आणि श्रद्धेचे स्थान असेल तर समाजातील लोक पेटून उठतात. रस्त्यावर उतरतात. सार्वजनिक आणि वैयक्तिक मालमत्तेची जाळपोळ करतात. सामान्य लोकांचे जीवन वेठीस धरतात. या सगळ्या हिंसक गोष्टी त्या श्रद्धेय व्यक्तीच्या विचाराच्या आणि तत्वज्ञानाच्या अगदी विरोधात असतात, पण भावना भडकवणार्‍यांना त्याच्याशी काही देणे घेणे नसते, त्यामुळे जेव्हा काही कलाकृती बनवल्या जातात, त्यावेळी त्या बनवणार्‍यांनी त्यातून काय संदेश जाणार आहे, याचाही विचार करणे आवश्यक आहे. बुद्धांचे तत्वज्ञान हे नेहमीच क्षमशील राहण्यास सांगत असते. कारण माणसाचे मनपरिवर्तन होण्याची गरज असते. तरच माणसाचा खर्‍या अर्थाने उद्धार होतो.

बुद्ध पौर्णिमेचा शीतल शांत चंद्र पाहून हसत असावा. बुद्ध पाण्याचा शुभ्र निर्झर पाहून हसत असावा, बुद्ध हिरवीगार शेतं, ओली माती, फुलपाखरांचे रंग, पक्ष्यांचे गोड कुजन ऐकून हसत असावा. बुद्ध अणूचाचणी केल्यावरही सस्मित असतो. त्यातून अण्वस्त्र हल्ले झाल्यावर त्याच अणू उर्जेतून वीज प्रवाह उजळून गावे प्रकाशमान झाल्यावरही हसतो.

बुद्धाला कशानेही काहीही फरक पडत नाही. त्याच्या असण्या नसण्यानेही त्याला फरक पडत नाही. बुद्धाला सुख दुःखानेही फरक पडत नाही. बुद्ध संपूर्ण सत्य असतो, माणूस चांगला असेल किंवा वाईट बुद्ध त्याच्या ठायी तसाच असतो. बुद्ध वास्तविक असतो कल्पना नाही, बुद्ध सत्य असतो, तथाकथित बदललेल्या अर्थाने धर्म नाही. बुद्ध मठातील झर्‍यातील कुठलाही रंग नसलेले नितळ, पारदर्शक तृष्णा शांत करणारे गार पाणी असतो. बुद्ध कधीही कृत्रिम असा बाटलीबंद स्वतःची जाहिरात करणारा कोल्ड्रिंक नसतो. म्हणूनच बुद्ध फक्त बुद्ध असतो. तो सगळीकडे असतो. त्याला टाळणे अशक्य असते. तो आपल्या माणूस म्हणून झालेल्या अवनतीवर गालातल्या गालात हसत असावा. जे कर्म माणूस करणार तसेच फळ त्याला मिळणार, हे बुद्धाला ठाऊक असते. म्हणूनच माझ्या मूर्तीपेक्षा स्वतःच्या कर्मावर सजग चित्ताने लक्ष ठेवा असं बुद्ध अडीच हजार वर्षांपासून सांगत असतो, मात्र माणूस स्वतःच्या कर्म आणि मनात असलेल्या बुध्दापेक्षा मूर्तीतल्या बुद्धाच्या चर्चेत रस घेतो. म्हणूनच रंजित पा च्या सिनेमातील ‘त्या’ बुद्धाच्या मूर्तीवर चढलेल्या मुलीच्या प्रसंगावर होणार्‍या अर्थहीन चर्चा ऐकून पाहून बुद्ध हसत असतो, शांत आणि स्मित…बुद्ध माणसांच्या अज्ञान, अविद्या, अहंकार आणि असत्य पाहून हसतो आणि हा बुद्ध बाहेर मूर्तीत नसतो…बिलकुल नसतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -