घरपालघरभगतपाडा, बरफ पाड्यातील नागरिकांचा पिंजाळ नदी पात्रातून जीवघेणा प्रवास

भगतपाडा, बरफ पाड्यातील नागरिकांचा पिंजाळ नदी पात्रातून जीवघेणा प्रवास

Subscribe

पिंजाळ नदीच्या एका बाजूला आखाडा तर दुसर्‍या बाजूला भगत बरफपाडा पाडे आहेत.

वाडा :  वाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या ग्रामपंचायत वडवली आखाडा हद्दीतील भगतपाडा व बरफपाडा या गावाला जोडणारा रस्ताच नसल्याने येथील विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांना पिंजाळ नदी पात्रातून आपला जीव धोक्यात टाकून पोहत जाऊन प्रवास करावा लागत आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत वडवली आखाडा हद्दीतील भगत व बरफपाडा या गावात किमान 60 ते 65 घरे असून 400 ते 450 च्या आसपास लोकसंख्या असलेली गावपाडे आहेत. येथील विद्यार्थ्यांना शाळेची वाट धरतांना तर अक्षरश: अंगावरील गणवेश काढून नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे.या नदीपात्रातून प्रवास करतांना काही दुर्घटना घडण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. पिंजाळ नदीच्या एका बाजूला आखाडा तर दुसर्‍या बाजूला भगत बरफपाडा पाडे आहेत.

येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना जीवाची बाजी लावून पिंजाळ नदीच्या पात्रातून प्रवास करावा लागत असून मोठ्या बिकट परिस्थितीच सामना करावा लागत आहे.या गावाला पर्यायी रस्ताच नसल्याने पावसाळ्यात कुठलेच वाहन या ठिकाणी जात – येत नाही. त्यामुळे आरोग्यविषयक काही कठीण प्रसंग ओढवल्यास वैद्यकीय मदत मिळणे ही मुश्किल होत आहे.स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांनंतरही येथील ग्रामस्थांना मुलभूत सेवा सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान,येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुलाचा प्रश्न कधी मार्गी लागेल,असा प्रश्न येथील काशिनाथ बुधर व शंकर बरफ या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या गंभीर बाबीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जीवघेण्या प्रवासातून आमची सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -