घरमहाराष्ट्रशिवसेना आणि शिंदे गट मध्यरात्री भिडले, दोन्ही गटात हाणामारी; सरवणकरांनी गोळीबार केल्याचा...

शिवसेना आणि शिंदे गट मध्यरात्री भिडले, दोन्ही गटात हाणामारी; सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

Subscribe

आज पहाटे चार वाजता सदा सरवणकर पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी घरगुती प्रकरणारतून वाद झाल्याचं सांगितलं.

मुंबई – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभादेवीत मध्यरात्री शिवसेना आणि शिंदे गटात तुंबळ हाणामारी झाली. गणेश विसर्जनादरम्यान झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत गेले. अखेर हे प्रकरण मिटवण्याकरता पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. शुक्रवारी झालेल्या या वादावर अखेर रविवारी पहाटे पडदा पडला. दरम्यान, यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. मात्र, सरवणकरांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शुक्रवारी, म्हणजेच गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवीमध्ये शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. या मंचाच्या शेजारीच शिंदे गटानेही मंच उभारला होता. शिंदे गटातील लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. यातून शिंदे गटातील माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि शिवसेनेतील माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद निर्माण झाले. शाब्दिक बाचाबाची होऊन वाद वाढत गेला. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

दरम्यान, हा वाद इथेच शमेल असं वाटत असतानाच या वादाबाबत शिंदे गटातील संतोष तेलावणे यांनी फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट लिहून अपशब्द वापरले. यावरून शिवसैनिक संतापले आणि त्यांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. यानंतर समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला. तसेच, त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घातला असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे दोन्ही गटातील लोकांना दादर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पोलिसांच्या कारवाईनंतर दादर पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.  आमदार सदा सरवणकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. मात्र, सदा सरवणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

- Advertisement -
दरम्यान, आज पहाटे चार वाजता सदा सरवणकर पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी घरगुती प्रकरणारतून वाद झाल्याचं सांगितलं.

>

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -