घरफिचर्ससारांशसिनेमॅटिक लिबर्टी की स्वैराचार?

सिनेमॅटिक लिबर्टी की स्वैराचार?

Subscribe

सिनेमॅटिक लिबर्टीतून साकारण्यात आलेले सिनेमे लिबर्टीच्या नावाखाली इतिहासकालीन व्यक्तीमत्वांवर आधारित चित्रपटांच्या विषयात अवास्तव, अवाजवी कल्पनाविलासात रमणे पसंत करत असतील तर ते धोकादायक आहे. त्याहीपेक्षा प्रेक्षक जर अशा अवास्तव सिनेमॅटिक लिबर्टीला सनदशीर मार्गाने प्रश्न विचारत नसतील तर ती जास्त चिंतेची बाब आहे. पुस्तकांतला लिखित इतिहास मानला जाणार्‍या शब्दांना आता ऑडिओ व्हिज्युअल परिमाणं मिळालेली आहेत. त्यामुळे पुस्तकांपेक्षा या माध्यमांचा लोकांवरील परिणाम गडद आहे. पुस्तकांमध्ये शब्द वाचल्यावर वाचणार्‍याच्या व्यक्तीसापेक्ष कल्पनेला वाव होता, खरं खोटं समजून घ्यायलाही काहीशी सूट पुस्तकांतून होती. इथं तसं नाही, इथं जे घडलंय किंवा नाही, तेही त्याच ताकदीनं प्रत्यक्ष स्वरुपात पडद्यावर मांडता येतं, विचार करण्याची समजून घेण्याची संधी पाहाणार्‍यांना मिळतच नाही, त्यामुळे प्रेक्षकांनी कुठल्याही इतिहासकालीन सिनेकलाकृतीबाबत विवेक न हरवता सजग होऊन सिनेमा पाहाणं हाच त्यावरील उपाय आहे.

रिचर्ड अटनबरोच्या ‘गांधी’ चित्रपटात एक प्रसंग आहे. बेन किंग्जले अर्थात महात्मा गांधी आगगाडीतून भारतभ्रमण करत असताना एका नदीकिनारी येतात, कडाक्याची थंडी पडलेली असते, नदीच्या पैलतीरी गोरगरीब लहान मुले त्या सोबत काही महिला धुणी धूत असताना गांधीजींची नजर त्यांच्यावर थबकते, नदी प्रवाहित असते, गांधीजी नदीच्या प्रवाहासोबत अंगावरील पंचा प्रवाहाच्या पाण्यासोबत अलगद नदीत सोडून देताता, पलिकडच्या थंडीने कुडकुडणार्‍या महिला लगबगीनं प्रवाहासोबत आलेला पंचा उचलून घेतात. देशातील गोरगरीब जनतेला पुरेसे कपडे मिळत नसल्याने गांधीजींनी केलेल्या वस्त्रांचा त्याग हा रिचर्डनं या प्रसंगातून उभा केला होता. आता खरोखरंच अशी घटना गांधीजींच्या आयुष्यात घडली होती का? त्यांनी खरोखरंच आपल्या खांद्यावरील पंचा नदीत सोडला होता का? हे प्रश्न अलहिदा मानले तरी गांधीजींकडून प्रेक्षकांपर्यंत जाणारा संदेश या प्रसंगातून यशस्वीपणे पोहचला होता. दिग्दर्शक अटनबरोंकडून ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ अशा पद्धतीने गरजेइतकीच, मात्र परिणामकारकपणे घेण्यात आली.

याच चित्रपटातील दुसरा प्रसंग….फाळणीनंतरच्या धार्मिक उन्मादात एका निष्पाप बालकाची हत्या केलेला गरीब उद्विग्न माणूस गांधीजींकडे येतो, हा ओम पुरी असतो. या कृत्यानं त्याचं जगणं नरकासमान झालेलं असताना त्यातून सुटकेसाठी तो गांधींकडे येतो. पश्चातापदग्ध असलेल्या ओम पुरीला अंथरुणाला खिळलेले गांधी अशाच वयाच्या दुसर्‍या मुलाच्या प्रेमळ पालनपोषणाची ‘शिक्षा’ सुनावतात. हा प्रसंग गांधीमध्ये आहे, अस्सच खरं घडलं होतं का? जसं पडद्यावर दिसलं, व्यक्ती म्हणून गांधींपेक्षा गांधीवाद प्रकर्षाने पडद्यावर आणणार्‍या या चित्रपटाचा मुख्य नायक गांधीवाद असावा, केवळ व्यक्ती म्हणून गांधी या चित्रपटात सहनायकाच्या भूमिकेत उरतात. गांधींना पाहिलेली, अनुभवलेली आणि वाचलेली पिढी आता कितीशी उरलीय, त्यामुळे गांधी चित्रपटातील घटना, प्रसंग जसे होते, तसेच चित्रित झाल्याचे सांगायला आज गांधीजी देहरुपाने आपल्यात नाहीत. मात्र नथुरामाच्या गोळीने ‘गांधी’ जरी संपले असले तरी गांधीवाद संपलेला नसतो, हे अटनबरोंनी चित्रपटातून स्पष्ट केलेलं असतं. मात्र ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकात गांधी संपले आणि स्वतः (नथुराम) उरला असा त्याचा अर्थ काढला जातो. हे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली नाटकातही केलं जातं. तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’चे पुण्यात सत्तरच्या दशकातही प्रयोग बंद पाडले जातात.

- Advertisement -

‘गांधी’ चित्रपटातील गांधीवादाच्या सूत धाग्याचं एक टोक अलिकडच्या काळात राजकुमार हिरानी पकडतो आणि लगे रहो मुन्नाभाई बनवतो, तिथंही सिनेमॅटिक लिबर्टीचा पुरेपूर वापर होतो, मात्र गांधींना ‘क्या बापू, सुन ना….’असं एकेरी संबोधलं जाणं आपल्यातल्या गांधीवाद माहीत असलेल्या प्रेक्षकांना खटकत नाही. सिनेमॅटिक लिबर्टीच्या उपयोगातून इतिहास तोडण्याचं काम करण्यापेक्षा जोडण्याचं काम काही कलाकृतींनी केलेलं असतं. मात्र काही चित्रपटातून सिनेस्वातंत्र्याच्या नावाने ‘वैचारिक स्वैराचार’ चालवला जातो. त्यामागे निश्चित केलेला अजेंडा, प्रोपगंडा असतो. ज्या समाज समुदायात इतिहासातील व्यक्तीरेखांच्या संदर्भावरून संघर्ष होतात. त्या समुदायाने त्या इतिहासकालीन माणसांना समजण्यात चूक केल्याचा हा परिणाम असतो. अशा चुका इतिहास अभ्यासक मानल्या जाणार्‍यांकडून वेळोवेळी पोसल्या गेलेल्या असतात.

वर्तमानातला माणूस इतिहासात अभावानेच असतो, तोही अलिकडच्या काळातच, मात्र त्याला आपल्या इतिहासाचं कौतुक असतं, आपल्या जातीचा, धर्माचा, वंशाचा, समाज समुदायाचा इतिहास वर्तमानातही कलाकृतींच्या नावाखाली समोर आणण्यामागे राजकीय हेतूही असतात,त्यातच सिनेमॅटिक लिबर्टी अशा इतिहासकारांच्या हातून शाहिरांच्या ताब्यात गेल्यावर धोकादायक स्थिती निर्माण होते. समाज समुदायाचा इतिहास फॅण्टसीत रमणारा असतो, सत्य पचवण्याची ताकद वर्तमानात नसते, आपले इतिहासातील नेतृत्व, वाद, विचार, शौर्य किती देदीप्यमान होते, हे सांगताना त्या आडून आपण त्या इतिहासाचे वंशज असल्याने ही महनीयता आपल्याही वाट्याला यावी, अशी इच्छा वर्तमानातल्यांची असते. वर्तमानातल्यांचं स्वकर्तृत्व इतिहासाच्या तुलनेत तोकडं असल्यानं इतिहासात रमणे आणि स्वत:ची पाठ थोपटून घेणे पर्यायाने अधिक सोपे असते. तिथून इतिहासात झपाट्याने भेसळ सुरू होते. त्यातून शाहिरांना इतिहासकार, संशोधक अभ्यासक समजलं जातं, त्यांना विवेकाने पडलेले प्रश्न विचारणं इतिहासाचा उपमर्द आणि गुन्हा मानला जातो.

- Advertisement -

त्यातून इतिहासातल्या संबंधित व्यक्तीमत्वावरही कमालीचा अन्याय होतोच, शिवाय इतिहासाच्या नावाखाली रंजकता जपल्यानं त्यातील सामाजिक, राजकीय भानाची जागा उन्मादाकडून हिसकावून घेतली जाते. त्या त्या ऐतिहासिक नेतृत्वाखाली वर्तमानातल्या समुदायाला फॅण्टसीत रमणं आवडत असतं, फॅण्टसीत एक महत्वाची सुविधा असते, त्यातून इतिहासातील व्यक्ती आणि त्यांचे कर्तृत्व निकालात काढण्याची, इतिहासातील व्यक्ती वर्तमानात देहानं अस्तित्वात नसल्यानं खरं खोटं ठरवण्याची जबाबदारी नंतरच्यांकडून घेतली जाते. त्यातून इतिहासावरील निष्ठेच्या नावाखाली सिनेमॅटिक लिबर्टीतून इतिहासातील भेसळीला परवाना मिळतो. सामाजिक आणि राजकीय सत्ता, दबावगटातूनही भेसळीला अधिकृतता बहाल केली जाते. मग पुढे फण्टसी आणि प्रत्यक्ष इतिहास यातलं अंतर कमी कमी होत जाऊन नाहीसं केलं जातं.

इंग्लडमधून जगदंबा तलवार पुन्हा भारतात आणण्याच्या चर्चा या फॅण्टसीचा परिणाम असतो. त्यात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवार दिली की, जगदंबेनं यातील आशयाचा फरक समजून घेणं, बहुसंख्य समुदायाला शक्य नसतं, परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील कथानक असलेल्या जुन्या कृष्णधवल चित्रपटात पडद्यावर देवीमाता प्रत्यक्ष स्वराज्य रक्षणासाठी छत्रपतींना तलवार प्रदान करते असा प्रसंग पाहाणार्‍यांच्या विवेकबुद्धीला खटकत नाही. हीच बाब ज्ञानेश्वरांच्या भिंत चालवण्याबाबत, रेड्याच्या तोंडून वेद वदवण्याबाबतही होते. संत तुकारामांना प्रत्यक्ष पुष्पक विमानात बसवून सदेह वैकुंठाला पाठवले जाते. हे सिनेमॅटिक लिबर्टीचे भयावह स्वरुप असते. फॅण्टसी आणि इतिहास यात एक संघर्ष कायम असतो. हा संघर्ष कलेच्या मैदानातही त्यामुळेच आपसूक येतो.

सिनेमॅटिक लिबर्टीतून इतिहासाची मोडतोड नवीन नाही. उदाहारणादाखल ‘तान्हाजी’सारख्या सिनेमातील अनेक वाक्ये, संवाद प्रसंग अतिशयोक्तीपूर्ण असतात. ही स्थिती अनेक महानीय व्यक्तींवरील आधारित सिनेमांच्या बाबतीत असते. अटनबरोंच्या गांधी चित्रपटातून डॉ. आंबेडकर आणि गांधीजी यांच्यातील पुणे कराराचा प्रसंग पूर्णपणे वगळलेला असतो. सिनेमाचे नायक गांधीवाद आणि गांधीजी असल्याने पुणे करारातील प्रसंग सिनेमात नसल्याचं अटनबरोंकडून स्पष्ट केलं जातं. पाकिस्तानमध्ये त्याच इतिहासकाळावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाल्यास चित्रपटांचे प्रमुख नायक बॅरिस्टर जिना असतील आणि फाळणीची गरज, मुसलमानांवरील अत्याचार, मुस्लीम लिगचे धोरण याबाबत प्राथमिकता असेल. कालावधी समान जरी असला तरी दृष्टिकोनातील फरक कलाकृतींच्या सादरीकरणावर मात करेल.

भारतात फाळणीकाळात हिंदूवरील अत्याचार प्रकर्षाने दाखवले जातील तर पाकिस्तानात मुसलमानांवरील अत्याचार पडद्याची जागा व्यापेल, दोन्हीकडे वेगवेगळी सिनेमॅटिक लिबर्टीचे दोन दृष्टीकोन असतील, यातला खरा इतिहास कोणता? हा प्रश्न निरुत्तर असेल. इतिहास झाला, घडला तस्साच खरोखर लिहिला जातो का?, इतिहासाचा संबंध घडलेल्या घटनांशी असतो का तो लिहिणार्‍याशी असतो?, अलिकडच्या काळात इतिहास सांगणारे, मांडणारे, त्यावर साहित्यकृती, सिनेमे बनवणार्‍यांकडून स्वतःच्या वैचारिक धारणांमुळे इतिहासाची मांडणी पूर्वग्रह दूषित होते का? माणसांचे भूतकाळातील कर्तृत्वाचे ढोल मोठमोठ्याने पिटण्यातून वर्तमानातल्या माणसांचा नाकर्तेपणा स्पष्ट होत नाही का? इतिहास आदर्श असू शकतो, मात्र त्याला भूतकाळातून ओढून ताणून वर्तमानात आणणं शक्य नसतं, इतिहासातील आदर्श महत्वाचा असताना त्यातील उन्माद, शांतता महत्वाची असताना त्यातील शौर्य आणि इतिहासातील व्यक्तीमत्वांच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात.

त्यांना अचाट, अनाकलनीय, काल्पनिकता बहाल करणं हा त्यांच्यावर अन्यायच ठरतो, अशा व्यक्तीमत्वांवर आजपर्यंत हा अन्याय आपण करत आलेलो आहोत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीशील सामाजिक न्यायाच्या भूमिकेपेक्षा त्यांना देवीने प्रदान केलेल्या काल्पनिक तलवारीचा विषय आजही महत्वाचा असतो. कल्पनाविलासाची सवय इतिहासासाठी कमालीची धोकादायक असते. शिवाजी महाराजांची तलवार म्हणून इंग्लंडमधल्या तलवारीला निश्चितच महत्व आहे. मात्र त्यांच्या कर्तृत्वामागे या तलवारीमागील त्यांच्या मुठीची पकड आणि त्यांचे बुद्धीकौशल्य अर्थात सामाजिक राजकीय विचार हेच शिवाजी महाराजांचं खरं निर्विवाद शौर्य त्याहून महत्वाचं असावं.

अडीच दशकापूर्वी जब्बार पटेलांनी ‘डॉ. आंबेडकर, अनकहा सच’ बनवला होता. त्यातील घटना संसदेत बाबासाहेब म्हणतात, जर या देशातील लोक चांगले असतील तर संविधान कितीही वाईट जरी असलं तरी अखेरीस ते चांगलंच सिद्ध होईल, हेच वाक्य याच आशयाने श्याम बेनेगलांच्या ‘संविधान’ या दूरदर्शनवरील दहा भागांच्या मालिकेत गांधीजींकडून ऐकायला मिळते. ‘शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगावे’, या आशयाचे वाक्य तान्हाजी चित्रपटात सावित्रीबाई म्हणजेच काजोलकडून ऐकायला मिळते, हे वाक्य डॉ. आंबेडकरांचे असल्याचाही चित्रपटात सांगितलेला इतिहास असतो, ही सिनेमॅटिक लिबर्टी असते. जर या दोन्ही वाक्यांच्या आशयात फरक नसेल तर त्यांच्यातील अनुयायांमध्ये झालेला संघर्ष इतिहासातून घेतलेल्या चुकीच्या बोधातून मूर्खपणाचा कळस असतो.

इतिहास आधी पुस्तकातून लिहिला गेला, त्यानंतर तो सांगितला गेला. तो पुन्हा लिहिला गेला, त्यावर आधारीत साहित्यकृती आल्या, नाट्य, कलांवरही इतिहासाचा परिणाम झाला, हा न टाळता येणारा परिणाम असतो, परंतु कुठल्याही कलाकृतीचे सत्य असत्य, खरं खोटं, काल्पनिक, वास्तव यांचे मापदंड लावताना किमान सद्सद्विवेकाची कसोटी निकालात काढणं धोकादायक असतं. ‘तुमचा वर्तमानात सांगितला गेलेला इतिहास साफ खोटा आहे‘ असं इतिहास अभ्यासक एडमंड बर्कचं म्हणणं असतं. महनीय व्यक्तींना सिनेमॅटिक लिबर्टी आणि फण्टसीतून मोठं करण्याची गरज नसते. ही माणसं कर्तृत्वानं मोठीच असतात, म्हणूनच त्यांच्यावर कलाकृती साकारल्या जातात. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न अशा व्यक्तीमत्वांवरही अन्यायच करतो.

इतिहासातली ही माणसंही हाडामांसांची आपल्यासारखी माणसं होती, त्यांनाही मानवी मर्यादा होत्या, त्यांनाही वेदना, संवेदना, भावना, कुटुंब आदी जबाबदार्‍या होत्या, मात्र ही अंगभूत मानवी मर्यादा असतानाही त्यांनी त्या पलिकडे जाऊन अतुलनीय काम केल्यानंच ती महनीय ठरली, सिनेमॅटिक लिबर्टीतून त्यांना ‘अवास्तवी मोठेपणा’ बहाल करण्याची सिने कलात्मक अहमहमिका अशा महनीय व्यक्ती आणि त्यांच्या इतिहासावरही अन्याय करणारी ठरते. हा अवास्तवी मोठेपणा त्यांना वर्तमानात बहाल करण्यामागे वर्तमानातील संबंधितांनाही या जादाच्या मोठेपणात आपला वाटा हक्क सांगायचा असतो, याशिवाय सत्तेचे राजकीय हेतू असतात, ज्यांना इतिहासाच्या मोडतोडीशी काहीएक देणेघेणे नसते, असेच अनेकदा स्पष्ट होते.

फॅण्टसीत सिनेमॅटिक लिबर्टी एकवेळ खपवून घेतली जाऊ शकते, मात्र इतिहासावरील आधारित कथानकांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आपला वैचारिक गोंधळ घालणं इतिहासातील विचारवाद, व्यक्तींसाठीही धोकादायक असतं. कमालीचा कल्पनाविलास कलाकृतीसाठी धोकादायकच ठरावा. ब्रिटिश लेखक दिग्दर्शक पीटर ब्रूक यांनी महाभारत पडद्यावर साकारलं होतं. मात्र या चित्रपटात कमालीच्या कल्पनाविलासाला मोकळं रान असतानाही त्यापेक्षाही त्यांनी महाभारतातील व्यक्तीरेखांना महत्व दिलं. यातील पांडव, कृष्ण, भीष्म, द्रौपदी, दुर्योधन आदी सर्वच व्यक्तीरेखा दैवपणाच्या पलिकडे असलेल्या माणूसपणाच्या कक्षेतच बांधलेली असतात.

भारतात नसलेल्या पीटर ब्रूक यांना लाखो किलोमीटर पलिकडूनही भारतातल्या इतिहास कलाकृतीबाबत ही समज असेल तर इथल्या सिनेदिग्दर्शक आणि निर्मात्यांनी विचार करायला हवा. निदान इथल्या पडद्यावरच्या कलाकृतींनी तरी ऐतिहासिक चित्रपट, इतिहासाशी प्रामाणिक राहून केलेला चित्रपट, ऐतिहासिक अभ्यास करून साकारलेला चित्रपट अशी बिरुदं लावण्याआधी ब्रूक आणि अटनबरो, सत्यजीत रे, श्याम बेनेगल यांच्या कलाकृतीतून शिकायला हवं. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी, कुठं घ्यावी, कशी घ्यावी याची समज सिनेदिग्दर्शक लेखकांना असायला हवी. अवाजवी स्वातंत्र्य स्वैराचारात परिणत होतं हाही इतिहासच आहे. त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची अतिशयोक्ती, अवास्तव मांडणी खर्‍या इतिहासावरही अन्याय करणारी असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -