घरमनोरंजनओटीटी प्लॅटफॉर्म नसता तर मी घरीच बसले असते - अमृता सुभाष

ओटीटी प्लॅटफॉर्म नसता तर मी घरीच बसले असते – अमृता सुभाष

Subscribe

एखादी स्त्री लग्न, मूल, करिअर या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता देखील खूश राहू शकते.

प्राजक्ता चिटणीस

आज अमृता सुभाषने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील तिचे एक स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही वर्षांत अनेक वेबसिरिजमध्ये ती खूप चांगल्या भूमिका साकारताना दिसत आहे. तिचा वंडरवुमन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिची आजवरची कारकीर्द, मातृत्वाविषयीचे तिचे मत, हिंदीतील तिचा प्रवास यावर तिने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

- Advertisement -
  • अमृता मराठी प्रेक्षक गेल्या अनेक वर्षांपासून तुझ्या अभिनयाच्या प्रेमात आहेत आणि त्याचमुळे मराठी चित्रपट बनवताना दिग्दर्शक एखादी भूमिका ही केवळ अमृतासाठीच लिहितो. आता हीच परिस्थिती आपल्याला हिंदी इंडस्ट्रीत देखील पाहायला मिळत आहे. हिंदीतील दिग्दर्शक देखील एखाद्या भूमिकेसाठी केवळ अमृताच योग्य आहे असे म्हणताना दिसत आहेत, तू या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहातेस?

मराठी इंडस्ट्रीतील लोकांनी आणि मराठी जनतेने आजवर माझ्यावर खूपच प्रेम केले आहे. आज त्यांच्यामुळेच मला विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याची ताकद मिळते. गल्ली बॉय या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा माझ्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता हिंदीमध्ये देखील माझ्यासाठी खास भूमिकांचा विचार व्हायला लागला आहे. खरं सांगू तर मला कधीच एकाच प्रकारच्या भूमिका साकारायच्या नाहीयेत. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस यायचं हे माझे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे आणि माझे हे स्वप्न आता पूर्ण होत आहे याचा मला आनंद होत आहे. गेली अनेक वर्षं मराठी इंडस्ट्रीतील लोक, प्रेक्षक यांनी मला भरभरून प्रेम दिले आहे आणि आता हेच प्रेम मला हिंदी इंडस्ट्रीतील लोकांकडून, प्रेक्षकांकडून मिळत आहे यासाठी मी कृतज्ञ आहे.

  • आज हिंदी इंडस्ट्रीत तुला जे यश मिळाले आहे, त्या यशात बॉलिवूडमधील कोणत्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा हात आहे?

केवळ आणि केवळ अनुराग कश्यप. अनुरागने माझ्यातील अभिनयक्षमता ओळखली आणि तशाप्रकारच्या भूमिका मला ऑफर केल्या. त्याच्यासोबत मी रमण राघव, चोक्ड, सेक्रेड गेम्स या तीन वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम केले. या तिन्ही प्रोजेक्टमधील माझ्या भूमिका या एकमेकापेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या. त्याच्या याच चित्रपट आणि वेबसिरिजमधून हिंदी इंडस्ट्रीच्या लोकांच्या लक्षात आले की, मी सगळ्याच प्रकारच्या भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारू शकते. कोणताही कलाकार हा दुसऱ्यांवर अवलंबून असतो. कारण त्याला आपला अभिनय लोकांसमोर सादर करण्यासाठी तितकी ताकदीची भूमिका ऑफर होणे गरजेचे असते.

- Advertisement -
  • वंडरवुमन या चित्रपटामधील तुझी भूमिका काय असणार आहे आणि या भूमिकेबाबत तुला विचारल्यावर तुझी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय होती?

दिग्दर्शक अंजली मेननसोबत काम करण्याची माझी गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मी त्यांच्या बँगलोर डेझ, कुडे या चित्रपटांच्या अक्षरशः प्रेमात आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी मल्याळम देखील शिकत होते. पण मी ही भाषा अजूनही पूर्णपणे शिकू शकलेली नाहीये. याच दरम्यान त्यांनी मला वंडरवुमनबद्दल विचारले. त्यांच्यासोबत हिंदीत काम करायला मिळतेय हे कळल्यावर मी प्रचंड खूश झाले होते. या चित्रपटाची संहिता खूपच छान असून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या सहा गरोदर स्त्रियांची कथा तुम्हाला यात पाहायला मिळणार आहे.

  • या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा तुझा अनुभव कसा होता?

या चित्रपटाचे सगळे चित्रीकरण आम्ही केरळमधील एकाच ठिकाणी केले आहे. आम्ही सहा जणी अनेक दिवस एकाच खोलीत राहात होतो. सकाळी पाच वाजता आम्ही चित्रीकरणासाठी बाहेर पडायचो, रूमवर परत यायला आम्हाला ११ तरी वाजायचे. तिथे एकच भला मोठा बेड होता. त्या बेडवर एकमेकांवर पडायचो, अगदी लहान मुलांसारखे मजा-मस्ती करायचो. एकमेकांचे सिक्रेट शेअर करायचो. अंजली यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्या या सहाही मुलींवर समान प्रेम केले असेच मी म्हणेन.

  • या चित्रपटात तुझा नवरा संदेश कुलकर्णी तुझ्यासोबत काम करत आहे, संदेशसोबत काम करायला तुला किती आवडते?

खरं तर संदेशचा अभिनय पाहूनच मी त्याच्या प्रेमात पडले होते. तो एक खूप चांगला अभिनेता, लेखक आहे. आजच्या घडीला त्याच्यासारख्या लेखकाने लिहिण्याची चित्रपटसृष्टीला नितांत गरज आहे असे मी त्याला अनेकवेळा सांगते. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच खूप चांगला असतो. त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते.

  • तू कोणत्याही भूमिकेची निवड कशाप्रकारे करते?

मी काम करत असलेल्या चित्रपट, मालिका, नाटक, वेबसिरिज यांची संहिता माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते. तसेच माझी भूमिका काय असणार हे देखील तितकेच महत्त्वाचे असते आणि आता तर स्त्रियांसाठी खूप चांगल्या भूमिका लिहिल्या जात आहेत आणि त्याचमुळे माझ्यासारख्या कलाकाराला खूप चांगल्या भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे.

Amruta Subhash on being a part of Wonder Women

  • तू तुझ्या भूमिकेसाठी कशाप्रकारे तयारी करतेस?

मला जी भूमिका साकारायची आहे, त्याच्याशी संबधित व्यक्तीला मी भेटण्याचा प्रयत्न करते. वंडरवुमन या चित्रपटासाठी आम्ही अंजली यांच्या एका मैत्रिणीला भेटलो. त्या डॉक्टर असून त्यांच्या रुग्णांची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी त्या प्रयत्न करतात. मी मातृत्वाचा अनुभव न घेतल्याने गरोदरपणाच्या कोणत्या महिन्यात कोणती लक्षणं असतात हे मला काहीच माहीत नाहीये. त्यामुळे मी या सगळ्या टिप्स त्यांच्याकडून घेतल्या आणि त्यांच्या मदतीने जया ही भूमिका साकारली.

  • या चित्रपटाचे प्रमोशन तुम्ही खूपच हटके केले होते, तू प्रेग्नन्सी किटचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने तूच गरोदर असल्याचे तुझ्या चाहत्यांना वाटले होते. त्यावेळी तुला किती लोकांनी शुभेच्छांसाठी फोन केले?

मला तर खूप फोन, मेसेज आले. पण तितकेच फोन माझी आई आणि सासू-सासऱ्यांना आले. संदेश आणि अमृताला आमच्या शुभेच्छा द्या, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत असे अनेकांनी सांगितले. पण मी गरोदर नसून मी जया ही व्यक्तिरेखा साकरत आहे हे सांगितल्यावर देखील माझे फॅन तितकेच खूश होते. माझे फॅन मला त्यांच्यातील एक मानतात यासाठी मी नेहमीच त्यांची आभारी आहे.

  • आपल्या समाजात लग्नाच्या ठरावीक वर्षांनंतर जोडप्याला मूल कधी होणार हा प्रश्न अनेकवेळा विचारला जातो, या मानसिकतेबाबत तुला काय वाटतं?

ही मानसिकता गेल्या काही वर्षांत बदलायला लागली आहे असे मला वाटते. स्त्री ही आई झाल्याशिवाय पूर्ण होत नाही असे पूर्वी लोकांना वाटायचे, पण आता लोक अधिक खुल्या विचारांचे झाले आहेत. मूल जन्माला घालायचे की नाही हा निर्णय अनेक जोडपी आता संगनमताने घेऊ लागली आहेत. आमचेच उदाहरण द्यायचे तर आम्हाला लहान मूलं आवडतात पण मूल आवडणं आणि मूल जन्माला घालणं यात फरक आहे. आमचे दोघांचे अभिनयावर प्रचंड प्रेम आहे. आम्ही आमच्या कामात व्यग्र असल्याने आम्ही मुलाला न्याय देऊ शकत नाही. त्याला जन्माला घालून त्याला वेळ न देणं हा त्याच्यावरील अन्याय आहे. त्याचमुळे मूलाबद्दल आम्ही दोघांनी विचार केलेला नाहीये. आजकाल अनेक जोडपी करियरसाठी किंवा विविध कारणांसाठी हा निर्णय घेत आहेत. बाईची पूर्णत्वाची संकल्पना आता पूर्णपणे बदलली आहे. बाई तिच्या असण्याने, तिच्या कामाने पूर्ण होऊ शकते असे मला वाटते. लग्न, मूल या बाबत प्रत्येक स्त्रीचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. एखादी स्त्री लग्न, मूल, करिअर या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता देखील खूश राहू शकते.

Her mother's daughter

  • तुझ्या अभिनय कारकिर्दीवर तुझ्या आईचा प्रचंड प्रभाव आहे, याविषयी काय सांगशील?

मी माझ्या आईला अभिनय करताना पाहून लहानाची-मोठी झाले आहे. आईने घर-अभिनय या दोन्ही गोष्टी खूपच चांगल्याप्रकारे सांभाळल्या. संहिता ही सगळ्यात महत्त्वाची असते, हे तिनेच मला सांगितले. पण त्याचसोबत तिने मला अभिनयाबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि मी नेहमीच अभिनय करताना ही गोष्ट लक्षात ठेवते. ती मला नेहमी सांगते की, आपण पडद्यावर जी व्यक्तिरेखा साकारणार आहोत, ती व्यक्तिरेखा आपल्याशी संवाद साधते. या व्यक्तिरेखेसोबत तुम्ही संवाद साधायला शिकाल तेव्हाच तुम्ही ती चांगल्याप्रकारे साकारू शकाल.

  • ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तुझ्या करिअरला एक वळण मिळाले, असे तुला वाटते का?

चित्रपटातील भूमिका या ठरावीक वयातील मंडळींसाठी लिहिल्या जातात. ठरावीक वयानंतर चित्रपटात साकारण्यासाठी तितकी ताकदीची भूमिका मिळत नाही. पण वेबसिरिजमध्ये तसे नाहीये. वेबसिरिजमध्ये तुम्हाला करण्यासारखे खूप काही आहे. आज ओटीटी प्लॅटफॉर्म नसता तर मी घरीच बसले असते असे मला वाटते.


हे ही वाचा – डॉ. श्रीराम लागू म्हणजेच कलासक्त लमाण 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -