घरराजकारणगुजरात निवडणूकराहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या मेधा पाटकरांवरील टीकेला काँग्रेसचे चोख उत्तर

राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या मेधा पाटकरांवरील टीकेला काँग्रेसचे चोख उत्तर

Subscribe

गुजरात निवडणूक जवळ आली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी टीका केली त्याचा परिणाम गुजरात निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या पदयात्रेत नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यासुद्धा अलीकडेच भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावरूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि मेधा पाटकर यांच्यावर टीका केली आहे. मागील तीन दशकांपासून मेधा पाटकर यांनी नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या सरदार सरोवर धरणाला विरोध केला त्यामुळेच हा प्रकल्प होण्यास उशीर झाला. त्याचबरोबर त्यांनी कच्छ आणि काठियावाड परिसराला पाणी मिळू नये म्हणून हे आंदोलन केले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

दरम्यान गुजरात निवडणूक जवळ आली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी टीका केली त्याचा परिणाम गुजरात निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या टीकेचा गुजरात निवडणुकीत काँग्रेसवर काहीच परिणाम होणार नाही. मोदींची प्रतिक्रिया म्हणजे भाजपाचा मुद्दा भरकटवण्याच्या रणनीतीचा भाग आहे, असे गुजरातमधील काँग्रेस नेते म्हणाले.

- Advertisement -

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकोट जिल्ह्यातील धोराजी याठिकाणी प्रचारसभा घेतली होती. या सभेतून त्यांनी राहुल गांधी आणि मेधा पाटकर यांच्यावर निशाणा साधला. “काँग्रेसच्या एका नेत्याने सरदार सरोवर धरणाच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बेनच्या (बहिणीच्या) खांद्यावर हात ठेवले,” असं मोदी सभेत म्हणाले. पण भाजपासाठी, मेधा पाटकर केवळ नर्मदेवरील सरदार सरोवर धरणाविरोधातील आंदोलनाचा चेहरा नाहीत. तर त्या २००२ च्या गुजरात दंगलीविरोधात निदर्शने करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.

गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही शनिवारी ‘भारत जोडो यात्रे’तील राहुल गांधी आणि मेधा पाटकर यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला. ट्विट करत ते म्हणाले, “काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी वेळोवेळी गुजरात आणि गुजराती जनतेबद्दल आपले वैर दाखवून दिले आहे. मागील अनेक दशकांपासून गुजरातला पाणी मिळू न देणाऱ्या घटकांच्या पाठिशी राहुल गांधी उभे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी त्यांनी मेधा पाटकर यांना भारत जोडो यात्रेत सहभागी करून घेतले. गुजरात हे अजिबात सहन करणार नाही.

- Advertisement -

दरम्यान मोदींच्या या टीकेनंतर गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकोर प्रतिक्रिया देत म्हणाले, पंतप्रधानांच्या टीकेचा निवडणुकीच्या निकालावर काहीही परिणाम होणार नाही. जर ते म्हणजेच भाजपा आम्हाला मेधा पाटकर यांच्या बद्दल प्रश्न विचारत असेल, तर आमच्याकडे भाजपाला विचारण्यासाठी असे हजारो प्रश्न आहेत. भारत जोडो यात्रेत कोणीही सामील होऊ शकते. जनतेनेसुद्धा याच दृष्टीकोनातून याकडे पहिले आहे. पण भाजपाकडून यावर वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेधा पाटकर या निवडणुकीचा मुद्दाच असू शकत नाहीत. पण लोकं आता भाजपाला कंटाळले आहेत. मागील २७ वर्षांपासून भाजपा त्याच त्याच मुद्यांवर बोलत आहे. त्यामुळे मेधा पाटकर यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा गुजरात निवडणुकीवर काही परिणाम होईल, असे जगदीश ठाकोर म्हणाले.


हेही वाचा : युवासेनेच्या ३५ महिला पदाधिकाऱ्यांचे एकाचवेळी राजीनामे, वरुण सरदेसाई उतरले मैदानात


 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -