घरफिचर्ससारांशचित्रपटांची निराशा !

चित्रपटांची निराशा !

Subscribe

आपल्याकडं सिनेमा हिट किंवा फ्लॉप ठरतो तो सिनेमाने केलेल्या एकूण कमाईवर, यावर्षी असे अनेक सिनेमे होते जे बनले बिग बजेटमध्ये, पण आपल्यावर झालेला खर्चदेखील ते वसूल करू शकले नाहीत. याशिवाय असेही काही सिनेमे होते जे का बनले, असा प्रश्न त्यात काम केलेल्या अभिनेत्यांसह प्रेक्षकांनादेखील पडला होता. २०२२ हे वर्ष हिंदी सिनेसृष्टीसाठी महत्वाचं होतं. कारण त्या आधीची दोन वर्षे कोरोनामुळे बंधनं होती, पण यावर्षी कुठलीही बंधनं नसताना हिंदी सिनेमे चालले नाही. हे खरोखरच आश्चर्यकारक आणि तितकेच धक्कादायक आहे.

जुन्या गोष्टी विसरून नवीन वर्षात प्रवेश करावा असं सर्वानाच वाटतं, पण कटू आठवणी लवकर विसरता येत नाही हेदेखील तितकंच सत्य आहे. मानवी स्वभावात आपल्याला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टीच जास्त लक्षात राहतात, अशाच काही कटू आठवणी हिंदी सिनेमा इंडस्ट्रीच्यादेखील आहेत ज्या ही इंडस्ट्री कधीच विसरू शकणार नाही. कोरोनाची २ वर्षे आधीच खराब गेलेल्या इंडस्ट्रीला २०२२ या वर्षाकडून अनेक अपेक्षा होत्या, बिग बजेट सिनेमे याच वर्षी रिलीज झाले आणि त्या सिनेमांच्या कमाईतून २ वर्षांचा तोटा भरून निघेल अशी आशा सिनेनिर्मात्यांना होती, पण घडलं याउलट, कोरोनाच्या काळात वाढलेलं ओटीटीच प्रस्थ, दाक्षिणात्य सिनेमांनी आकर्षित केलेला हिंदी प्रेक्षक आणि नेपोटीजमसारख्या मुद्यांनी टीकेची धनी ठरलेली हिंदी इंडस्ट्री अधिकच तोट्यात गेली. सुपरस्टार असो किंवा तथाकथित मोठे बॅनर्स, सगळेच्या सगळेच बॉक्स ऑफिसवर आपटले आणि यावर्षाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.

२०२२ या वर्षात सगळेच हिंदी सिनेमे आपटले असं नाही, या वर्षातदेखील काही सिनेमांना प्रेक्षक लाभला, पण त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. याउलट फ्लॉप झालेल्या हिंदी सिनेमांची यादी काहीशी मोठी आहे. आमिर खान असो किंवा यशराज बॅनर सगळ्याच बड्या अभिनेत्यांना आणि निर्मात्यांना यावर्षी तोटा सहन करावा लागला. काहीवेळा फ्लॉप होण्याचं कारण कन्टेन्ट होतं तर काहीवेळा बॉलिवूडची ढासळलेली प्रतिमा, कारणं काहीही असली तरी त्याचा फटका इंडस्ट्रीला बसला हे मात्र खरं. कारण सिनेमे या आधीही फ्लॉप व्हायचे पण यावर्षी फ्लॉप होणार्‍या सिनेमांमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश आहे, त्यात काही नावं तर अशीदेखील आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षात तुफान यश मिळवलं होतं. जानेवारी ते डिसेंबर याकाळात फ्लॉप झालेल्या या सिनेमांच्या अपयशाची कारणं काय होती? सुपरफ्लॉप झालेले बडे चेहरे कोण आणि ते का अपयशी ठरले ?

- Advertisement -

आपल्याकडं सिनेमा हिट किंवा फ्लॉप ठरतो तो सिनेमाने केलेल्या एकूण कमाईवर, यावर्षी असे अनेक सिनेमे होते जे बनले बिग बजेटमध्ये, पण आपल्यावर झालेला खर्चदेखील ते वसूल करू शकले नाहीत. याशिवाय असेही काही सिनेमे होते जे का बनले, असा प्रश्न त्यात काम केलेल्या अभिनेत्यांसह प्रेक्षकांनादेखील पडला होता. २०२२ हे वर्ष हिंदी सिनेसृष्टीसाठी महत्वाचं होतं असं मी सुरुवातीलाच सांगितलं, कारण त्या आधीची दोन वर्षे कोरोनामुळे बंधनं होती, पण यावर्षी कुठलीही बंधनं नसताना हिंदी सिनेमे चालले नाही. उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास यावर्षी रिलीज झालेल्या हिंदी सिनेमांमध्ये सर्वाधिक कमाई करणारे १० सिनेमे बघा, त्यात दहाव्या क्रमांकावर येतो तो ‘राम सेतू’ सिनेमा ज्याने ९० कोटींच्या आसपास कमाई केलीये. याउलट तुम्ही हीच आकडेवारी २०१९ सालची पाहिली तर लक्षात येईल की, त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणार्‍या पहिल्या दहा सिनेमांच्या यादीत दहाव्या असणार्‍या सिनेमाने तब्बल २३० कोटींची कमाई केली होती. यावरून लक्षात येईल की, हे वर्ष बॉलिवूडसाठी वाईट गेलंय, कारण यावर्षी सिनेमे तितके चालले नाही.

वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी ते मार्च काळात २ मोठे सिनेमे फ्लॉप ठरले, ज्यात सगळ्यात मोठा फटका बसला तो बाहुबली फेम प्रभासच्या राधे श्याम सिनेमाला… हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाचं बजेट साडे तीनशे कोटी असताना केवळ २१४ कोटींची कमाई हा सिनेमा करू शकला, म्हणून तब्बल १३६ कोटींचा फटका बसलेला हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला. याच तीन महिन्यात खिलाडी अक्षय कुमारचा बच्चन पांडे रिलीज झाला, अक्षयने २०२१ साली सूर्यवंशीच्या रूपाने एकमेव ब्लॉकबस्टर सिनेमा दिला होता, पण यावर्षी मार्चमध्ये रिलीज झालेला त्याचा बच्चन पांडे बॉक्स ऑफिसवर चालला नाही आणि १६५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाला ९२ कोटींचा तोटा सहन करावा लागला. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात फक्त २ हिंदी सिनेमे होते ज्यांना प्रेक्षक लाभला, ज्यातील एक सिनेमा या वर्षीचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा आहे. विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्सने ३४० कोटी आणि संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी सिनेमाने २१० कोटींची कमाई करत, हिंदी इंडस्ट्रीची लाज राखली.

- Advertisement -

एप्रिल ते जून २०२२ या वर्षाच्या दुसर्‍या क्वार्टरमध्ये हिंदी इंडस्ट्रीच नशीब बदलेल अशी अपेक्षा होती, पण घडलं याउलट.. कारण याच ३ महिन्यात इंडस्ट्रीला अनेक मोठे धक्के बसले, ज्यात सगळ्यात मोठा फटका होता तो खिलाडी अक्षय कुमारला… अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज सिनेमाकडून सर्वानाच अपेक्षा होत्या, मात्र तीनशे कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाला जेमतेम ९० कोटींची कमाई करता आली आणि म्हणून निर्मात्यांना तब्बल २१० कोटींचे नुकसान या सिनेमामुळे झाले. यावर्षीचा सर्वात फ्लॉप सिनेमा आणि सर्वाधिक नुकसान सहन करावा लागणारा सिनेमा म्हणून ‘पृथ्वीराज’ ओळखला जाईल. याच तीन महिन्यात कंगना रनौतचा धाकड, शाहिद कपूरचा जर्सी, टायगर श्रॉफचा हिरोपंती २, रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार, अजय देवगण अमिताभचा रनवे ३४, आयुष्मान खुराणाचा अनेक आणि जॉन अब्राहमचा अटॅक पार्ट १ असे मोठे सिनेमे फ्लॉप ठरले. यात जर्सीला ६७ कोटी, रनवे ३४ ला ५१ कोटी, जयेशभाई जोरदारला ६७ कोटी, धाकडला ९२ कोटी आणि अटॅकला ४७ कोटी रुपयांचं नुकसान झालं. याकाळात कार्तिक आर्यनचा भूल भुलैया २ आणि वरुण धवन अनिल कपूरचा जुग जुग जियो सिनेमांची जादू हिंदी प्रेक्षकांवर चालली.

वर्षाच्या तिसर्‍या क्वार्टरमध्येही हिंदी निर्मात्यांच्या पदरी निराशाच पडली, कारण यावेळी आमिर खानचा लाल सिंग चड्डा, आदित्य रॉय कपूरचा राष्ट्रकवच ओम, अक्षय कुमारचा रक्षाबंधन, रणबीर कपूरचा शमशेरा, विजय देवरकोंडाचा लायगर, तापसी पन्नूचा दोबारा आणि हृतिक सैफचा विक्रम वेधा असे सिनेमे आपटले. विक्रम वेधा सिनेमा यावर्षीच्या टॉप टेन कमाई करणार्‍या सिनेमांच्या यादीत असला तरी या सिनेमाला ४५ कोटींचा तोटा सहन करावा लागला. तिसर्‍या क्वार्टरमध्ये एकमेव सुपरहिट हिंदी सिनेमा म्हणजे रणबीर कपूरचा ब्रम्हास्त्र, जो यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा बनलाय, या सिनेमाने तब्बल ४३१ कोटींची कमाई केलीये. वर्षाचा शेवट गोड होईल असं अनेकांना वाटलं होतं, पण इथंही फार काही बदललेलं नाही.

थँक गॉड, राम सेतू, कोड नेम तिरंगा यांसारखे सिनेमे आपटले तर अजय देवगणने कमबॅक करत आपली जागा परत मिळवली. अजयच्या दृश्यम २ सिनेमाने अडीचशे कोटींहून अधिकची कमाई केलीये आणि वर्षाच्या शेवटी आणखी एक बिग बजेट सिनेमा रिलीज होतोय, ज्याकडून अपेक्षा आहेत. बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सर्कस सिनेमा ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होतोय, रोहित शेट्टीनेच मागच्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा दिला होता, यावर्षी रोहित ब्रम्हास्त्रचा रेकॉर्ड मोडू शकतो का ? हे आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. एकंदरीत हे वर्षदेखील बॉलिवूडसाठी वाईट स्वप्नं ठरलं आहे, हे म्हणायला हरकत नाही. आता २०२३ मध्ये तरी बॉलीवूडला लागलेलं हे ग्रहण संपेल का ? हे पाहावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -