घरफिचर्ससारांशआकाशीय प्रतलावर ‘दिशादर्शक मंझिल’

आकाशीय प्रतलावर ‘दिशादर्शक मंझिल’

Subscribe

शिक्षणात भारतीय ज्ञान समावेशाची क्रांतिकारी शिफारस ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यापीठ अनुदान आयोगाने’ (यूजीसी) नुकतीच केली आहे. चांगली गोष्ट आहे की इंग्रजीत फाडफाड बोलून तसेच तोकडे कपडे फाडून भाकरी महाग झाली, असे शिळ्या पिठाचे पिझ्झा बर्गर खात, परदेशी संस्कृतीचे गोडवे गाणारी मंडळी, पाश्चिमात्य लोक हे ‘पिस ऑफ माईंड’साठी वैदिक संस्कृती का आत्मसात करीत आहेत हे आतातरी समजून घेतील. ३१ डिसेंबर ‘साजरा’ करीत धुंद होताना आपल्या मुलांना ‘कॉन्व्हेंट स्कूल’ (पाश्चिमात्य आशय : अनाथ/ लावारीस किंवा टाकून दिलेल्या निराधारांचे होस्टेल) मध्ये भरती करण्यात आपण काय विसरून जात आहोत याचा विचारही व्हायला हवा. मानवी ‘ग्रहांतरा’नंतर नवीन ‘पंचांग’ संशोधन करावे लागेल, तेव्हा मानवी सभ्यतेच्या आकाशीय प्रतलावर राशी व नक्षत्रांच्या क्रांतिकारी आणि दिशादर्शक ‘मंझिल’चा प्रवास समजून घ्यायला हवा.

एक अभ्यासक विद्यार्थी म्हणून माझे असे स्पष्ट मत आहे की, चिकित्सा न करता एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे जशी ती अंधश्रद्धा ठरते तसेच एखादी गोष्ट चिकित्सा न करता सरळ सरळ पूर्वग्रह दूषित विचाराने ‘जजमेंटल’ बनत नाकारणे हीदेखील अंधश्रद्धाच आहे.

इंग्रजी कॅलेंडरबरोबरच भारतीय काळ व कालगणना समजून घेणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्रउभारणीत योगदान देताना गुणवत्ता व मार्कासाठीच्या पोपटपंचीपेक्षा ‘फिल्डवर्क’ करीत सोसायटीचे ‘प्रॉब्लेम सॉल्व्हींग अ‍ॅबिलीटी’ वाढविण्याची पुरेपूर संधी ‘प्रलय’ तसेच ‘सृजनशीलता’ धारण करणार्‍या ‘गुरू’ना नवीन शैक्षणिक धोरणात (एनईपी) मिळणार आहे. भारतीय ज्ञानरचनेबाबतचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करताना एकूण अभ्यासवर्गाच्या १० टक्के भाग म्हणजे तीस तास हा आता भारतीय ज्ञानरचनेचा असणार आहे.

- Advertisement -

प्राध्यापकांना वेतनवाढ आणि पदोन्नती लाभासाठी, अद्ययावत ठेवण्यासाठी बंधनकारक असलेल्या दिशासाधन वर्ग (ओरिएन्टेशन) आणि उजळणी पाठ्यक्रमात (रिफ्रेशर कोर्स) भारतीय संस्कृतीची आणि अगाध ज्ञानाची तोंडओळख तरी यामुळे होईल. दिशासाधन अभ्यासक्रमात मॉरलिटीवर आधारित मोक्ष, दान, पुण्यकर्म, मानवी शरीरात चेतनाशक्ती देणारा आत्मा, वातावरण बदल घडवून आणणारी यज्ञातील ऊर्जाशक्ती, समाज संतुलन राखण्यासाठी कामाची सर्व जबाबदारी वाटप करीत मॅनेजमेंटचे धडे देणारी वर्ण व जाती व्यवस्था, पुराण व उपनिषदांतील ज्ञान भांडार, राष्ट्र संकल्पनेत लोक, प्रजा, लोकतंत्र, प्रजातंत्र, स्वराज्य, सुराज्य यांची ‘आचार्य’ बनण्यासाठी ‘फिलॉसॉफी’ची आवश्यक ओळख करून दिली जाणार आहे.

याशिवाय रसायनशास्त्रात आयुर्वेदातील रसशास्त्र, अर्थशास्त्रात धर्मशास्त्र, भगवद्गीता तत्त्वज्ञान व महाभारताच्या अनुषंगाने अर्थशास्त्राचा अभ्यास, कला आणि वास्तुकला अभ्यासक्रमात वैदिक यज्ञ, वास्तुपुरुष या संकल्पना आणि कॉस्मिक एनर्जी आणि तीर्थक्षेत्रांच्या विज्ञानाचा अभ्यासदेखील असेल. भूगोलात भारतवर्षाचा भूगोल, खगोलशास्त्रात वेदांग ज्योतिष, पंचांग, शेतीचा अभ्यास करताना कीड रोखत अन्नधान्य, फळे, पालेभाज्या व एकंदर पीकदर्जा व उत्पादन वाढीसाठी काळाच्या मोजपट्टीवर विशिष्ट नक्षत्रांनुसार शेतीचे नियोजन व परिणाम यांचा संशोधनपर अभ्यास विद्यार्थी बनत आता ‘महाविद्यालयीन गुरुजी’ करताना दिसतील.

- Advertisement -

सूर्य, चंद्र, तारे यांच्याशिवाय कालमापन आणि आपले जीवन कसे असेल? मानवी सभ्यता तरी कशी असू शकते कधी कल्पना तरी आपण केली आहे?

पंचांग

आकाशीय प्रतलाचे निरीक्षणात्मक व गणितीय अभ्यास करून पृथ्वीच्या क्षितिजावर एखादा ग्रह कसा मार्गक्रमण करतो त्याचे लिहिले गेलेले कोष्टक म्हणजे ‘पंचांग’ होय. तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग ही पंचांगाची पाच मुख्य अंगे आहेत. पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले होते. आजपासून ६९ वर्षांपूर्वी भारत सरकारने १९५३ सारी चांद्रवर्ष, सौरवर्ष, लिप-ईअर, हजारो वर्षांपासून आदिवासी व शेतकर्‍यांद्वारा वापरत असलेल्या ‘पंचांग’चा अभ्यास करण्यासाठी पंचांग सुधारणा समितीची स्थापना केली. विक्रम संवता, शालिवाहन शक, शिखांचे वर्ष, पारशी वर्ष, जैन वर्ष, हिजरी वर्ष आदी विविध कालगणना पद्धतीचा अभ्यास यावेळी झाला. याचाच अर्थ मानवाने दुसर्‍या ग्रहावर पाऊल ठेवले तर ग्रहांतरानंतर त्या त्या ठिकाणी संशोधनाने नवीन गणितीय कोष्टक म्हणजे पंचांग बनवावे लागेल, जे पृथ्वीवरील पंचांगापेक्षा पूर्णपणे भिन्न असेल.

गुरू आणि ज्ञान-कुंभ-यज्ञ!

भारतात प्राचीन काळापासून आदिवासी वापरतात ते पंचांग म्हणजे पाच अंग असलेले कालमापक अचूक आहे. ज्ञान आदानप्रदान करण्यासाठी खगोलांचा अभ्यास करीत नोंदी ठेवणारे आदिवासी व इतर विविध क्षेत्रांतील शास्त्रज्ञांची भरलेली अशी एका अर्थाने खरंतर ‘इंटरनॅशनल क्नॉलेज कॉन्फरन्स’ म्हणजे कुंभमेळा होय. हर्षवर्धनने इ.स.पूर्व ६४४ च्या सुमारास अलाहाबाद येथे कुंभमेळ्याची सुरुवात केली. बृहस्पती म्हणजे ‘गुरू’ ग्रहाने क्रांतीवृत्तावरील एक प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या ठिकाणी साजरा होणारा प्रत्येक उत्सव म्हणजे कुंभमेळा होय. सुमारे १२ वर्षांच्या चक्रात हा उत्सव चार नदी-काठच्या क्षेत्रांवर साजरा केला जातो. दर तीन वर्षांनी अलाहाबाद (गंगा-यमुना-सरस्वती नद्यांचा संगम), हरिद्वार (गंगा), नाशिक (गोदावरी) आणि उज्जैन (शिप्रा) या ठिकाणी अनुक्रमे कुंभमेळा भरतो. देशातील एका स्थानावर अशा प्रकारे दर बारा वर्षांत म्हणजे एका तपानंतर एकाच ठिकाणी कुंभमेळा सध्या सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च करून आयोजित करण्यात येतो. पुढे केवळ भारतीयच नव्हे तर जगभर पंचांग प्रसार या ‘ज्ञान कुंभमेळा’ संमेलनातून झाला आणि आता विविध पंचांग रूपे ही हिंदू कॅलेंडर रुपात वापरली जात आहेत.

संवत्सर!

वर्षाच्या कालगणनेसाठी संवत्सर ही संकल्पना आहे. एक विशिष्ट अनुक्रमांक असलेले संवत्सर वर्षाने संपते आणि पुढचा क्रमांक येतो. इसवी सन, शक संवत्सर आणि विक्रम संवत ह्या भारतभर वापरात असलेल्या संवत्सर मालिका आहेत.

‘मंझिले’ अपनी जंगम है…!

सूर्य आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. ३६० कोनाचे आकाशीय प्रतलाचे किंवा क्रांतिवृत्ताचे जर १२ विभागात विभाजन केले तर एका राशीचे चिन्ह ३० डिग्रीत मिळते. परिणामी मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, मीन अशा बारा राशींची नावे आहेत. तसेच राशींचे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अध्ययन करता यावे म्हणून याचेदेखील अजून सत्तावीस भागात विभाजन झाले. परिणामी ३६० कोनाचे आकाशीय प्रतलाचे किंवा क्रांतिवृत्ताचे २७ भाग केले तर एक नक्षत्र १३.३३ डिग्रीच्या रुपांतर केले गेले असे हे साधेसोपे गणित विज्ञान आहे. थोडक्यात एका मोठ्या राशीत साधरण सव्वा दोन नक्षत्र सामावलेली असतात.

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ, उत्तराषाढ, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही २७ नक्षत्रांची नावे ३६० अंशाच्या आकाशीय प्रतलाचे भाग करून दिली गेलीय. पूर्वी आकाशात अभिजित हे २८ वे नक्षत्र म्हटले जात असे, मात्र कालांतराने अभिजित नक्षत्र क्रांतिवृत्तावरून बाजूला सरकले म्हणूनच आज आपण केवळ २७ नक्षत्रे मानतो.

पाणिनी यांनी दिलेली नक्षत्रांचा व्युत्पत्ती ‘न क्षरन्ति’ – जी झडत नाहीत, पडत नाहीत, क्षय अगर नाश पावत नाहीत ती अशी आहे. तारका ज्या अर्थी त्या तरल्या त्या तारका असाही कोटीक्रम केलेला आढळतो. ग्रहपथाचे विभाग पाडण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत त्या राशी व नक्षत्र या नावाने ओळखल्या जातात. तारे व तारकांच्या समूहाला नक्षत्र म्हटले जाते. आकृतीवरून काही नक्षत्रांना नावे पडली.

सनातन धर्म किंवा सिंधू नदीच्या खोर्‍यालगतची म्हणून एक वेगळीच ओळख हवेली प्रगत व प्रगल्भ मानवी सभ्यता म्हणजेच हिंदू संस्कृती! हिंदूप्रमाणे प्राचीन काळी चिनी व अरबी लोकांत नक्षत्र-पद्धती होती. ‘मंझिल’ हा आपण लक्ष्य किंवा डेस्टिनेशन म्हणून वापरतो, परंतु ‘मंझिल’ हा शब्द अरबांमध्ये नक्षत्रवाचक आहे हे अनेकांना माहीत नाही. राशी व नक्षत्रांची दिशादर्शक ‘मंझिल’ समजून घ्यायला हवी.

युरेका! युरेका!! आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

इसवी सन ५०० च्या सुमारास भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी निरीक्षण व गणितीय आकडेमोड करून एका वर्षाची लांबी ही ३६५ दिवस १५ घटिका ३९ पळं आणि १५ विपळं इतकी असते असे निष्कर्ष मांडले होते. अमावस्येला होणारे सूर्यग्रहण व पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण हा चेंडूसारख्या असलेल्या चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांचा परिपाक खेळ आहे हेदेखील आर्यभट्ट यांनी सांगितले होते. भौतिकशास्त्रातील निष्कर्ष अधिक बिनचूक असतात. प्रयोग अयशस्वी झाला हे जाहीर करण्यात शास्त्रज्ञांना संकोच वाटत नाही. शास्त्रज्ञ हे प्रसिद्धी किंवा पैशांच्या लालसेपोटी कधीच संशोधन करीत नसतात. युरेका! युरेका!! करीत नवीन गोष्टी शोधल्याचे आत्मसमाधान हे त्यांना आत्मगौरव देत असते. वास्तवतेशी विसंगत गणितीय निष्कर्ष मिळाले किंवा लोकांनी केलेल्या टीकेला घाबरून संशोधन बंद केले असे शास्त्रज्ञ मानवी संस्कृतीत कुठलेच योगदान करू शकत नाही. कारण संशोधन प्रसिद्ध केले नाही तरी अविरतपणे तपासणी पद्धतीतूनच त्रुटी दूर करीत विज्ञानाची वाट संशोधक प्रशस्त बनत असते.

कर्मकांडांच्या अवडंबरातून सत्ता केंद्रित करून बहुजनांचे शोषण झाले हा इतिहास आहे. आधारहिन व अवैज्ञानिक दावे करीत भेदभाव व विषमता निर्माण करीत होणार्‍या कुठल्याही शोषण प्रक्रियेचे कधीही समर्थन होऊ शकत नाही व माझा विरोधच आहे. श्रद्धेच्या नावाखाली लोकांमध्ये अंधश्रद्धा रुजविणे, वाढविणे आणि त्यातून शोषण, अन्याय व दहशत निर्माण करणे, अनिष्ठ अवैज्ञानिक कृतींचे समर्थन करावे, ही बाब जादूटोणाविरोधी कायद्याचा भंग करणारी आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील क्रांतीने जग बदलत असताना माणसांचे विचार आणि कृती यात बदल होत आहेत, परिवर्तनाचे हे चित्र नक्कीच आशावादी आहे.

वैज्ञानिक संशोधन पद्धती

सत्यासत्य तार्किकदृष्ट्या पडताळण्याची क्षमता विज्ञान मिळवून देते. कुठलीही गोष्ट ‘ब्रह्मवाक्य’ न मानता चिकित्सा करत नवे सत्य समजण्याचा हा एक सुंदर प्रवास आहे. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत होय. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत होय. वैज्ञानिक संशोधन पद्धतीचा उद्गाता म्हणून इराकमधील अल-हाजेन (इ.स. ९६५-१०३५) याचे नाव घेतले जाते. कोणत्याही क्षेत्रात नवे प्रश्न विचारणे, त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयोग करणे, त्याद्वारे नैसर्गिक घडामोडींची माहिती (डेटा) संकलित करणे व तो डेटा पुनरुत्पादनीय आहे (म्हणजे वारंवार, वेगवेगळ्या व्यक्तींनी, विविध ठिकाणी केलेल्या प्रयोगांची निरीक्षणे सारखीच असतील) याची खातरजमा करून घेणे ही वैज्ञानिक पद्धतीची मूळ सूत्रे त्यानेच प्रतिपादन केली.

…हा ‘पीयर रिव्ह्यू’ ही हवा!

मानवी शरीर आणि वसुंधरेचे वातावरण यात मुबलक पाणीसाठा आहे. या सर्वांवर गुरूत्वाकर्षण शक्तीचा परिणाम स्थळ काळानुसार किती व कसा होतो यावर संशोधन गरजेचे आहे. आज चंद्रावर व मंगळ ग्रहावर मानवी सभ्यतेच्या पादाक्रांत मोहिमेत आकाशीय घटक व घटनांचा हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या या संशोधनाचा ‘पीयर रिव्ह्यू’ न करता थेट ते ‘थोतांड’ समजून नाकारणे ही ‘अंधश्रद्धा’च होणार नाही का? यावरदेखील विचार होईल अशी आशा आहे. नक्षत्रांद्वारे कोणत्याही व्यक्तीची विचार करण्याची क्षमता, आंतरिक दृष्टिकोन आणि त्याच्या इतर वैशिष्ठ्यांचे विश्लेषणदेखील करता येते हे गृहीतक निदान किती टक्के ‘व्हॅलिड’ अथवा ‘नल’ हे निदान तपासून मगच निष्कर्षावर बोलणे हा माझ्या मते खरा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.

इंग्रजी कॅलेंडर

ग्रेगोरियन कॅलेंडर व ज्युलियन कॅलेंडर यांच्या मिश्रणातून इंग्रजी कॅलेंडर बनले, पण त्यात अनेक चुका राहिल्यात. आज जगभरात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे इंग्रजी कॅलेंडरला ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’ म्हणूनही ओळखले जाते. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये सामान्य वर्ष ३६५ दिवसांचे असते. या कॅलेंडरमध्ये मराठी कॅलेंडरप्रमाणेच १२ महिने असतात. सर्वात पहिले इंग्रजी कॅलेंडर पंधराव्या शतकात बनवण्यात आले होते. इंग्रजी कॅलेंडर हे सौर कालगणनेवर आधारित आहे.

अधिक मास आणि लीप वर्ष

कालमापन करताना अधिक मास आणि लीप वर्ष या दोन्ही संकल्पना मिळत्याजुळत्या आहेत. मराठी कालगणनेनुसार वर्षाचे बाराच महिने असतात, परंतु दर तीन वर्षांनी एक महिना जास्त धरावा लागतो. त्या तेराव्या महिन्याला ‘अधिक मास’ म्हणतात.

पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवस ५ तास ५९ मिनिटे आणि १६ सेकंदात प्रदक्षिणा पूर्ण करते. कारण एका साईडरियल वर्षाची वास्तविक लांबी (पृथ्वीला सूर्याभोवती एकदा फिरण्यासाठी लागणारा वेळ) प्रत्यक्षात ३६५.२४२५ दिवस आहे. आकडेमोड करताना गडबड टाळण्यासाठी ३६६ दिवसांचे लीप वर्ष दर चार वर्षांनी एकदा वापरले जाते. सरासरी वर्ष ३६५ दिवसांची तीन सामान्यत: यामुळे धरली जातात.

चांद्र कालगणनेत मराठी महिने

पण प्रत्येक मराठी महिन्यात साडे २९ दिवस असतात आणि त्यांचा संबंधदेखील चंद्राशी आहे हे किती जणांना माहिती आहे? लहानपणी शाळेत मराठी कॅलेंडरमध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणेच १२ महिने असतात जी चांद्र कालगणनेवर आधारित आहे, पण सूर्याचा विचारदेखील करते.

चंद्राला पृथ्वीभोवतील प्रदक्षिणेमध्ये एका तार्‍यापासून निघून पुन्हा त्याच तार्‍यापाशी येण्यास सु. २७ आणि १/३ दिवस लागतात, म्हणून २७ क्वचित २८ नक्षत्रांची संख्या ठरविण्यात आली.

चंद्राची कक्षा आणि चंद्राला पृथ्वीभोवती एक पूर्ण वर्तुळात फेरी म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २७ दिवस, ७ तास आणि ४३ मिनिटे कालावधी लागतो. यामुळे चंद्र दररोज १२-१३ अंश पूर्वेकडे सरकतो. या शिफ्टचा अर्थ चंद्राला दृश्यात आणण्यासाठी पृथ्वीला थोडा जास्त वेळ फिरवावा लागतो, म्हणूनच चंद्रोदय दररोज सुमारे पन्नास मिनिटांनी होतो हे भूगोलात आपण शिकतो. सूर्य व चंद्र यांच्यात १२ अंशाचे अंतर झाले की प्रतिपदा होते. अशा प्रकारे दर १२ अंशापासून नवीन तिथी चालू होते यालाच तिथी बदल असे म्हणतात. एक तिथी म्हणजे एक चांद्र दिवस असे ढोबळमानाने गणित होय. एका विशिष्ट वेळी चंद्र आणि सूर्य एकत्र आले की अमावस्या होते. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावस्या अशा सोळा तिथी आहेत. चंद्र व सूर्य एकत्र आल्यानंतर चंद्र जलद गतीने सूर्याच्या पुढे जातो. सूर्य व चंद्र यांच्यात १२ अंशाचे अंतर झाले की प्रतिपदा होते.

तिथी

तिथी हे हिंदू कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. अमावास्यान्त पद्धतीप्रमाणे शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष होय. अशा या दोन पक्षांचा (पंधरवड्यांचा) एक मास (महिना) होतो. चंद्राच्या बदलत्या दृश्य कलांनुसारच यापैकी एकाला ‘कृष्ण पक्ष’ तर एकाला ‘शुक्ल पक्ष’ म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात दोन प्रत्येकी १५ दिवसांचे पंधरवडे किंवा पक्ष असतात. शुक्ल पक्षाला शुद्धपक्ष आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष असेही म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते. त्यामुळे त्या तिथीचा क्षय झाला असे समजतात. तिथीचा क्षय म्हणजे ती तिथी आलीच नाही असे मात्र होत नाही.

योग

योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. सूर्य रोज जवळपास ५९ कला एवढे अंतर चालून जातो, तर चंद्र रोज ७९० कला एवढे अंतर चालून जातो. दोघांच्या चालून गेलेल्या अंतराची एकूण बेरीज जर ८०० कला एवढी झाली की एक योग पूर्ण होतो. चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात. विष्कम्भ, प्रीति, आयुष्मान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृति, शूल, गंड, वृद्धि, ध्रुव, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धी, व्यतिपात, वरीयन, परीघ, शिव, सिद्ध, साध्य, शुभ, शुक्ल, ब्रह्म, एन्द्र, वैधृति असे एकूण २७ योग आहेत.

याशिवाय योग हे वैदिक षड्दर्शनांमधील एक दर्शनसुद्धा आहे. योगाचे वेगवेगळे प्रकार हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांत दिसून येतात. योग हा शब्द संस्कृत युज् या धातुपासून तयार झाला आहे. पाणिनी व्याकरणामध्ये युज् समाधौ असे सूत्र आहे. जोडणे, एकत्र आणणे, जुळवणे योग या शब्दाचा अर्थ होतो.भारतीय योग शास्त्रामध्ये पाच योग सांगितले आहेत. आत्मज्ञानासाठी ज्ञान योग, आसन आणि कुंडलिनी जागृतीसाठी हठ योग, कर्मात कुशलता आणण्यासाठी कर्म योग, भजन करीत भक्ति योग आणि चित्तातील वृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजयोग असे पाच योग आहेत.

योग एक पूर्ण विज्ञान, एक पूर्ण जीवनशैली, एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे असा उल्लेख असंख्य ग्रंथात आढळतो. मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्म्याबरोबर मीलनाची आकांक्षा करतो तो परमानंद क्षण म्हणजे योग होय ही व्याख्या अनेकांना माहीत नाही. पतंजलीने योगाचा अर्थ चित्तातील वृत्तींचा निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे. त्याच्या विचारांनुसार योगाची आठ अंगे आहेत. यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह), नियम (स्वाध्याय, संतोष, तप, पवित्रता, आणि ईश्वराप्रति चिंतन), योगासन, प्राणायाम, प्रत्याहार ही बाहेरची पाच अंगे आहेत, तर धारणा, ध्यान, समाधी ही आतली किंवा मानसिक अंगे आहेत.

करण
पंचांग कालमापनाचे शेवटचे अंग म्हणजे करण होय. तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण होय. एका तिथीमध्ये पूर्वार्धात एक व उत्तरार्धात दुसरे अशी दोन करणे होतात. सूर्याच्या पुढे ६ अंश चंद्र जाण्यास जो वेळ लागतो त्यास करण असे म्हणतात. एकूण करणे ११ असून त्यांचे दोन प्रकार आहेत. ११ पैकी बल, वालव, कौलव, तैतिल, गर, वणिज, विष्टी/भद्रा या पहिल्या सात करणांना ‘चर करणे’ असे म्हणतात, तर उरलेल्या शकुनी, चतुष्पाद, नाग व किंस्तुघ्न या चार करणांना ‘स्थिर करणे’ म्हणतात.

पहिली सात करणे म्हणजे चर करणे ही शुक्ल प्रतिपदेच्या उत्तरार्धापासून क्रमाने सुरू होतात व त्यानुसार कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या पूर्वार्धापर्यंत एकूण ५६ करणे पुन्हा पुन्हा येतात. नंतर कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या उत्तरार्धाला शकुनी, अमावस्येच्या पूर्वार्धाला चतुष्पाद व अमावस्येच्या उत्तरार्धाला नाग ही करणे येतात. शुक्ल पक्षाच्या पूर्वार्धाला किंस्तुघ्न करण असते.

ज्या तिथीचे करण काढायचे असेल त्या तिथीसह शुक्ल प्रतिपदेपासून मोजून जी संख्या येईल तिच्या दुपटीतून एक वजा करून सातने भागावे. जी बाकी उरेल तोच अंक त्या तिथीच्या उत्तरभागीचे करण समजावे असे गणित पंचांगात वापरले जाते. कालपटलावर एखादा मुहूर्त चांगला की वाईट हे ठरविण्यासाठी योगांचा आधार घेतला जातो.

होरा आणि अवर

इंग्रजी अवर या शब्दाचे उगमस्थान ग्रीक नव्हे तर भारत आहे हे अनेकांना माहीत नाही. होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एक अहोरात्रचे २४ समान भाग केले असता एक भाग म्हणजे होरा होय. संस्कृत भाषेत होरा म्हणजे एक तास म्हणजेच अडीच घटका होय. होरा म्हणजे एका आकाशस्थ राशीचा अर्धा भाग व चार चरण किंवा पाद असाही होतो. त्यामुळे बारा राशींचे २४ होरे असतात. दिवसाचे २४ होरा असतात. आठवड्यातील प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नवीन होर्‍याने होते. तो होरा ज्या ग्रहाचा असतो त्याचे नाव त्या वाराला मिळते.

घटिका, पळं, प्रहर

एक घटिका म्हणजे २४ मिनिटे होय, म्हणजेच एक तासात अडीच घटिका असतात. एक घटिका ६० पळांनी बनते तर एक पळं हे ६० विपळं इतके सूक्ष्म कालमापन होय. एक विपळं हे ६० प्रतिपळांनी बनते.
एक प्रहर हा तीन तासांचा याचा अर्थ साडेसात घटिका इतका होय, म्हणजेच दिवसांत ६० घटिका असतात. दिवसात एकूण आठ प्रहर असतात, यावरुन अष्टोप्रहर हा शब्द दिवसासाठी वापरला जातो. दिवसाचे विभाजन साधारण दिवसा ६ ते ९ हा पूर्वान्ह, ९ ते १२ हा मध्यान्ह, १२ ते ३ हा अपरान्ह, तर ३ ते ६ सायंकाल तसेच रात्री ६ ते ९ प्रदोष, ९ ते १२ निशिथ, १२ ते ३ त्रियाम आणि ३ ते ६ उषा अशी भारतीय कालमापन पद्धतीत प्रहरांची नावे दिली गेली आहेत.

आठवड्यातील वार

आकाशात डोळ्याने दिसणारे ग्रह आणि सूर्य-चंद्र यांचा मंद ग्रहापासून शीघ्र ग्रहापर्यंत (आ मंदात शीघ्रपर्यंतम् होरेशा:) असा क्रम लावला तर शनी, गुरू, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र हा क्रम येतो. शनीनंतर मंगळापासून मोजायला सुरुवात केली की २४ वा ग्रह रवी येतो, म्हणून शनिवारनंतर रविवार येतो. रविवारनंतर शुक्रवारपासून मोजायला सुरुवात केली की २४ वा क्रमांक चंद्राचा येतो. म्हणून रविवारनंतर चंद्राचा वार म्हणजे सोमवार अशा रीतीने आठवड्यातील सर्व वारांची नावे व क्रम मिळतो ही भारतीय देण आहे.

जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन प्रवासात साथ देणार्‍या कॅलेंडरची रूपे अनेक आहेत आणि जीवन प्रवासात काळगणना समजून घेणे हे रंजक असले तरी अंधश्रद्धा नव्हे.

१. मूळचे नाव : रोमन कॅलेंडर

२. सम्राट ज्युलियन सीझरने दिलेले नाव : ज्युलियन कॅलेंडर

३. पोप ग्रेगरीने सुधारणा करीत दिलेले नाव : ग्रेगरियन कॅलेंडर

४. साल १७५२ : इंग्लंडने ग्रेगरियन कॅलेंडरचा स्वीकार केला. हळूहळू युरोप आणि नंतर जगभर कॅलेंडरचा प्रचार-प्रसार झाला.

५. ऋतू आणि मराठी महिने

सहा ऋतू हे बारा मराठी महिन्यात प्रत्येकी दोन प्रमाणे विभागले गेले आहे. अंधश्रद्धा नव्हे तर यामागेदेखील मानवी आरोग्य आणि वातावरण बदलांशी निगडित विज्ञान आणि आहार विहाराचे तंत्रज्ञान आहे जे डोळसपणे तटस्थ होत अभ्यासत समजून घ्यायलाच हवे. वसंत (चैत्र, वैशाख), ग्रीष्म (ज्येष्ठ, आषाढ), वर्षा (श्रावण, भाद्रपद), शरद (आश्विन, कार्तिक), हेमंत (मार्गशीर्ष, पौष), शिशिर (माघ, फाल्गुन) अशी त्यांची रचना केली आहे. विशेष म्हणजे महिने आणि ऋतू यांची समीकरणातून विविध सण आणि व्रते भारतीय परंपरेत साजरी केली जातात. वसंत ऋतूत गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा, वसंत पंचमी, तर ग्रीष्म ऋतूत वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, वर्षा ऋतूत नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, हरितालिका, गणेश चतुर्थी अशी तसेच शरद ऋतूत देवीचे शारदीय नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली असे सण येतात. हेमंत ऋतूत मार्गशीर्ष गुरुवार व्रत, दत्त जयंती, मकर संक्रांती तर शिशिर ऋतूत माघी गणेश जयंती, होळी, रंगपंचमी असे सण व व्रते केली जातात.

भारतीय कालमानाचे कोष्टक

६० प्रतिविपळे = १ विपळ
६० विपळे = १ पळ
६० पळे = १ घटिका
२ घटिका = १ मुहूर्त
३० मुहूर्त = = ६० घटिका = १ दिवस (अहोरात्र)
१५ तिथी (१५ अहोरात्र) = १ पक्ष (पंधरवडा)
२ पक्ष = १ मास (हिंदू महिना)
२ मास = १ ऋतू
३ ऋतू = १ अयन
२ अयन = १ हिंदू वर्ष
——-

महिन्यांचं बारसं

जानेवारी : रोमन पुराणानुसार कार्यारंभ पूजन व स्वर्गाचा दोन तोंडे असलेला व डाव्या हातात स्वर्गाचा दरवाजा उघडण्याच्या किल्ल्या घेऊन असलेला द्वारपाल ‘जेनस’ वरून.

फेब्रुवारी : फेब्रुआ नावाच्या लोकांच्या आत्मशुद्धीकरणानंतरच्या अन्नग्रहण कार्यक्रमावरून.

मार्च : इसवी सनापूर्वी ९०० च्या सुमारास ३०४ दिवसाचे वर्ष होते व दहा महिन्यात पहिला महिना रोमन युद्ध देवता ‘मार्स’ वरून अपभ्रंश होत ‘मार्च’ होता व आर्थिक ताळेबंद करत, आखाडे बांधत, भविष्याचे ‘स्ट्रॅटेजी प्लॅनिंग’ होत असे. म्हणूनच आजही ही परंपरा कायम असून आर्थिक वर्षांत मार्च एंडला महत्त्व अबाधित आहे. जुलै व ऑगस्ट हे दोन महिने त्यावेळी अस्तित्वातच नव्हते.

इसवी सनापूर्वी ६७३ यावर्षी ‘न्यूपा’ नावाच्या बादशहाने वर्ष हे १२ महिन्यांचे आणि ३५५ दिवसांचे बनविले. न्यूपाने पहिला, तिसरा, आठवा व दहावा हे ४ महिने ३१ दिवसांचे व उर्वरित २९ दिवसाचे केलेत, तसेच जानेवारी व २८ दिवसांचा फेब्रुवारी हे शेवटचे दोन महिने ठेवले. परिणामी नवीन वर्ष हे ‘न्यूपा’चे अपभ्रंश होत ‘न्यू इअर’ म्हणून ओळखले जात उत्सव साजरा होऊ लागला.
३०४ ते ३६५ दिवसांचे वर्षे : इसवीसनापूर्वी ३०० व्या वर्षी रोम्युलस राजाने ३६५ दिवसांचे वर्ष घोषित केले. तसेच पहिला, तिसरा, आठवा, दहावा हे चार महिने पूर्वीप्रमाणेच ३१ दिवसांचे ठेवत इतर सात महिने ३० दिवसांचे केले.

एप्रिल : ‘अप्रिलिय’ म्हणजे वसंतऋतूचे आगमन व धरतीवर फळे, फुले, प्राणी, समुद्र आणि जमीन खुली आहेत या शब्दावरून.

मे : मैया या मर्क्युरी देवतेच्या आईच्या नावावरून.

जून : ज्यूनो या ज्यूपिटर देवतेच्या पत्नीच्या नावावरून.

जुलै : ज्युलियस सीझरने स्वत:च्या नावावरून

ऑगस्ट : ज्युलियस सीझरचा मारेकरी ब्रुटसने ऑगस्टस म्हणजे महान हे नाव धारण करीत स्वत:च्या नावावरून ऑगस्ट महिना बनला.

सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर : सातवा, आठवा, नववा व दहावा नंबरवरील येणारा महिना असा अनुक्रमे या शब्दांसाठी वापरला जाणारा लॅटिन शब्द म्हणजे या चार महिन्यांची नावे होय. असं एकंदर कॅलेंडरचं बारसं झालं.

==(लेखक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -