घरठाणेठामपाचे सहायक आयुक्त आहेर यांना आव्‍हाडांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

ठामपाचे सहायक आयुक्त आहेर यांना आव्‍हाडांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

Subscribe

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा महेश आहेरावर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार तुरुंगात असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप बुधवारी व्हायरल झाली. या व्हायरल क्लिपनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी सायंकाळी महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट ४ च्या बाहेर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील सुप्त राजकीय संघार्षाच्या दुसर्‍या अंकाला सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड, त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत असल्याचे दुसर्‍या व्यक्तीला सांगत आहे. आव्हाड यांची मुलगी नताशा आणि जावई यांचा स्पेनमधील पत्ता शोधला असल्याचा ऑडिओमध्ये उल्लेख आहे, तर आव्हाड यांचा उल्लेख साप असा करण्यात आला आहे. ही क्लिप व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. हे संभाषण महेश आहेर यांचेच असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले.

- Advertisement -

आहेर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महापालिका मुख्यालयातून बाहेर येत होते. त्याचवेळी गेटबाहेर उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या कुटुंबीयांना संपवतो का, असा सवाल करीत आहेर यांना मारहाण सुरू केली. या मारहाणीत आहेर यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. आहेर यांच्या अंगरक्षकाने रिव्हॉल्व्हर काढून मारहाण करणार्‍या कार्यकर्त्यांवर रोखत आहेर यांना महापालिका मुख्यालयात आणले. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस बंदोबस्तात महेश आहेर यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

या संभाषणात माझं जेव्हा प्रोटेक्शन काढलं, तेव्हा रात्री पावणेबारा वाजता सीएमनी जॉइंट सीपींना फोन केला होता. माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका आहे, असं मी क्रिएट करून ठेवलंय. पोलीस अधिकार्‍यांना पटवून ठेवलं आहे. आव्हाड माझं केव्हाही काही करू शकतो…असं मी क्रियेट करून ठेवलं आहे. बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनमध्ये कामाला लावले आहेत. नताशाचा पत्ता शोधला आहे.

- Advertisement -

त्याचा जावई ठाण्यात नाही आला, तर त्याच्या बापावर एक अ‍ॅटॅक केला ना, तर तो एका दिवसात येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली. तो असा नाही आला ना त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे. स्पेन एवढं मोठं नाही. त्याचा विकास कॉम्प्लेक्स पत्ता आहे, त्याच्या आईवडिलांच्या सोबत एक कांड केला तर तो आईबाबांच्या ओढीने लगेच येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली. त्याची गेम करणार. त्याच्या मुलीला रडायला लावणार, म्हणजे त्याला कळणार मुलीचं दुःख काय असतं? प्लानिंग केलं आहे. तो साप आहे.

मी सर्व प्लान केला आहे. त्यालादेखील कळले पाहिजे महेश कधीही स्पॉट होऊ शकतो. आपली फॅमिली उद्ध्वस्त होऊ शकते. मुलीला काहीही होऊ शकते. तेव्हा तो आटोक्यात येऊ शकतो. तेव्हा तो शांत होईल. मला ठेचायचा आहे त्याला. माझ्या माणसाला विचारा सुटकेसभरून बाबाजीकडून पैसे येतात. बाबाजी माझ्यासाठी लीगल प्रॉपर्टीसाठी काम करतो, असे संभाषणात म्हटले आहे.

अशा धमक्यांना आपण घाबरत नसून पोलीस तक्रारही करणार नाही. कारण पोलीस काही करणार नाहीत हे मला माहीत आहे. आरोपी आपल्यासमोर फिरत असतो.
-डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

या प्रकरणाची १०० टक्के चौकशी केली जाईल. जितेंद्र आव्हाड किंवा कोणी नेता असेल त्यांना संरक्षण देण्यात येईल. कोणत्याही प्रकारचा आघात होऊ नये ही सरकारची जबाबदारी असून ती जबाबदारी चोखपणे पार पाडली जाईल.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -