घरसंपादकीयअग्रलेखकिस्मत साथ नही देती...

किस्मत साथ नही देती…

Subscribe

 

 

- Advertisement -

मै ये बनाना चाहता हूँ, ओ बनाना चाहता हूँ, लेकीन किस्मत साथ नही देती, मैं ताजमहल बनाना चाहता हूँ, लेकीन मुमताज नही मिलती, असा हिंदीत एक शेर आहे. काही माणसांची अवस्था या शेरसारखी होते. म्हणजे त्यांच्याकडे सगळे काही असते, कशाचीच कमतरता नसते, पण त्यांना नशीब साथ देत नाही, त्यामुळे त्यांना अपेक्षित लक्ष्य गाठता येत नाही. सध्या काहीशी अशीच अवस्था काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची झालेली आहे. राहुल गांधी यांच्याकडे तसे पाहू गेल्यास सगळे काही आहे. ते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतू आहेत. इंदिरा गांधींचे नातू, राजीव गांधींचे पुत्र आहेत. तसेच त्यांचे आडनाव गांधी आहे. अशी सगळी भव्यदिव्य परंपरा असताना राहुल गांधी कुठे कमी पडत आहेत, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. काँग्रेसवाल्यांनी आपण लोकशाहीवादी पक्ष आहोत, असा दावा कितीही टाहो फोडून केला, तरी गांधी या आडनावाच्या दावणीला हा पक्ष बांधलेला आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे कुणी गांधींना बाजूला सारून पुढे जाऊ इच्छीत नाही, तसेच ज्यांनी तशी महत्त्वाकांक्षा बाळगली, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला किंवा पक्षातच गप्प बसवण्यात आले. राहुल गांधी हेच काँग्रेसचे पुढील पंतप्रधान आहेत, असेच काँग्रेसजनांच्या मनात ठामपणे बसलेले आहे किंवा बसविण्यात आलेले आहे. खरे तर २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपकडे केंद्रीय पातळीवर भावी पंतप्रधान म्हणून पुढे येईल, असा कुणी प्रभावी नेता नव्हता, त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए -३ पुन्हा केंद्रात सत्तेत येणार आणि राहुल गांधीच पंतप्रधान होणार असे अनेक काँग्रेसजनांना वाटत होते, इतकेच नव्हे तर राहुल गांधी यांनाही वाटत होते. कारण दीर्घकाळ काँग्रेसच्या अध्यक्ष राहिलेल्या आणि पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांचीही राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे हीच इच्छा होती, पण त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी अचानक राष्ट्रीय पातळीवर आले आणि काँग्रेसचा सगळा डाव बिघडला.
नरेंद्र मोदी यांनी लोकांसमोर युपीएच्या दहा वर्षांच्या गैरकारभाराचाच पाढा वाचला, इचकेच नव्हे तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून नेहरु-गांधी यांनी देशाचे कसे नुकसान केले, सत्ता केवळ आपल्या वारसदारांसाठी कशी वापरली. सगळा देश एका कुटुंबांची कशी जहागिर झाला, या सगळ्या गोष्टी लोकांसमोर मांडून काँग्रेसमुक्त भारताचे आवाहन केले. त्यावर लोकांनी मोदींना भरभरून मतदान केले. पहिल्यांदाच मोदींनी भाजपला बहुमत मिळवून दिले. मोदी पंतप्रधान झाले. त्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अशी काही धुळधाण झाली की, त्यांना लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून बसण्यासाठी जेवढ्या जागा लागतात तेवढ्याही जिंकता आल्या नाहीत. त्यानंतर २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी आधी राहुल गांधींना पक्षाचे उपाध्यक्ष बनविण्यात आले, त्यानंतर अध्यक्ष बनविण्यात आले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, काँग्रेसचा पराभव झाला आणि मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला पूर्वीपेक्षाही जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे राहुल गांधींचे मन इतके खट्टू झाले की, त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना सोनिया गांधी आणि त्यांचे सल्लागार यांनी कितीही विनवण्या करूनही त्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे बराच काळ काँग्रेसला कुणी अध्यक्षच नव्हता.
काँग्रेससारखा मोठा पक्ष दीर्घकाळ नेतृत्वहिन राहणे योग्य नाही, अशाप्रकारचे एक पत्र काँग्रेसमधील २० ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठवून पाहिले, पण सोनियांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सोनियानिष्ठ मंडळी राहुल यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, असा आग्रह करत राहिले. शेवटी राहुल यांनी बराच कालावधीनंतर या पुढचा काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी कुटुंबाच्या बाहेरचा असेल, असे जाहीर करून टाकले, पण गांधींना आव्हान देऊन अध्यक्षपदाची निवडणूक लढणे यात काय धोका असतो, याची काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठांना कल्पना असल्यामुळे कुणीही पुढे आले नाही. आज राहुल गांधी आणि प्रियांका गांधी नरेंद्र मोदींवर हुकूमशाहीचा आणि लोकशाही धोक्यात आणण्याचे आरोप करत असले तरी काँग्रेसमध्येही गांधी घराण्याची किती एकाधिकारशाही, हुकूमशाही आहे हे अनेक वेळा उघड झालेले आहे. काँग्रेस पक्ष हा स्वत:ला लोकशाहीवादी मानत असला तरी त्या पक्षात गांधींशिवाय कुणाचे काही चालत नाही. ज्या वेळी गांधी आडनाव सोडून दुसरी व्यक्ती पंतप्रधान किंवा पक्षाध्यक्ष म्हणून आणली जाते, तेव्हा गांधींची काही तरी अडचण असते. अन्यथा, काँग्रेस हा पक्ष गांधींचेच संस्थान होऊन बसलेला आहे. राहुल गांधी यांनी नुकतीच काही राज्यांमधून भारत जोडो यात्रा काढली, पण आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा किती उपयोग होईल हे काही सांगता येत नाही. कारण एकहाती बहुमत मिळेल अशी काँग्रेसची आजची स्थिती नाही. तसेच विरोधात असलेले अनेक पक्ष काँग्रेसच्या पालखीचे भोई होऊ इच्छित नाहीत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले, त्यात प्रियांका गांधी यांचा आवाज जास्त बुलंद दिसत आहे. तिथे राहुल यांची उंची कमी पडत आहे. शेवटी म्हणतातना, नसीब अपना अपना.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -