घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'आम्ही सारे सावरकर' नाशिकमध्ये झळकले बॅनर; शिंदे आणि ठाकरे गट आले आमने-सामने

‘आम्ही सारे सावरकर’ नाशिकमध्ये झळकले बॅनर; शिंदे आणि ठाकरे गट आले आमने-सामने

Subscribe

नाशिक : राज्यासह देशात स्वा. सावरकर मुद्द्यावरून राजकारण तापले असून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला इशारा दिल्यानंतर संजय राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे नाशिकमध्ये याच मुद्द्यावरून शिंदे गटाने संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले असून बॅनर लावत राऊतांना खडे बोल सुनावले आहेत.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात पुन्हा सावरकर मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसला सल्ला दिला. सोबत राहायचे असेल तर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा शब्दात इशाराही दिला. यानंतर संजय राऊत यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत देखील सावरकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेतले नाहीत, असे सांगत इतरांनी आम्हाला सावरकर प्रेम शिकवू नये, असा सल्लाही दिला. दरम्यान आता याच मुद्द्यावरून नाशिकमध्ये शिंदे गटाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

रविवार कारंजा परिसरात शिंदे गटाकडून हे बॅनर झळकविण्यात आले. ज्यामध्ये संजय राऊतांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाने ‘आम्ही सारे सावरकर’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले असून बॅनरवर एका बाजूला काँग्रेस नेते मनी शंकर अय्यर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला बाळासाहेब ठाकरे जोड्याने मारत असल्याचे चित्र दाखविण्यात आले आहे. या चित्राखाली सावरकरांचा अपमान झाल्यानंतर बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून निषेध केला होता, असे म्हटले आहे.

तर बॅनरवरील दुसर्‍या बाजूला संजय राऊत आणि राहुल गांधी यांचा गळ्यात गळा घालून काहीतरी कुजबुज चालल्याचे दिसत आहे. या चित्राखाली ‘हेच खरे गद्दार’ ज्यांनी आदरणीय शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात, तेव्हा संजय राऊत हे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात अशा आशयाची टीप यावर दिसत आहे. हा बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरला मात्र, काही वेळानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी हे बॅनर हटवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -