घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणैं ॥
जेथे काम उत्पन्न झाला, तेथे त्यापूर्वी क्रोधही येतो व क्रोधामध्ये अविचार असतोच, असे जाण!
संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति । चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत प्रचंड वार्‍याने नाहीशी होते, त्याप्रमाणे अविचारामुळे स्मृती म्हणजे आत्मज्ञान नष्ट होते.
कां अस्तमानीं निशी । जैसा सूर्य तेजातें ग्रासी । तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥
संध्याकाळ होताच रात्र जशी सूर्यतेजाला गिळून टाकते, त्याप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाल्यावर मनुष्याची वाईट दशा होते.
मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ॥
मग अज्ञानामुळे त्याची बुद्धि आंधळी होऊन तो सर्व गोष्टीस दुरावतो आणि त्याला काही सुचेनासे होते.
जैसे जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे । तैसे बुद्धिसी होती भंवे । धनुर्धरा ॥
जन्मांधाला पळण्याचा प्रसंग आल्यावर तो जसा दीन होऊन सैरावैरा धावू लागतो, त्याप्रमाणे अर्जुना, बुद्धिला भ्रम होतो.
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥
अशा रीतीने बुद्धिभ्रम झाला म्हणजे बुद्धि घोटाळ्यात पडते आणि मग सर्व ज्ञान नष्ट होते.
चैतन्याच्या भ्रंशीं । शरीरा दशा जैशी । तैसें पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखैं ॥
शरीरातील प्राण निघून गेला म्हणजे जसा देह प्रेतरूपी होतो, त्याप्रमाणे बुद्धि नष्ट झाल्यावर जीवाची स्थिती होते, असे जाण.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -