घरमहाराष्ट्रपुणेआयातदार होण्याऐवजी निव्वळ निर्यातदार होण्याचे सरकारचे ध्येय - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

आयातदार होण्याऐवजी निव्वळ निर्यातदार होण्याचे सरकारचे ध्येय – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

Subscribe

पुणे : संरक्षण निर्यातीत (defence exports) अलिकडच्या वर्षांत अनेक पटींनी वाढ झाली आहे. या निर्यातीत 2014मधील 900 कोटी रुपयांवरून 2022-23च्या आर्थिक वर्षात 16,000 कोटी रुपयांपर्यंत वृद्धी झाली आहे. भारत अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे. अनेक देशांनी भारताच्या उत्पादन क्षमतेमध्ये स्वारस्य आणि विश्वास दाखवला आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी आज, सोमवारी सांगितले.

पुण्यामध्ये संरक्षणविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान संस्थेच्या (DIAT) 12व्या दीक्षांत समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत विविध देशांमध्ये सातत्याने बदलत राहणाऱ्या राजकीय आणि आर्थिक समीकरणांची राजनाथ सिंह यांनी यावेळी माहिती दिली. निव्वळ आयातदार होण्याऐवजी निव्वळ निर्यातदार होण्याचे आमचे ध्येय आहे. यामुळे केवळ आपली अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही, तर रोजगाराच्या संधीही वाढतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

नॉन-कायनेटिक किंवा संपर्करहित (contactless) युद्धांना तोंड देण्यासाठी पारंपरिक पद्धतींबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय वेगाने प्रगती होणे गरजेचे आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडे अधिक जास्त आधुनिक तंत्रज्ञान असेल तर भविष्यात ही बाब आपल्यासाठी चिंताजनक ठरेल. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानविषयक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करणे ही आपल्यासाठी अतिशय तातडीची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. सायबर आणि अंतराळाशी संबंधित नव्याने उदयाला येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भारताला पूर्णपणे सक्षम बनवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने वाटचाल करण्याचा आणि प्रगती साध्य करण्याचा सल्ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संशोधन संस्थांना दिला.

- Advertisement -

संरक्षण क्षेत्र म्हणजे एका जागी स्थिर असलेला तलाव नसून एक वाहती नदी आहे. ज्या प्रकारे एखादी नदी आपल्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना ओलांडत पुढे जात राहते त्या प्रकारे आपल्याला सुद्धा सर्व अडथळे पार करून पुढे गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. संरक्षण संशोधन आणि अतिशय अचूकता असलेले तंत्रज्ञान यांच्यातील जवळचा संबंध अधोरेखित करत राजनाथ सिंह यांनी डीआयएटीसारख्या संस्थांना केवळ संरक्षण क्षेत्रासाठीच नव्हे तर सामान्य नागरिकांना देखील तितक्याच प्रमाणात फायदेशीर असलेले नवीन नवोन्मेषी संशोधन हाती घेण्याचे आवाहन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -