घरमनोरंजनएका चरित्र अभिनेत्रीची गोष्ट !- सुलोचना लाटकर

एका चरित्र अभिनेत्रीची गोष्ट !- सुलोचना लाटकर

Subscribe

भारतीय चित्रपट सृष्टीमधील सुलोचना दीदींचा प्रवास तब्बल सात दशकांचा आहे. एक बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. मराठीच नव्हे, तर हिंदी व दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला होता. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, देव आनंद अशा भल्या भल्या सुपरस्टार्सच्या आईच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण बऱ्याचदा पाहिलं आहे.

सुलोचना लाटकर यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खडकलाट गावामध्ये झाला होता. त्यांचं लाटकर हे नाव देखील खडकलाट या गावाच्या नावावरून ओळखलं जातं. हे खडकलाट गाव महाराष्ट्राच्या सीमेलगतच आहे. त्यामुळे सुलोचना बाईंचे वडील महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानांमध्ये दरोगा म्हणून काम करत होते. सुलोचना बाईंचं प्राथमिक शिक्षण गावातल्याच एका प्राथमिक शाळेमध्ये झालं. पण सुलोचनाबाईंना शिक्षणाची काही खास आवड नव्हती. त्यांच्या गावातील दर्ग्यांमध्ये दरवर्षी उरूस भरायचा. त्यावेळी भरणाऱ्या जत्रेमध्ये तमाशा, नाटक तसेच चित्रपटांचे खेळ व्हायचे. छोटी सुलोचना आवडीने पहिल्या रांगेमध्ये बसून या नाटक- सिनेमांचा आस्वाद घ्यायची. असं म्हटलं जातं की, छोटी सुलोचना पडद्यावरील धावणारी दृश्य पाहून, उत्सुकतेपोटी सिनेमाच्या पडद्यामागे काय चाललंय हे पाहायला जायची. पुढे हेच तिचं विश्व असेल याची त्यावेळी तिला जाणीवही नव्हती.

- Advertisement -

Planet Marathi Filmfare Awards 2021: Veteran actress Sulochana Latkar honoured with 'Lifetime Achievement Award' | Marathi Movie News - Times of India

सुलोचना दीदींच्या लहानपणीच आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर सांभाळणार कुणी नव्हतं. मावशी व भावाला सोबत घेऊन काही काळ वडिलांच्या वकील मित्राकडे राहील्या. मात्र किती दिवस असं दुसऱ्याच्या ओसरीवर काढणार, हे सुलोचना बाईंच्या लक्षात आलं. त्याच दरम्यान वडिलांच्या त्या वकील मित्राकडे त्या वेळचे नामांकित निर्माता-दिग्दर्शक मास्टर विनायक आले होते. त्यांच्यासोबत सुलोचना बाईंची भेट झाली. मास्टर विनायक यांना त्यांची कहाणी कळल्यावर, त्यांनी सुलोचनादीदींना आपल्या कोल्हापूरमधील प्रफुल्ल पिक्चर्स या फिल्म कंपनीमध्ये काम करण्याची संधी दिली. दुर्दैवाने काम सुरू केल्यानंतर तीन महिन्यांनी मास्टर विनायक यांनी ही कंपनी मुंबईला न्यायचं ठरवलं. मात्र सुलोचना दीदींनी मुंबईला जाण्यास नकार दिला आणि पुढे त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये काम सुरू केले. जयप्रभा स्टुडिओ त्यावेळी त्याच्या ऐतिहासिक व धार्मिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध होता. तिथे सुलोचना दीदी चित्रपटात खऱ्या अर्थाने काम करायला शिकल्या. भालजी पेंढारकर स्वतः त्यांना तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकवायचे. याआधी मास्टर विनायक यांच्या ‘चिमुकला संसार” या चित्रपटात सुलोचना दीदींनी छोटीशी भूमिका निभावली होती. पण त्यांची खरी सुरुवात झाली ती १९४४ मध्ये प्रदर्शित झालेल्या जयप्रभा स्टुडिओच्या ‘महारथी कर्ण’ आणि ‘वाल्मिकी’ या चित्रपटांनी झाली आणि १९४७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सासुरवास’मध्ये त्या मुख्य भूमिकेमध्ये झळकल्या. पुढे महात्मा गांधींची हत्या झाल्यावर एका दुर्घटनेमध्ये जयप्रभा स्टुडिओ बंद पडला.

- Advertisement -

त्या घटनेनंतर सुलोचना दीदींचं पुण्याला आगमन झालं. पुण्यातील मंगल पिक्चर्सच्या ‘जीवाचा सखा’मध्ये त्यांना काम मिळालं. हा चित्रपट १९४८ मध्ये हिट ठरला आणि सुलोचना दीदींचं मराठी चित्रपटांमध्ये बस्तान बसलं. त्यांना कामाची कुठलीच कमतरता भासली नाही. १९५२ मधील त्यांचा ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’ जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो हिंदीमध्ये रीमेक केला. त्या ‘औरत तेरी यही कहानी’ मध्येही सुलोचना दीदींना साइन करण्यात आलं. या निर्णयामुळे त्यांना पुणे सोडून मुंबईमध्ये यावं लागलं. या चित्रपटात त्यांनी भारत भूषणसोबत काम केलं होतं, जो १९५४ मध्ये सुपरहिट ठरला. हिंदीमध्ये त्या नावाजल्या गेल्या. परंतु यानंतर त्यांनी केलेले महात्मा कबीर, सजनी, मुक्ती हे चित्रपट फ्लॉप झाले. मात्र १९५६ मधील ‘सती अनुसूया’ हा धार्मिक चित्रपट हिट ठरला. मात्र धार्मिक चित्रपटांचा शिक्का त्यांच्यावर बसला. हे एक प्रकारे नुकसानच होतं. परंतु हे नुकसान १९५७ मधील ‘अब दिल्ली दूर नही’ या चित्रपटाने भरून काढलं.

१९५९ मध्ये सुलोचनाबाईंच्या करिअरमध्ये आणखी एक वळण आलं, ते सुजाता या चित्रपटामुळे… बिमल रॉय यांनी त्यांना या चित्रपटातील आईचा रोल देऊ केला होता. वयाच्या तिशीत आईचा रोल या दुविधेत त्या अडकल्या होत्या. पण दीदींच्या मैत्रिणी दुर्गा खोटे आणि ललिता पवार यांनी, त्यांना सल्ला दिला की, या इंडस्ट्रीमध्ये जर लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल, तर ही भूमिका स्वीकार. त्यांनी दोघींचाही सल्ला ऐकला आणि त्यावर अंमलबजावणी करून बिमल रॉय यांची ऑफर स्वीकारली. सुजाता हिट ठरल्यानंतर सुलोचना लाटकर हे हिंदी चित्रपटातील कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून एक मोठं नाव ठरलं. ज्यामुळे त्या अधिक कामांमध्ये व्यस्त झाल्या.

Veteran actor Sulochana dies at 94, Riteish Deshmukh pays tribute |  Bollywood - Hindustan Times

त्यानंतर दिल देखे देखो, ई मिलन की बेला, आये दिन बहार के, नई रोशनी, संघर्ष, दुनिया, आदमी, साजन, जॉनी मेरा नाम, कटी पतंग, कसोटी, प्रेम नगर, कोरा कागज, संन्यासी , गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, क्रांती, अंधा कानून, खून भरी मांग, टाडा अशा चित्रपटांची रांगच लागली. या सर्व चित्रपटांमध्ये एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्या पडद्यावर झळकल्या. सोबत मराठी चित्रपटातही काम चालूच होतं. चित्रपट क्षेत्रातील सुलोचना दीदींच्या सात दशकांच्या प्रवासामध्ये त्यांनी तब्बल ५०० हून अधिक चित्रपट केले. यामध्ये दीडशेहून अधिक मराठी चित्रपट आहेत तर काही दक्षिणात्य चित्रपटही आहेत. १९९९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते.

दुर्दैवाने आज सुलोचना दीदी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीतील एका अभिनय-समृद्ध युगाचा अंत झाला आहे. कधी बहीण, कधी वहिनी, तर कधी आईची भूमिका साकारून एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी पडद्यावर आदर्श ठसा उमटवला आहे, जो कधीही पुसता येणार नाही.


हेही वाचा :

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन; उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -