घरफिचर्ससुमनसूर...दिल का भवर

सुमनसूर…दिल का भवर

Subscribe

मराठीत सुमनताईंच्या गाण्यांच्या आठवणींची लडीच्या लडी आहे. ‘एकटी’तलं ‘लिंबलोण उतरू कशी, असशी दूर लांब तू, इथून द़ृष्ट काढते, निमिष एक थांब तू’ हे सुमनताईनी गायलेलं भावव्याकुळ गाणं तर मराठी संगीतरसिक आजही त्याच्या मनात कप्प्यात खोलवर जपून आहे. लोकलमधले भिकारी त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जे गाणं गाऊन त्यांच्या कटोर्‍यात एखाददुसरं नाणं मिळवतात ते ‘केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’ सुमनताईंनीच गायलेलं आहे. कवी कृ.ब.निकुंबांनी लिहिलेलं ‘घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात’ हे गाणं तर आज वयस्कर झालेल्या त्या काळच्या माहेरवाशिणींच्या मनात आजही रूंजी घालतं. आजही सुमनताईंचं हे गाणं ऐकताना तशाच एखाद्या सासुरवाशिणीला माहेराच्या वाटेची ओढ लागते.

लता मंगेशकर नावाचं सुरांचं साम्राज्य सुरू झालं त्याच्या आसपास एक नाव उदयाला आलं ते म्हणजे सुमन कल्याणपूर ह्यांचं. लता मंगेशकर ह्यांच्या आवाजासोबत समांतर जाणारा सुमन कल्याणपूरांचा आवाज. लतादीदींसारखाच पातळ, तसाच सुरेल, तसाच मुग्धमधूर. गाण्याच्या सर्वसामान्य रसिकाला तर कधी कधी फरक ओळखता येऊ नये इतका दोघींचा आवाज एकसमान. काही जाणकार म्हणाले की नुरजहाँ, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालावाली वगैरे त्या काळच्या लतादीदींच्या समकालिन गायिकांच्या छायेतून लतादीदी बाहेर पडल्या म्हणून लतादीदी स्वत:चं वेगळं नाव, वेगळा करिश्मा करू शकल्या आणि सुमनताई लतादीदींच्या छायेतून बाहेर पडू शकल्या नाहीत म्हणून काहीशा झाकोळल्या गेल्या. कुणाचं म्हणणं काही असो, पण तरीही सुमन कल्याणपूर ह्या नावालाही त्या काळात एक मोठा चाहता वर्ग लाभला हे अजिबात नाकारता येणार नाही.

- Advertisement -

‘जुही की कली मेरी लाडली’, ‘अजहूँ न आये बालमा, सावन बीता जाये’, ‘पर्वतों के पेडो पर शाम का बसेरा हैं’, ‘बहनों ने भाई की कलाई से प्यार बांधा है’, ‘ठहरिये होश में आ लू तो चले जाइयेगा’, ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे’ अशी कित्येक गाणी आज सुमनताईंचं नाव घेताच नजरेसमोर येतात. ‘दिल एक मंदिर हैं’मधलं ‘जुुही की कली मेरी लाडली’ हे त्यांचं गाणं तर आजही कोणत्याही नवोदित आईच्या मनाची कळी खुलवणारं, ऐकताना मनात आरपार पोहोचणारं. ‘ठहरिये होश में आ लू तो चले जाइयेगा’ ह्या गाण्यातली ‘चले’ ह्या शब्दातली सुमनताईंच्या आवाजातली ती मिठ्ठास मुरकी तर खिळवून ठेवणारी. 1971 मध्ये ‘पारस’ नावाचा असाच एक सिनेमा आला होता. कल्याणजी-आनंदजींनी त्याला संगीत दिलं होतं आणि इंदिवरजींनी त्यात एक गाणं लिहिलं होतं. शब्द होते ‘मन मेरा तुझ को मांगे, दूर दूर तू भागे, मैं ऐसी उलझी सैयाँ.’ गाणं तसं दुर्लक्षितच राहिलं, पण सुमनताईंनी ते गाणं छान नखर्‍यात गायल्याचं आजही आठवतं आहे.

मराठीत तर सुमनताईंच्या गाण्यांच्या आठवणींची लडीच्या लडी आहे. ‘एकटी’तलं ‘लिंबलोण उतरू कशी, असशी दूर लांब तू, इथून द़ृष्ट काढते, निमिष एक थांब तू’ हे सुमनताईनी गायलेलं भावव्याकुळ गाणं तर मराठी संगीतरसिक आजही त्याच्या मनात कप्प्यात खोलवर जपून आहे. लोकलमधले भिकारी त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जे गाणं गाऊन त्यांच्या कटोर्‍यात एखाददुसरं नाणं मिळवतात ते ‘केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’ सुमनताईंनीच गायलेलं आहे. कवी कृ.ब.निकुंबांनी लिहिलेलं ‘घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात’ हे गाणं तर आज वयस्कर झालेल्या त्या काळच्या माहेरवाशिणींच्या मनात आजही रूंजी घालतं. आजही सुमनताईंचं हे गाणं ऐकताना तशाच एखाद्या सासुरवाशिणीला माहेराच्या वाटेची ओढ लागते. ‘देह जावो अथवा राहो’ ऐकताना सुमनताईंचा आवाज तर कुणाला तरी बोट धरून मंदिराच्या गाभार्‍यात आणून सोडतो.

- Advertisement -

मराठीत सुमनताईंचे जास्तीत जास्त सूर जुळले ते संगीतकार दशरथ पुजारीं, कमलाकर भागवत, विश्वनाथ मोरे आणि अशोक पत्कींशी. दशरथ पुजारींच्या संगीतात गायलेली ‘झिम झिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियावीण उदास वाटे रात’, ‘आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे’, ‘देव माझा विठू सावळा’, ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’, ‘नकळत सारे घडले, मी वळता पाऊल अडले’, ‘नंदाघरी नंदनवन फुलले’, ‘एकतारी सूर जाणे श्रीहरी जय श्रीहरी’ ही सुमनताईंनी गायलेली गाणी ही मराठी रसिकांच्या मराठीपणाचा ठेवा ठरली आहेत इतकी ती अवीट गोडीची आहेत.

अशोक पत्कींच्या संगीतात ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘पाखरा जा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजणा’, ‘वाट इथे स्वप्नातील संपली जणू, थांबवितो धारांनी सावळा घनू’, ‘दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो’, ‘कुणी तरी पाही बाई चोरूनिया गं’, ‘आले मनात माझ्या’ ह्यासारखी एकापेक्षा एक गाणी सुमनताई गायलेल्या असल्या तरी अशोक पत्कींकडे त्यांनी गायलेलं एक गाणं ह्या सगळ्यांना पुरून उरलं आहे. ते गाणं आज इतकं अविस्मरणीय ठरलं आहे की अशोक पत्की ह्यांच्या संगीतकार म्हणून कारकिर्दीची ओळख ठरली आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. ते गाणं आहे अर्थातच, ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर!’…नुसती सुमनताईंची गाणी आठवतानाही हे गाणं क्षणार्धात नजरेसमोर येतं. ह्या गाण्याची आठवण होत नाही असं होतच नाही. त्यातल्या ’भावपूर्ण रात्रीच्या अंतरंगी डोलले, धुक्यांतुुनी कुणी आज भावगीत बोलले’ ह्या अंतर्‍यातले सुमनताईंचे मंद मंद लहरत जाणारे सूर तर अंतर्मुख करून जातात.

कमलाकर भागवतांकडे सुमनताईंनी गायलेला ‘समाधी घेऊन जाई ज्ञानदेव’ हा अभंग तर मन हेलावून टाकणार्‍या आर्ततेची एक वेगळीच साक्ष आहे. सुमनताईंचा ह्या गाण्यातला सूरच इतका उत्कट आहे की ऐकताना आपण आपलं न राहावं…आणि संगीतकार विश्वनाथ मोरेंकडे गायलेलं ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलांपरी’ हे साध्यासरळ चालीतलं गाणं तर सुमनताईंच्या आवाजातल्या हळुवारपणाने नाहून निघालेलं आहे.

सुमन कल्याणपूर आज कुठल्या वर्तमानपत्रात, कुठल्या टीव्ही चॅनेलला कसली मुलाखत देताना दिसत नाहीत. टीव्ही चॅनेल्सवर इतके रिअ‍ॅलिटी शो होत असतात, पण तिथल्या शोला कधी परीक्षक म्हणून दिसत नाहीत. त्या कोणत्या सत्कार सोहळ्यात मिरवताना दिसत नाहीत. त्यांचा तो काळ गाजवून, त्यात नावलौकिक मिळवूनही त्या मोहमयी नगरीपासून, प्रसिध्दीपासून अतिशय दूर आहेत. आपल्या काळातल्या आठवणी सांगून उगाच आठवणींचे कढ काढताना दिसत नाहीत की कुणाच्या सभासमारंभांना प्रमुख पाहुण्या म्हणून दिसत नाहीत. त्या आज कुठे कुठेच दिसत नाहीत. त्यांच्या गाण्यांच्या चाहत्यांची संख्या काल जशी होती तशीच आजही आहे. त्यांच्या ह्या चाहत्यांना खूप वाटत असतं की सुमनताईनी एक लाइव्ह मुलाखत द्यावी, त्या काळातल्या संगीतकारांसोबतच्या आठवणी जागवाव्या, आपली खंत, आपला खेद व्यक्त करावा. आपल्या मनातलं काही सांगावं, आजच्या संगीताबद्दल बोलावं. पण सुमनताईंनी स्वत:ला ह्या सगळ्यापासूून दूर ठेवलं आहे.
असो, आज त्या स्वत:ला कितीही दूर ठेवोत, पण त्यांच्या गाण्यांचा अनमोल ठेवा मात्र रसिकांपासून दूर राहिलेला नाही. तो कुठून ना कुठून कानावर पडत असतो. त्यांच्या गाण्याने आम्हा सर्वांशी साधलेली ती जवळीक सहजासहजी कधी पुसून जाणं शक्य आहे का?…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -