घरमहाराष्ट्रनाशिकचित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंची कार मरणपंथाला, गॅरेजमध्ये धूळ खात

चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंची कार मरणपंथाला, गॅरेजमध्ये धूळ खात

Subscribe

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे कौतुक भारतालाच नाही तर सबंध विश्वाला. त्यांच्या जीवनावर आंतरराष्ट्रीय संस्थांनी माहितीपट काढले आहेत; परंतु पिकतं तिथं विकत नाही, असे म्हणतात. त्याप्रमाणे दादासाहेबांच्या वस्तुंची किंमत नाशिककरांनाच किंबहुना महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनाच नसल्याची विदारक बाब समोर आली आहे. दादासाहेबांची ‘मॉरिस’ कंपनीची कार नाशिकमध्ये चक्क एका गॅरेजमध्ये धूळ खात पडून आहे. या कारला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन देणार्‍या नेतेमंडळींनाही तिचा विसर पडला आहे. वास्तविक, या कारविषयीची माहिती सात वर्षापूर्वी उघड झाल्यानंतर तातडीने तिची डागडुजी करून ती वस्तुसंग्रहालयात ठेवणे गरजेचे होते.

नाशिक ही दादासाहेबांची जन्मभूमी व कर्मभूमी असून, येथील त्यांचे राहते घर, जुना स्टुडिओ, फिल्म प्रोसेस लॅब व १९३४ मधील त्यांची मॉरीस गाडी, हे सर्व म्हणजे त्यांची आठवण आहे. नाशिकमध्ये पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या २९ एकर जागेवरील यापूर्वी असलेले महानगरपालिकेचे दादासाहेब फाळके स्मारकच राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची आग्रही मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. परंतु कालानुरुप ही मागणीही विरत गेली. राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा उपस्थित होताच २०१२ मध्ये दादासाहेबांच्या एक-एक वस्तू उजेडात आल्यात. त्यात मॉरिस कारचाही समावेश होता. या गाडीच्या देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल, गाडीला स्मारकात ठेवले जाईल, असे आश्वासन तत्कालीन आमदार वसंत गिते यांच्यासह अनेकांनी दिले होते. प्रत्यक्षात तिच्याकडे कोणी लक्षच दिले नसल्याची विदारक बाब पुढे आली आहे.

असा आहे दादासाहेबांच्या कारचा इतिहास

दादासाहेबांकडे असलेली मॉरिस गाडी त्यांच्याच ग्रुपमध्ये काम करणारे दादा भट यांना सुपूर्द करण्यात आली होती. दादा भटांनी लक्ष्मीबाई भट यांच्या नावावर ती गाडी घेतली होती. पुढे त्यांचा मुलगा शशिकांत यांच्याकडे ती गाडी कित्येक दिवस होती. त्या काळात शशिकांत यांच्या शेजारी राहणारे उदयकला ब्रासबॅण्डचे संचालक विजय तापकिरे यांनी शशिकांत यांना गळ घालून ही गाडी लग्नात नवरदेवाच्या वरातीसाठी वापरण्यास सुरुवात केली. पुढे अनेक वर्षांनी दुरुस्तीसाठी म्हणून ही गाडी शालिमार येथील होशी पटेल यांच्या गॅरेजमध्ये आणण्यात आली. त्यानंतर अनेक दिवस ती तेथेच पडून होती. तापकिरे यांचे मित्र प्रवीण चांदोडकर यांनी ही गाडी चांगल्या ठिकाणी दुरुस्तीला देण्यासाठी हट्ट केल्यानंतर ती गाडी वडाळानाका येथील गॅरेजमध्ये आणण्यात आली. तेव्हापासून ती तेथेच आहे.

- Advertisement -

पुरातन वास्तू संग्रहालय संचालक म्हणतात, हा विषय आमच्या अखत्यारितच नाही

या विषयी पुरातन वास्तू संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांना संपर्क साधला असता अशा कोणत्याही गाडीचा प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरातन वाहने आणि तत्सम बाबींचे संवर्धन हा विषय आमच्या खात्याच्या अखत्यारित नसून अन्यत्र याविषयी चौकशी करावी असेही ते ‘आपलं महानगर’ला म्हणाले. मात्र, कोणत्या खात्याशी संबंधित हा विषय आहे असे विचारले असता त्यांनी याबाबत अनभिज्ञता दर्शविली.

Phalake car ( 2019 )
दादासाहेब फाळके यांच्या कारची सद्यस्थिती
चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंची कार मरणपंथाला, गॅरेजमध्ये धूळ खात
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -