घरमहाराष्ट्रकुरूंग-मोरेवाडी रस्त्याच्या कामात ठेकेदारांची चालढकल

कुरूंग-मोरेवाडी रस्त्याच्या कामात ठेकेदारांची चालढकल

Subscribe

काम निकृष्ट असल्याचा आरोप

तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे शासनाने हाती घेतली आहेत. त्यामुळे अधिकारी देखरेख करण्यासाठी पोहचत नसल्याने ठेकेदारांचे फावले असून, कुरूंग-ताडवाडी-मोरेवाडी या रस्त्यावर 3 कोटी खर्चून डांबरीकरण केले जात आहे. दरम्यान, डांबरीकरण केल्यानंतर रोलर फिरवणे आवश्यक असताना ठेकेदार मात्र कामात चालढकल करीत आहेत. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्यावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

आदिवासी भागातील रस्ते हे गेल्या काही वर्षांत अत्यंत खराब झाले होते. त्यातील मुरबाड रस्त्याने कुरूंग मार्गे ताडवाडी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने निधी मंजूर केला आहे. 3 कोटी रुपये खर्चातून खराब असलेल्या भागात डांबरीकरण करण्याचे काम 2018 च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर होते. दुसरीकडे याच रस्त्यावर रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने 2017 मध्ये 80 लाखाचा निधी मंजूर केला होता. त्या निधीतून रस्ता तयार केल्याची पाटी आजही रस्त्यावर दिसून येत आहे. त्याप्रमाणे रस्त्याचा नक्की कोणता भाग डांबरीकरण केला हे सांगता येत नसल्याचे ताडवाडी आणि मोरेवाडीमधील ग्रामस्थ सांगत आहेत.

- Advertisement -

प्रकाश केवारी – ग्रामस्थ
आम्हाला अखंड रस्ता हवा होता, पण ज्या ठिकाणी खराब आहे तो भाग न करता ठेकेदार आपली मनमानी करीत आहे. त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग देखील सहकार्य करीत असल्याने आमचे रस्ते चांगल्या दर्जाचे होणार नाहीत.

गोरख गवळी – उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
आम्ही रस्त्यावर जाऊन पाहणी करीत असतो. ग्रामस्थांना दिसलो नसेल पण आमचे सुपरव्हिजन सुरू असते. रोलर फिरवला नाही या ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -