घरलोकसभा २०१९खडाजंगीबिग फाईट्स! तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र कुणाला करणार मतदान!

बिग फाईट्स! तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र कुणाला करणार मतदान!

Subscribe

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांसाठीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान मंगळवारी २३ एप्रिल रोजी होत आहे. या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या बिग फाईट्स होत आहेत, त्याचा हा आढावा!

लोकसभा निवडणुकांसाठी मंगळवारी २३ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. एकूण १४ राज्यांमधल्या ११५ जागांसाठी हे मतदान होत असून सर्व ७ टप्प्यांमध्ये सर्वाधिक जागांसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये गुजरात (२६) महाराष्ट्र (१४), उत्तर प्रदेश (१०), केरळ (२०), कर्नाटक (१४) या महत्त्वाच्या राज्यांसोबतच दादर-नगर हवेली, दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्येही या टप्प्यात मतदान होत आहे. महाराष्ट्राच्या १४ जागांमध्ये अनेक मोठमोठी नावं असून त्यांचं भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद होणार आहे.

बारामतीत सुप्रिया सुळेंसमोर कडवं आव्हान!

यामध्ये सर्वाधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची लढत म्हणजे बारामती! गेल्या ४ दशकांपासून पवार घराण्याची सत्ता असलेल्या बारामतीमध्ये यंदा घुसून तिथली गणितं बिघडवण्याचा पणच भाजपनं केला आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसोबतच भाजपच्या अनेक दिग्गजांनी इथे सभा घेतल्या. सुप्रिया सुळेंच्या विरोधात भाजपनं रासपचे दौंडमधले आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईक असलेल्या कांचन कुल रासपकडून मैदानात असल्यामुळे आणि २०१४मध्ये सुप्रिया सुळेंना कडवी टक्कर देणारे महादेव जानकर त्यांच्या पाठिशी असल्यामुळे इथे कडवी लढत होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सुजय विखे पाटलांचं काय होणार?

तिकिटावर काँग्रेसमधून भाजपकडे गेलेल्या सुजय विखे पाटलांचं संपूर्ण राजकीय भवितव्यच या मतदानावर अवलंबून असेल. वडील राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असूनही सुजय विखे पाटलांनी भाजपचा रस्ता धरला. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसनं संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंचे जावई संग्राम जगताप राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत आहेत. तर वडील काँग्रेसमध्ये असलेले सुजय विखे पाटील भाजपच्या तिकिटावर लढत आहे. त्यामुळे ही निवडणूक इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची ठरली आहे.


हेही वाचा – नगरमध्ये नवा ट्विस्ट; सुजय विखेंच्या पत्नीनेही भरला उमेदवारी अर्ज

माढ्यातही भाजपचे आयात उमेदवार!

दरम्यान, जी गत अहमदनगरमध्ये झाली, तीच गत माढ्यातही झाली असून इथेही भाजपनं काँग्रेसमधून आयात उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटलांचा पत्ता भाजपनं कट केला. त्याच वेळी मोहिते पाटील भाजपत गेल्यामुळे राष्ट्रवादीनं भाजपमधून आयात केलेल्या संजय शिंदेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विचित्र पद्धतीने इथली निवडणूक रंगतदार झाली आहे.

- Advertisement -

सांगलीत पाटीलकीसमोर पडळकरांचं आव्हान!

सांगलीमध्ये वसंतदादा पाटलांचे दोन नातू प्रतिक पाटील आणि विशाल पाटील यांच्यात उमेदवारीवरून झालेली सुंदोपसुंदी बरीच गाजली. राजू शेट्टींना आघाडीनं हा मतदारसंघ सोडल्यामुळे प्रतिक पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकला. म्हणून विशाल पाटलांच्या पदरात उमेदवारी पडली, पण ते शेट्टींच्या स्वाभिमानच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तर समोर विद्यमान खासदार संजय पाटील यांचं आव्हान आहे. मोदी लाटेत निवडून आलेले संजय पाटील खासदारकी राखतात का? हे महत्त्वाचं ठरणार आहे! शिवाय आपल्या वक्तृत्वासाठी ओळखले जाणारे गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्यामुळे इथल्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

औरंगाबादेत अब्दुल सत्तार फॅक्टर

औरंगाबादमधून काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही म्हणून सत्तारांनी अखेर काँग्रेस सोडून अपक्ष निवडणूक लढवण्याचा पर्याय स्वीकारला. काँग्रेसचे स्थानिक उमेदवार सुभाष झांबड यांच्या नावाला सत्तारांचा तीव्र विरोध होता. मात्र, पक्षाने त्यांना न जुमानल्यामुळे त्यांनी बाहेरचा रस्ता धरला. त्यातच वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

रायगडमध्ये अनंत गिते विरूद्ध सुनील तटकरे

कोकणातला रायगड मतदारसंघ तिथल्या ‘डबल’ उमेदवारांमुळे चर्चेत आहे. २०१४मध्ये जसे इथे २ सुनील तटकरे होते, तसेच यंदाच्या निवडणुकीत २ अनंत गिते होते. मात्र, ऐनवेळी दुसऱ्या अनंत गितेंनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या अनंत गितेंनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि उमेदवार सुनील तटकरेंचं कडवं आव्हान असेल.

तिसऱ्या टप्प्यात अनेक बडी नावं!

याशिवाय तिसऱ्या टप्प्यामध्ये मैदानात असलेली मोठी नावं म्हणजेच रावसाहेब दानवे(जालना), गिरीश बापट(पुणे), उदयनराजे भोसले(सातारा), विनायक राऊत(रत्नागिरी-सिंधुदुर्ग), राजू शेट्टी(हातकणंगले) यांचं भवितव्य देखील मतपेटीत बंद होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -