गड्या आपला गाव बरा! …अन् लॉकडाऊनमुळे तरुण वळला शेतीकडे

वर्षभरापूर्वी संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार माजला. यामुळे संचारबंदी लागली आणि हातवार पोट असणारे, खाजगी क्षेत्रात काम करणारे असे अनेक नोकरदार बेरोजगार झाले. यामुळे शहरात गेलेल्या तरुणांनी शहर सोडून गाव गाठले.गावातच व्यवसाय निर्माण करत पोटाची सुविधा निर्माण केली.

२०१९ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात सुरु झाला आणि लादलेल्या संचारबंदीने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामध्ये शहरात काम करणारे तरुणांची मोठी पंचाईत झाली. अनेकांनी “गड्या आपला गाव बरा” असं म्हणत गावातच व्यवसाय सुरु करण्यास सुरवात केली. यापैकीच भोमजाई गावातील यांनी पुणे शहरातील नोकरी सोडून शेतीमध्ये जम बसवत गावातील पारंपारिक शेतीला आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्षभरापूर्वी संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार माजला. यामुळे संचारबंदी लागली आणि हातवार पोट असणारे, खाजगी क्षेत्रात काम करणारे असे अनेक नोकरदार बेरोजगार झाले. यामुळे शहरात गेलेल्या तरुणांनी शहर सोडून गाव गाठले. यातील अनेकजण संचारबंदी शिथिल होताच पुन्हा शहरात गेले मात्र अनेकानी गड्या आपला गाव बरा असे म्हणत गावातच व्यवसाय निर्माण करत पोटाची सुविधा निर्माण केली. यापैकीच एक असलेले संदीप महाडिक यांनी आपली पुणे शहरातील नोकरी गेल्यानंतर वडिलांचे शेतीतील कष्ट पाहून आपण देखील शेती केली पाहिजे या उद्देशाने शेती करण्यावर भर दिला. वर्षभर बसून राहिल्यानंतर त्याने पारंपारिक भात शेतीत काय बदल करता येतील याबाबत मित्र परिवार आणि इतर ठिकाणी भेटी देत अभ्यास सुरु केला. यातून त्याने भाताबरोबर प्रायोगिक तत्वावर दुर्मिळ होत चाललेला खपली गहू पेरण्याचा निर्णय घेवून दापोली कृषी विद्यापीठाचे राजेमहाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली खपली गहूची पेरणी केली आहे. याकरिता नितीन जवूळ याने संपूर्ण शेताची नांगरणी करून देण्यास मोलाची मदत केली. तत्पूर्वी संदीप यांनी संपूर्ण शेताला कापड लावून सरंक्षण तयार केले. शेजारील विहीर आणि इतर ठिकाणाहून पाण्याची सुविधा निर्माण केली. ज्या जागेत जवळपास दोन खंडी भात पिक निघत होते त्याठिकाणी यांनी सद्य स्थितीत कलिंगड, मुळा, कोतिंबीर, पालक, मेथी, हरभरा, हुलगा, उडीद, मुग, काकडी, दुधी भोपळा आदीची लागवड केली आहे.

कोरोना नंतर पुन्हा नोकरीवर जाणे शक्य होते मात्र तितका पगार मिळणे शक्य नव्हते यामुळे पारंपारिक भातशेतीमध्ये वडिलांचे कष्ट पाहून भातशेतीमध्ये कांही तरी करावे असा विचार मनात आला आणि मी शेतीकडे वळलो असे संदीप महाडिक याने सांगितले. संदीप महाडिक याचे वडील शांताराम धर्माजी महाडिक हे दरवर्षी भातशेतीमधून दोन खंडी भात उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या कष्टाची प्रेरणा घेवून आधुनिक शेतीकडे आपण वळलो असल्याचे देखील संदीप महाडिक यांनी सांगितले. लवकरच लागवड केलेली पालेभाजी आणि इतर भाज्या संदीप याच्या शेतात तयार होवून नागरिकांच्या हातात पडतील.

पालेभाज्या विक्रीला सोशल मिडीयाचा आधार – लागवड केलेल्या आधुनिक शेतीमध्ये कलिंगड, मुग, कोतिंबीर, पालक, हरभरा, उडीद, पावटा, काकडी, दुधीभोपळा आदी पालेभाजी शेतातून थेट शहरातील नागरिकांच्या हातात देण्याचा मानस संदीप महाडिक यांचा आहे. याकरिता त्यांनी सोशल मिडीयाचा आधार घेतला आहे. भाजी विक्रीसाठी मध्यस्थ साधण्या ऐवजी थेट नागरिकांच्या हातात भाजी दिल्यास कष्टाला योग्य न्याय मिळेल असे संदीप याला वाटते. व्हाटसअप, फेसबुक याच्या माध्यमातून शहरातील सोसायट्या आणि ज्यांना विना खतांची भाजी हवी असल्यास अशा नागरिकांचा ग्रुप तयार करून त्यांच्या मागणीनुसार घरोघर भाजी पुरवठा करण्याचा मानस असल्याचे देखील संदीप याने सांगितले.


हेही वाचा – निलंबन मागे घेण्याचा अधिकार सभागृहाला, विधानसभा उपाध्यक्षांसमोरील सुनावणीनंतर शेलारांचे वक्तव्य