घरताज्या घडामोडीहवामान बदलाचा शेती व्यवसायाला फटका ; उत्पादन घटून शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था कोलमडली

हवामान बदलाचा शेती व्यवसायाला फटका ; उत्पादन घटून शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था कोलमडली

Subscribe

वातावरणातील अचानकपणे होत असलेल्या बदलांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हवामान बदलामुळे शेती व्यवसायावर पुन्हा अवकळा पसरत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचा असलेला रब्बी हंगाम पुन्हा हवामानाचा जुगार ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना शेतकर्‍यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. अलिकडच्या काही वर्षांत शेतकर्‍यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे किंबहुना संकटे त्यांची पाठ सोडायला तयार नाही. या नैसर्गिक संकटाने  शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रामुख्याने खरीप आणि रब्बी या महत्त्वाच्या दोन्ही हंगामातील पिकांना पोषक वातावरण मिळत नाही. परिणामी उत्पादनात घट झालेली दिसून येत आहे. एकीकडे एकरी उत्पादनात घट असताना उत्पादन खर्च मात्र वाढला आहे. यामध्ये घेतलेल्या पिकांना कधी अत्यंत कमी पाऊस, तर कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागला आहे.

यावर्षी काही ठिकाणी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिकांचे उत्पन्न घटले, तर काही भागात अतिवृष्टी झाल्याने हाती काहीच आले नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकर्‍यांनी पदरमोड करून कशीतरी पिके उभी केली, तर या अस्मानी संकटाने तेही वाया गेले. केलेला खर्च निघाला नाही. रब्बी हंगामात पिकांची वाईट अवस्था झाली आहे. सद्यःस्थितीत रब्बी हंगामातील नगदी समजल्या जाणार्‍या कांदा, हरभरा, मूग, वाल, पावटा, चवळी आदी पिकांच्या लागवडी झाल्या आहेत. रासायनिक खतांचे वाढते दर, तसेच मशागतीसाठी वाढता खर्च बघता या  पिकास अनुकूल वातावरण नाही.ऑक्टोबरपासून थंडी सुरू होणे अपेक्षित असताना आजपर्यंत डिसेंबरपर्यंत पाऊसच पडत होता. दिवसागणिक वातावरणात बदल होत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराई पडत आहे. खतांच्या किमती, महागडी कीटकनाशके, डिझेलच्या किमती, वीज बिल अशा संकटांचा सामना शेतकरी करीत आहे.

- Advertisement -

या वर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने भात पिकाचे नुकसान तर झालेच, शिवाय डिसेंबरमध्येही पाऊस पडल्याने वाल, पावटा, चवळी आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती पिकांचे दोन्ही हंगाम वाया जाणार असल्याने शेती व्यवसायाच्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. -प्रवीण पाटील, शेतकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -