डोंबिवलीत दुर्देवी घटना, कपडे धुण्यासाठी गेलेल्या गायकवाड कुटुंबातील ५ जणांचा खदानीत बुडून मृत्यू

Dombivali sandap village 5 members of a family who went to wash clothes died in mine water
डोंबिवलीत दुर्देवी घटना, कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील ५ जणांचा खदानीत बुडून मृत्यू

कल्याण- डोंबिवली जवळील २७ गावातील भोपर देसलेपाडा गावातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा शनिवारी संध्याकाळी खदानीत बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील पाणी टंचाईचे हे बळी असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

मीराबाई सुरेश गायकवाड (५५), अपेक्षा गौरव गायकवाड (२८), मोक्ष मनीष गायकवाड (२२), सिध्देश कैलास गायकवाड (१२) आणि मयुरेश मनीष गायकवाड (८) ही मुले आई आणि आजी बरोबर संदप गावातील खदानीत कपडे धुण्यासाठी गेली होती. मीरा आणि अपेक्षा या सासु, सुना कपडे धूत असताना तिन्ही मुले खदानीत उतरून पोहण्याचा आनंद घेत होती. खदानीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एका पाठोपाठ मुले खदानीत खोल पाण्यात बुडू लागली. मुले बचावासाठी धावा करू लागताच, खदानीच्या काठावरील आजी, आईने पाण्यात उड्या मारल्या. मुलांना वाचविताना त्यांना पोहता येत नसल्याने त्याही बुडाल्या. एका पाठोपाठ एकाच घरातील पाचही जण बुडाले आहेत.

पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या घरातील मयत व्यक्ती आहेत. खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेली पत्नी, सून, मुले घरी येत नाहीत म्हणून गायकवाड यांनी खदानीवर जाऊन पाहिले तर काठावर कपडे होते. पण तेथे कोणीही नव्हते. ग्रामस्थांनी ही माहिती अग्निशमन दलाला दिली. जवानांनी ताततडीने खदानीत शोध कार्य सुरू केले. चार तास पाण्यात शोध घेतल्यानंतर पाच जणांचे मृतदेह जवानांनी बाहेर काढले. शास्त्रीनगर रूग्णालयात त्यांना नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

नांदिवली देसलेपाडा, भोपर भागात तीव्र पाणी टंचाई आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी येते. त्यामुळे पाण्यासाठी रहिवाशांना खदानी, विहिरीवर जावे लागते. या पाणी टंचाईतून ही दुर्दवी घटना घडली आहे, अशी माहिती नांदिवलीच असल्याचे रहिवासी शनिदास जाधव यांनी दिली.


हेही वाचा : बोईसरमध्ये कंपनीतील दोन गटात तुफान दगडफेक, १० पोलिसांसह कामगार जखमी